व्यंकटराव रणधीर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर
जगात सामान्य माणसांतून कधीकधी असामान्य व्यक्तिमत्व तयार होते, ज्यांच्यामागे कोणताच वडिलोपार्जित वारसा नसतो. अश्या व्यक्ति स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या असतात. परिस्थिती त्यांना घडवित असते. जसे आगीत तापून सोन्याला अधिक झळाळी प्राप्त होते तसेच या कर्तृत्त्ववान व्यक्तींचे जीवन असते. असेच एक महनीय व्यक्तिमत्व म्हणजे खानदेशातील स्वातंत्र्य सेनानी, सातपुड्याच्या परिसरातील एक प्रकाशाचे बेट, सातपुड्यातील झुंजार लढवय्या, एक पारदर्शी समाजसेवक, एक बंडपीठ, एक सगुणसाकार जिद्द, एक ध्येयनिष्ठ धावपळ, किसानोद्धारक, एक बुलंद कडा, संयुक्त महाराष्ट्राचा खंदा शिपाई, बोराडीचा अभिमन्यू अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जातो ते कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर. अनेक नामवंत साहित्यिक, लेखक, राजकारणी, समाजसुधारक लोक कर्मवीर अण्णाबाबांविषयी गौरवोद्गार काढतात. सर्वसामान्य लोक प्रेमाने त्यांना ‘अण्णाबाबा’ म्हणत.
बालपण
कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचा जन्म ५ मे १९२३ रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर मधील शिंगावे या गावात तानाजी आणि बनुमाय रंधे या परीट दांपत्याच्या पोटी झाला. अण्णांचे मूळ गाव रुदावली होते. या गावात ते दीड ते दोन वर्षे राहिले.[१] तानाजी आणि बनुमाय हे आपला पारंपारिक परीट व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी व्यंकटराव पितृ छत्राला पारखे झाले. उदरनिर्वाहासाठी पुढे बनुमाय बोराडी या गावी आल्या, तेव्हा अण्णांचे वय चार वर्षे होते.[२] बोराडीला आल्यावर बनुमाय सुरुवातीला अतिशय साध्या घरात रहात होती. मात्र तरीही तिचा स्वाभिमानी स्वभाव टिकून होता. त्याचा परिणाम अण्णांवर देखील झाला. बनुमाय गरजू स्त्रियांना आधार देत असत, हाच वारसा अण्णांनी देखील चालविला.
अण्णांचे बालपण आजारपणात गेले. बनुमाय त्यांच्यासाठी काहीही उपचार करायला कचरत नसत. परिणामी संधीवाताच्या आजारातून अण्णा चांगले झाले. बनुमाय जरी निरक्षर असली तरी तिला शिक्षणाचे महत्व कळले होते.[३] त्यातून तिने अण्णांचे व वंजीनाना या आपल्या मुलांचे शिक्षण पार पाडण्यासाठी आटोकाट परिश्रम घेतले. सन १९३५ साली बनुमायने अण्णांचे पुढील शिक्षण धुळे येथे करायचे निश्चित केले. तेथील १४ नंबरच्या शाळेत अण्णांचे नाव टाकण्यात आले. मात्र सुरुवातीला अण्णांचे शाळेत मन रमले नाही. ते लवकरच घरी परत आले. त्यांना परत आलेले पाहून बनुमाय अतिशय दुःखी झाली. अण्णांना बनुमायने गुराखी म्हणून कामाला लावले. काही दिवसातच अण्णांचे मन पालटले आणि त्यांनी पुन्हा शिकण्याचा निर्धार केला. पुढील शिक्षणासाठी अण्णांना दादासाहेब घोगरे यांच्या बोर्डिंग मध्ये प्रवेश मिळाला. याच दरम्यान अण्णांनी शिक्षण घेताघेता कष्टाची कामे करून पैसे जमा करायला सुरुवात केली.[४]
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग
धुळे हे जिल्ह्याचे केंद्र असल्याने तेथे वर्तमानपत्रे, वाचनालये उपलब्ध असत. सभा संमेलने होत. या सर्वांचा अण्णांवर परिणाम झाला. त्यांच्या मनात क्रांतिकार्याचे स्फुलिंग पेटले. येथेच अण्णांची ओळख धुळ्यातील फकिराअप्पा, विष्णू भाऊ, देवमन दादा, ब. ना. कुंभार गुरुजी, पांडुरंग राजाराम घोगरे अशा देशप्रेमाणे प्रेरीत लोकांची अण्णांसोबत ओळख झाली. त्यांच्या सोबत राहून अण्णा देखील स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले.
त्यावेळी सन १९४२ हे आंदोलन भरास आलेले होते. तुरूंग भरती तेव्हा जोरात होती. अण्णांना देखील पकडण्यात आले. नंतर त्यांना विसापूरच्या तुरूंगात ठेवण्यात आले. विसापूरच्या तुंगात त्यांची ओळख ‘खतरनाक व भयंकर कैदी’ अशी झाली होती. त्यांच्या हाता पायात बेड्या टाकण्यात आल्या होत्या. चार महीने या बेड्या त्यांच्या हाता पायात होत्या. अखेरीस १४ जानेवारी १९४२ रोजी तुरूंगातून अण्णांना मुक्त करण्यात आले.[५]
सन १९४२ ला महात्मा गांधीनी ‘चले जाव’ चा नारा दिला होता. त्यात सहभागी होण्यासाठी अण्णा काँग्रेस सभासद होण्यास गेले. मात्र कमी वयाचे असल्याने त्यांना सभासद होता आले नाही. पुढे ते काही क्रांतीकारकांना भेटले आणि त्यातून त्यांच्या क्रांतिकार्याला सुरुवात झाली.
धुळ्यात शेळकर नावाचे एक पोस्टमन होते. त्यांना बॉम्ब तयार करता येत होता. अण्णांना त्यांच्याकडून एक बॉम्ब मिळाला. त्यांनी तो बॉम्ब पोस्ट ऑफिसावर फेकला. मोठा आवाज करीत बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब टाकून अण्णा आणि त्यांचे मित्र पळून गेले. शेळकर यांच्या खिशात एकदा बॉम्ब फुटला त्यावरून ते पकडले गेले. शेळकर आता आपले नाव सांगेल म्हणून अण्णा भूमिगत झाले.[६] विष्णू पाटील, यशवंत तोताराम, भैय्या गुरव, देवराम पाटील हे यावेळी भूमिगत चळवळीतील अण्णांचे सहकारी होते. त्यांनी सर्वानी मिळून बोराडी येथील फॉरेस्ट बंगला जाळण्याचा कट आखला.[७] २२ मे १९४४ रोजी आपल्या मित्रांसह अण्णांनी बोराडीचा फॉरेस्ट बंगला जाळला. आगीत बंगल्याची राख झाली. तत्काल अण्णा आणि त्यांचे मित्र भूमिगत झाले. अण्णांच्या विरुद्ध पकड वॉरंट निघाले. त्यांच्यावर सरकारने १००००/- रूपयांचे बक्षीस लावले.[८] केवळ इतकेच न होता अण्णांना दिसताच गोळी मारण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले. बोराडीहून निघून अण्णा मुंबईला आले. तेथून त्यांनी जळगाव मार्गे जाणाऱ्या नागपूर गाडीत प्रस्थान केले. मध्ये बोरगाव मंजू येथे गाडीला अपघात झाला. अपघातातून अण्णा बचावले. गाडीतून उतरून ते वरणगावला आले. तेथूनच चुकून मद्रास-हैदराबाद-नागपूर असा प्रवास करत चंद्रपूर येथून चाळीस किमी अंतरावर असलेल्या ‘मूळ’ या गावी मुल्लाचा वेष धारण करून सात महीने तेथील गोंड कुटुंबात राहीले.[९]
मूळ येथून निघून अण्णा जळगाव मधील नशिराबाद येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी झुगेरी साहेब यांच्या मळ्यात मुक्काम केला. झुगेरी साहेब जेव्हा नमाज पढायचे तेव्हा अण्णा देखील नमाज पढत. झुगेरी साहेबांनी त्यांना कुराण पठण, सुतकताई देखील शिकविले.[१०]
नशिराबाद येथे काही दिवस राहून अण्णा नाशिकला आले. पुढे काही दिवसांनी ते पंढरपूरला एका मित्राच्या घरी आले. याच काळात त्यांची आणि व्यंकटेश माडगूळकर यांची भेट झाली. तेथून अण्णा परत धुळ्याला आले.
परतल्यावर पुन्हा एकदा क्रांतिकारी चळवळ पुढे चालवण्याचे अण्णांनी आपल्या मित्रांसोबत मिळून ठरविले. त्यासाठी पैसा लागणार होता. तो खाजगी व्यक्तींची लूट करून जमा करण्यात येत असे. मात्र हा मार्ग महात्मा गांधींना रुचत नव्हता. त्यामुळे अण्णांनी दूसरा मार्ग शोधला. तो मार्ग होता सरकारी पैसा लुटायचा. यावेळी शिरपूर ट्रेझरी लुटण्याचा अण्णांनी शंकरराव माळी आणि गोपीचंद या मित्रांच्या मदतीने बेत आखला. तिघांनी एकत्र येऊन ट्रेझरी लुटण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला.
अण्णांनी परत एकदा लुटीचा बेत आखला. यावेळी शंकरराव पोपटराव, धुडकू ठाकरे, उत्तमराव पाटील आणि अण्णा या सर्वांची बैठक झाली. धुडकू ठाकरे यांनी सातारा येथील बँक लुटण्याचा विचार मांडला. मात्र त्यात शेतकऱ्यांचे पैसे असल्याने ते लुटणे अयोग्य म्हणून हा बेत रद्द करण्यात आला.
पुढे साक्री येथील कचेरी लुटण्याचा बेत आखला गेला. त्यासाठी गाडी लागणार होती, त्यावर चालक लागणार होता. अण्णांनी पुणे येथून गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.[११] दोन महीने यात गेल्यानंतर परत दोन महीने योजना आखण्यात गेले. क्रांतीकारकांना बंदुका लागणार होत्या. त्या बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण बोरकुंड वडजाई डोंगरात घेण्यात आले. सावळदा या ठिकाणी आता क्रांतीकारक गोळा होऊ लागले होते. यात तीन महीने गेले. दरम्यान अण्णांना कळले की तळोदा येथे सरकारी खजिना नेला जात आहे. तळोदेस त्यांचे मित्रजन त्यांना रक्कम, रसद, इत्यादी अशी मोलाची साथ देणारे श्री. भावडू भाऊराव हे सृजन होते.
हि रक्कम लुटण्यासाठी अण्णा, उत्तमराव पाटील व अजून एक व्यक्ति असे तिघे निघाले. वडजाईचा एक पोलीस क्रांतीकारकांचा मित्र होता, त्याने सल्ला दिला की घाई करू नका. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगीतले की वडजाई येथे धरपकड केली जाणार आहे. त्यामुळे सर्व क्रांतिकारक तेथून निघून गेले. पोलीस येथे धरपकड करण्यासाठी आले मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
मार्च १९४४ च्या मध्यावधीत साताऱ्याहुन नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. लाड, निवृत्ती कळके यांच्यासह १६ क्रांतिकारक बंदुकासह धुळे येथे आले. त्यांनी बोरकुंड(जि. धुळे)जवळ एका शेतात १५ दिवस मुक्काम केला. त्यांना दयाराम पाटील, श्री. भावडूभाऊ राव पाटील हे क्रांतिकारक गोपनीय माहिती पुरवित असत. नंतर अण्णांना कळले की धुळे येथून नंदुरबार कडे साडेपाच लाखांचा खजिना जाणार आहे.[१२] तात्काळ त्यांनी ही गोष्ट उत्तमराव पाटील यांना सांगितली. नंतर इतर क्रांतीकारकांना ही खबर देण्यात आली. हा खजिना लुटण्याचे सर्वानुमते नक्की करण्यात आले. यासाठी चिमठाणे येथे रस्त्यावर मोटार अडवून खजिना लुटणे अशी योजना तयार करण्यात आली.[१३]
या कामात व्यंकटरावअण्णा यांच्यासह शिवराम पाटील, दमयंतीबाई गुरव, शंकरराव माळी, राम माळी (शिरपुर), उत्तमराव पाटील, भावडु भाऊराव पाटील (तळोदा), अप्पादाजी पाटील, रावसाहेब शेळके, यशवंतराव पाटील (जुणवणे), सखाराम शिंपी (शहादा),नरोत्तमभाई पटेल, माणिक भील (प्रकाशा जि. नंदूरबार), फकीरा पाटील (शहादा), केशवराव वाणी (वडजाई ता. धुळे), मेनकाबाई नाना देवरे, रामदास पाटील (देऊर ता.साक्री), झुलाल भिलाजीराव पाटील, गोविंदभाई पाटील, वामनराव पाटील यांचा सहभाग होता. तर अनेक जणांनी भूमिगत राहून मदत केली. दि.१४ एप्रिल १९४४ रोजी खजिना नंदुरबार येथे जाणार होता. यासाठी याच दिवशी लूट करण्याचे नक्की करण्यात आले. दि.१४ एप्रिलच्या सकाळी ब्रिटिश खजिना घेऊन नंदूरबारला निघालेल्या गाडीमध्ये चालकाशेजारी खजिनदार कारकुन, मधल्या खजिन्याच्या पेटया व मागे सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलिस बसलेले होते. अण्णा आपल्या साथीदारांसह धुळे येथून गाडीचा पाठलाग करत तीन आणि पाच अशा दोन टोळ्यांत क्रांतिकारक चिमठाणे येथे आले. चिमठाणा येथे पोलिस चौकी असल्याने तिथे खजिना न लुटता जरा अलीकडे खजिना लूटण्याची योजना आखण्यात आली. दोन टोळ्या पिशव्या घेऊन पुढे गेल्या तर दोन टोळ्या चिमठाणा येथेच खजिन्याच्या गाडीमागे थांबल्या. या टोळीमधील काही क्रांतिकारकांनी लग्नाचे कारण सांगून गाडीत प्रवेश मिळवला. साडेदहा वाजता गाड़ी साळवे फाटयाजवळ आली. गाडीमध्ये असलेल्या क्रांतिकारकांनी खोकला उलटीचे नाटक करत खिडकीतुन डोके बाहेर काढत उभ्या असलेल्या क्रांतिकारकांनी लाल रुमाल दाखवत इशारा केला. सावध असलेल्या क्रांतिकारकांनी गाड़ी अडवत सर्व क्रांतिकारक तूटून पडले. 'महात्मा गांधी की जय! वंदे मातरम!' अशा घोषणा देत तब्बल साडेपाच लाख रुपये खजिना धोतर, रुमाल पिशव्यामध्ये भरून ठरल्याप्रमाणे क्रांतिकारक लामकानी, दोंडाईचा येथे पळून गेले. घोषणा ऐकून गाडीमधील पोलिसाना हे क्रांतिकारक असल्याचे कळले. त्यांनी तत्काळ वरिष्ठाना ही घटना कळवली. पोलीसांनी अनेक दिवस चाललेल्या शोध मोहिमेत काही क्रांतीकारक पकडले गेले. पकडलेल्या क्रांतीकारकावर गुन्हे नोंदवण्यात येऊन शिंदखेडा व धुळे कोर्टात केस चालवण्यात आली. तब्बल १४८ पानाच्या या निकालपत्रात १८.०२.१९४६ रोजी व्यंकटराव रणधीर, शंकर पांडु माळी, धोंड़ीराम तुकाराम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली तर विष्णू पाटील, शिवाजी सावंत यांना निर्दोष सोडून देण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व क्रांतीकारकांची सुटका झाली. व्यंकटराव अण्णा यांची सुटका १४ ऑगस्ट १९४७ रोजी झाली.[१४] तुरूंगातून बाहेर पडल्यावर त्यांना घ्यायला आर. डी. गांधी हे आले होते. तेथून धुळे शहरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे रूपांतर गरूड हायस्कूलच्या मैदानावर सभेत झाले. सभा आटोपल्यावर अण्णांना हबीब सेठ यांच्या मोटारीतून शिरपूर येथे आणण्यात आले.[१५] येथील सत्कार व सभा आटोपल्यावर अण्णांना रात्री तीन वाजता बोराडी येथे आणले गेले. दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी बोराडीत अण्णांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. गावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अण्णांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी या सभेत आपल्या भाषणात 'स्वातंत्र्य म्हणजे काय?' हे समजावून सांगीतले. अशा प्रकारे अण्णा खऱ्या अर्थाने आदरणीय होते.
वसा आणि वारसा
कर्मवीर अण्णा बाबांनी सुरू केलेल्या कार्यात मा. विश्वासराव रंधे, मा. विजयराव रंधे या त्यांच्या सुपुत्रांनी मोलाची भूमिका बजावली. आज तिसऱ्या पिढीतील अण्णांचे नातू डॉ. तुषार विश्वासराव रंधे, निशांत विश्वासराव रंधे,राहुल विश्वासराव रंधे,शशांक विश्वासराव रंधे, रोहित विजयराव रंधे यांनी अण्णांचे कार्य पुढे नेले आहे. डॉ. तुषार रंधे हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. निशांत रंधे किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सेनेट सदस्य आहेत. राहुल रंधे हे बोराडी गावाचे उपसरपंच आहे. रोहित रंधे शिरपूर पालिकेचे नगरसेवक असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी सेनेट सदस्य आहेत. या सर्वांच्या कामातून, कर्तृत्वातून कर्मवीर अण्णा बाबांनी सरू केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याचा वसा आणि वारसा जपला जात आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ पापळकर, लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. pp. १५.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). श्री. एन. एन. लुंगसे. pp. ५.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. २४.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ३१.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ३८.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). शिरपूर: श्री. एन. एन. लुंगसे. p. २०.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). शिरपूर: श्री. एन. एन. लुंगसे. p. २०.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ४४.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ५०.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ५२.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). शिरपूर: श्री. एन. एन. लुंगसे. p. २७.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). शिरपूर: श्री. एन. एन. लुंगसे. p. ३२.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). शिरपूर: श्री. एन. एन. लुंगसे. p. ३२.
- ^ पापळकर, श्री. लक्ष्मणराव (१९९७). शिल्पाचे आजोबा. शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ८२.
- ^ लुंगसे, प्रा. डॉ. सौ. रजनी (२०१०). स्वयंप्रकाशी (कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे जीवन चरित्र). शिरपूर: कर्मवीर व्यंकटराव तानाजी प्रतिष्ठान. p. ४८.