संत पाटील बाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक संत, धर्मसुधारक आणि समाजसुधारक होऊन गेले. त्यांनी समाजाला योग्य दिशा दाखवली. त्यातीलच एक थोर समाजसुधारक, वारकरी संप्रदायाचे प्रचारक जोपुळ, ता दिंडोरी या गावी होऊन गेले. वै. ह भ प स्वानंदसूखनिवासी संत पाटीलबाबा महाराज... एकोणाविसाव्या शतकातील ते एक महान संत होऊन गेले. पंढरीच्या पांडुरंगाचे ते निस्सीम भक्त होते. नाशिक जिल्ह्यातील जोपुळ ता. दिंडोरी येथे उगले पाटील घराण्यात संत पाटीलबाबा यांचा इ स 1805 सालाच्या आसपास जन्म झाला. संत पाटीलबाबांचे संपूर्ण नाव पाटील बुवा रखमाजी उगले असे होते. लोक त्यांना पाटीलबाबा या नावानेच ओळखतात. बाबांना अगदी लहानपणापासूनच अध्यात्माची प्रचंड आवड होती. घरात परमार्थिक पार्श्वभूमी असल्याने बाबांना आपोआपच वारकरी संप्रदायाची, साधूसंतांच्या वाड्मयाची आणि पांडुरंगाची ओढ निर्माण झाली. लहानपणापासूनच त्यांच्यातील परमार्थिक ओढीने त्यांना पुढे जाऊन उत्तम प्रवचन कीर्तन करता येऊ लागले. संत पाटीलबाबांच्या जन्माअगोदर नाशिक जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. बाबांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका, कोकणपट्टा, मराठवाडा, विदर्भ तसेच महाराष्ट्रातील गावोगावी जाऊन कीर्तन-प्रवचनांद्वारे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. त्यांनी अनेक महान विभूती घडवल्या. त्याकाळी दिंडोरी तालुक्यातील जनतेत अंधश्रद्धेचा आणि जातिभेदाचा प्रचंड पगडा होता. जनतेच्या अडाणी, अशिक्षितपणामुळे त्या काळात दिंडोरी तालुका आणि परिसरात भगत, बुवा आणि कर्मकांड यांचं प्रचंड थैमान पसरलं होत. इथल्या समाजाची दिशाभूल करून अंधश्रद्धेला आणि जातीय भेदभावाला बळी पाडले जात होते. पाटील बाबांनी इथल्या लोकांच्या मनात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचे आणि जातीय भेदभाव दूर सारत लोकांना विठ्ठल भक्तिकडे वळवले. खऱ्या अर्थाने धार्मिक सुधारणांचे आणि पुरोगामीत्वाचे बीज पेरतांना त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रसारातून जनतेत समानतेचा प्रसारही करण्यास सुरुवात केली.

पाटीलबाबांनी लोकांना वारकरी संप्रदायातील महान परंपरांचे, संतांच्या शिकवणीचे ज्ञान देऊन सर्व जाती-धर्मांना सोबत घेत समानतेचा संदेश दिला. अनेक लोकांनी त्याकाळी पाटील बाबांच्या हातून तुळशीमाळ घालून स्वतःला पांडुरंगाला अर्पण करून घेतले. नाशिक जिल्ह्यात वारकरी संप्रदाय रुजविण्यात संत पाटीलबाबांचं मोठं योगदान आहे. संत पाटील बाबांनी लोकांना वारकरी संप्रदायाचे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथांचे विचार लोकांच्या मनात रुजविले. पाटीलबाबांनी दिंडोरी तालुका व महाराष्ट्रात अनेक सप्ताह बसविले. त्यापैकी एक जोपुळ येथील पाटीलबाबांच्या हस्ते बसलेला मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पंचमी अर्थात ऋषीपंचमीला बसलेला हरिनाम सप्ताह गेल्या 181 वर्षांपासून (इ स 2023) आजतागायत अखंडपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या हरिनाम साप्ताहांपैकी एक हा सप्ताह आहे. संत पाटीलबाबांनी इ स 1842 मध्ये जोपुळ येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून संप्रदायाची मुहूर्तमेढ जोपुळ गावात रोवली. त्याकाळी सार्वजनिक गणेशोत्सव होत नव्हते. त्यानंतर 40-50 वर्षांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. एवढी प्राचीन परंपरा जोपुळच्या हरिनाम सप्ताहाला लाभली आहे.

सप्ताहाच्या काही वर्षे आधी पाटील बाबांनी गावातील मंडळींना सोबत घेऊन आणि गावातील दानशूरांची आर्थिक मदत घेऊन गावात भव्य आणि सुंदर असे विठ्ठल मंदिर उभारले. जोपुळ गावातील जुनी जाणती जेष्ठ लोक अशी आठवण सांगतात की संत पाटीलबाबा एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता एक तेजस्वी वारकरी बाबांच्या घरी टाळ घेऊन आला आणि त्याने पाटीलबाबांच्या पत्नीला सोबत आणलेले टाळ देत सांगितले की, "मला पाटील-बाबांनी हे टाळ घेऊन पाठवले आहे". नंतर पाटीलबाबा घरी आल्यावर पत्नीने त्यांना ही गोष्ट सांगितल्यावर बाबांचे डोळे भरून आले आणि बाबांनी पत्नीला सांगितले की "मी कुणालाही टाळ घेऊन पाठवले नव्हते. प्रत्यक्ष पांडुरंगच टाळ घेऊन आला होता आणि पांडुरंगानेच तुला दर्शन दिले". यावरून पाटील बाबांच्या निस्सीम विठ्ठल-भक्तीची व्याप्ती लक्षात येते.

शेतकरी कुटुंबातील पाटीलबाबांनी त्यांच्या अमोघ वाणीतून आणि दैवी वक्तृत्वातून कीर्तन प्रवचनाद्वारे समाजात जनजागृती केली. वारकरी संप्रदायाचे कार्य करत असतानाच पाटील बाबांची त्यांचे समकालीन संत वै गंगागिरी महाराज कोपरगाव सरला बेट यांच्याशी भेट झाली. या दोघांनी मिळून गोदातीरावर अनेक ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. संत पाटीलबाबा किर्तनाद्वारे अनेकदा सांगत कि त्यांच्यानंतर दिंडोरी तालुक्यात एक हिरा जन्माला येणार आहे. आणि काय योगायोग खरोखर काही वर्षांनंतर वै मल्हारबाबा जऊळकेवणी यांच्या रूपाने पाटील बाबांचा शब्द खरा ठरवणारे पाटील बाबांचे शिष्य जन्माला आले. पाटीलबाबांचा वारसा नंतर मल्हारबाबांनीच समर्थपणे चालवला होता. संत पाटीलबाबांनी पंढरपुराहून विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पायी आणून जोपुळ येथे 3 मजली भव्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधले. हे मंदिर सागाच्या लाकडांपासून बनवलेले असून अतिशय सुबक मांडणी असलेल्या विठ्ठल मंदिर आणि मंदिरातील मोहक विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही.

संत पाटीलबाबा महाराजांसोबत त्याकाळातील वारकरी संप्रदायातील अनेक थोर विभूती होत्या. प्रामुख्याने वै भानुदास महाराज बेलापूरकर, सरला बेटावरील वै गंगागिरीजी महाराज, वै. रामभाऊ महाराज देहूकर, वै. केदारबाबा कराडकर, नेवासा येथील वै. दादा महाराज आणि जोपुळचे संत पाटीलबाबा महाराज यांनी सर्वांनी मिळून पुनतांबे, ता नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील संत चांगदेव महाराज यांचे मंदिर उभारले. तसेच वै. गंगागिरीजी महाराज, संत पाटीलबाबा महाराज यांनी मिळून त्रंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध घेतला. खरे तर संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली हे त्याकाळी सर्वांना ज्ञात होते. प्रथमतः सुरुवातीच्या काळात संत निवृत्तीनाथांच्या समाधी बद्दल अनेक भक्तांना ज्ञात होते असे म्हणतात. परंतु अठराव्या शतकात इस्लामी आक्रमणांमुळे आणि काळाच्या ओघात त्रंबकेश्वर येथील दाट जंगलामुळे निवृत्तीनाथांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे निवृत्ती नाथांची समाधी नक्की कुठे आहे हे नंतर कुणालाच आठवत नव्हते. एका अर्थाने निवृत्तीनाथांची समाधी नक्की कुठे असेल हे शोधणे अवघड होऊन बसले होते. कित्येक लोकांनी शोध घेऊन देखील समाधीचा शोध लागत नव्हता. योगायोगाने वै. गंगागिरीजी महाराज, वै. भानुदास महाराज, संत पाटीलबाबा महाराज आणि इतरांनी मिळून त्रंबकेश्वरात संत निवृत्तीनाथ समाधीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु अनेकदा प्रयत्न करूनही तेथे असलेल्या अनेक साधूसंतांच्या समाधीमध्ये आणि घनदाट जंगलात संत निवृत्तीनाथांची समाधी नेमकी कोणती याचा शोध घेणे अत्यन्त कठीण काम होते. एखादा महान योगी पुरुषच हे आव्हान पेलू शकत होता, आणि ते योगीपुरुष संत पाटीलबाबा हेच होते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध घेत असताना एक दिवस पाटीलबाबांच्या स्वप्नात साक्षात संत निवृत्तीनाथ महाराज आले आणि त्यांनी पाटील बाबांना दृष्टांत दिला की, "जा.. ज्या ठिकाणी समाधीवर तुला वाघ बसलेला नजरेस पडेल तीच माझी समाधी असेल." निवृत्तीनाथांनी स्वप्नात पाटीलबाबांना स्वप्नात दृष्टांत देत आदेश दिला, कि संतांनी दिलेल्या महान वारशाचा प्रचारप्रसार करावा. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी पाटीलबाबांनी सहकाऱ्यांसोबत समाधीचा शोध घेतला असता खरोखर निवृत्तीनाथांच्या समाधीवर एक वाघ बसलेला होता. बाबांना बघताच वाघ समाधीवरून उठून शांतपणे निघून जात तेथील घनदाट जंगलात अदृश्य झाला. अश्याप्रकारे संत निवृनींनाथांच्या समाधीचा शोध लागला. नंतर त्या ठिकाणी संत पाटीलबाबा, वै. गंगागिरीजी महाराज यांनी निवृत्तीनाथांचे मंदिर बांधले. जनतेला निवृत्तीनाथांच्या समाधीस्थानाबद्दल माहिती दिली.

संत पाटीलबाबांनी त्याकाळी सर्वप्रथम जोपुळ ते त्रंबकेश्वर अशी पौष पायी वारी सुरू केली. ती वारीसुद्धा आजतागायत सुरू आहे. सध्याच्या काळात ज्या भव्यदिव्य दिंड्या त्रंबकेश्वरात दाखल होतात आणि भव्य पौष वारी भरते त्याचे संपूर्ण श्रेय संत पाटीलबाबांनाच जाते. जोपुळच्या दिंडीला अगदी मागच्या काही वर्षांपर्यंत प्रथम मान होता. संत पाटीलबाबा महाराज कायम पुनतांबे, पंढरपूर, आळंदी, देहू, त्रंबकेश्वर, सासवड आदी तिर्थक्षेत्रांची पायीवारी न चुकता करत असत. संत पाटील बाबा महाराजांचा वै. ह भ प 'सदगुरू जोग महाराजांशी निकटचा संबंध होता'. महाराष्ट्रात जोग महाराजांसोबत पाटीलबाबांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार करत अनेक ठिकाणी स्वहस्ते हरिनाम सप्ताह बसविले. आजही महाराष्ट्रातील कोकणपट्टा, नाशिक जिल्हा, मराठवाडा, विदर्भ परिसर आणि आळंदी-पंढरपुरातील जुने जाणते वारकरी वै. स्वानंदसूखनिवासी संत पाटीलबाबांबद्दल आदराने माहिती सांगतात.

अश्या या थोर संत पाटीलबाबांनी इ स 1900 साली जोपुळच्या दक्षिणेकडे असणाऱ्या त्यांच्या ध्यानाच्या आणि एकांतवासाच्या जागी आपला देह ठेवला आणि वैकुंठाकडे प्रयाण केले. ग्रामस्थांनी तेथेच संत पाटीलबाबांची समाधी उभारली. नंतर इ स 1956 साली संतपाटील बाबांचे भक्त वै ह भ प भीमसिह महाराज भगवानगड यांच्यासोबत वै ह भ प रामभाऊ महाराज जाधव (माळी) यांनी संत पाटीलबाबांचे मंदिर उभारणीचा संकल्प केला. वै. रामभाऊ महाराजांनी मंदिर बांधणीच्या कालावधीत सुमारे 12 वर्षांचा उपवास करून आपला संकल्प इ स 1968 साली पूर्ण करून संत पाटीलबाबा समाधी मंदिराचे कलशारोहन झाल्यानंतर वै. भीमसिह महाराजांच्या हस्ते उपवास सोडला. त्या वर्षी इ स. 1968 साली जोपुळ गावात भव्य नामसप्ताह झाला. या सप्ताहात मान्यवर कीर्तनकार तसेच प्रवचनकारांची कीर्तने झाली. काल्याचे कीर्तन वारकरी संप्रदायाचे भूषण वै. मामासाहेब दांडेकरांचे झाले होते आणि त्याच दिवशी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प पु पांडुरंग शास्त्री आठवलेजी पाटील बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जोपुळ येथे आले होते. या दोन महात्म्यांची भेट जोपुळ येथे झाली होती.

जोपुळ येथे संत पाटीलबाबा महाराजांनी बसविलेला अखंड हरिनाम सप्ताह आजपर्यंत अनेक विद्वान सांप्रदायिक किर्तनकारांच्या कीर्तनाने पावन झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक थोर संत कीर्तनकार पूर्वी संत पाटील बाबांच्या नामसप्ताहात भेट द्यायचे आणि पाटील बाबांच्या चरणी कीर्तन सेवा करायचे. पाटीलबाबांच्या वैकुंठ-गमनानंतर जोपुळ हे दिंडोरी तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे 'प्रति-पंढरपूरच' बनलेले आहे. जोपुळ गावात सप्ताह असला की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी संतमंडळी येतात. जोपुळ मधील सप्ताहाच्या काळात इतकं अन्नदान होत होत की परिसरातील गावांमध्ये चुली पेटत नव्हत्या. असं जुनेजाणते गावकरी अभिमानाने सांगतात. परिसरातून लांबलांबच्या गावागावातील गोरगरीब जनता आनंदाने जोपुळमध्ये कीर्तनसेवा ऐकण्यासाठी जमा होत असत. पाटील बाबांच्या पश्चात जऊळके वणीचे वै मल्हारबाबा महाराज यांनी समर्थपणे सप्ताहाचे व पाटीलबाबांच्या ज्ञानदानाचे नेतृत्व केले होते. जोपुळच्या भाद्रपद महिन्यातील गेल्या 181 वर्षांपासून अखंडपणे सुरू असणाऱ्या नामसप्ताहामध्ये संत पाटीलबाबा महाराज, वै. संत मल्हारबाबा यांच्या नंतर आतापर्यंत वै ह भ प विठ्ठल महाराज चौधरी, वै ह भ प नथुसिह महाराज राजपूत, वै ह भ प विठ्ठल महाराज घुले, वै ह भ प मामासाहेब दांडेकर, वै. ह भ प भीमसिह महाराज भगवानगड, परभणीचे वै.ह भ प नामदेव महाराज पठाडे, वै. ह भ प किसन महाराज काजळे, हनुमत महाराज गडकरी, रामभाऊ महाराज जोपुलकर, रामगिरी महाराज वावीकर, वै मुरलीधर आबा मोहाडीकर, चिंचखेडचे वै लालबाबा महाराज, वै पुरुषोत्तम महाराज, खेडगावचे वै दामोदर महाराज यांनी समर्थपणे नेतृत्व व किर्तनसेवा जोपुळ गावात केली होती. तसेच महाराष्ट्रातील महंत महामंडलेशवर डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर गेल्या 51 वर्षांपासून किर्तनरूपी सेवा करत आहेत. मागील काळात संदीपान महाराज शिंदे, पांडुरंग महाराज घुले, नामदेव महाराज शास्त्री भगवानगड, दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्राचे प्रणेते मोरे माउली आण्णा तसेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदगाचार्य यांनी जोपुळच्या सप्ताहात संत पाटीलबाबा महाराजांच्या चरणी सेवा समर्पित केली आहे.

संदर्भ[संपादन]