श्री.नी. चाफेकर
श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर (जन्म : अंमळनेर, २ ऑगस्ट, १८७७; - १७ डिसेंबर, १९४२) हे पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजात आणि डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते. ते संस्कृतचे प्रगाढ पंडित होते.
शिक्षण आणि व्यवसाय
[संपादन]चाफेकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात झाले. मुंबई विद्यापीठाचे मराठी विषयाचे ते पहिले एम.ए. (१९०३) मुंबईत काही वर्षे शिक्षकाची नोकरी केल्यावर त्यांनी १९१३ साली एल्एल.बी. केले. नंतर एलिचपूरला जाऊन त्यांनी आठ वर्षे वकिली केली. १९३१ सालापासून ते पुण्यात प्राध्यापकी करू लागले.
चाफेकर ते कवी होते. ’श्रीकृष्ण’ या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. तसेच ते चांगले साहित्यसमीक्षकही होते. ना.म. भिडे यांनी संपादित केलेल्या काव्यचर्चा या इ.स. १९२५ साली प्रकाशित झालेल्या काव्यसमीक्षात्मक ग्रंथात श्री.नी. चापेकर यांचा रसव्यवस्थेवरील एक महत्त्वाचा लेख आहे.
नाट्यक्षेत्र
[संपादन]श्री. नी. चाफेकरांना नाटकाची खास आवड होती. उत्तम नाटक कशा प्रकारे असावे याचा त्यांनी अभ्यास केला होता, आणि रंगभूमीवर काम करणाऱ्या नाटक मंडळ्यांना आणि नटांना ते आपले मत वेळोवेळी सांगून मार्गदर्शन करीत असत. अभिनयाच्या क्षेत्रातही ते चांगले जाणकार होते. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले होते.
श्री.नी. चापेकर हे प्रसिद्ध नट नानासाहेब चाफेकर यांचे बंधू होत.
श्री.नी. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- एकावली (काव्यसंग्रह, १९३३). या संग्रहातल्या सर्व कविता एकश्लोकी आहेत.
- गुणसुंदरी (सरस्वतीचंद्र या गुजराती कादंबरीचा मराठी अनुवाद, १९०३)
- सुवर्णचंपक (काव्यसंग्रह, १९२८)
सन्मान
[संपादन]पुणे येथे १९२३ साली भरलेल्या १९व्या, आणि १९२७ साली झालेल्या २२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद श्री.नी. चाफेकर यांनी भूषविले होते.