वॉरन हेस्टिंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अलीपूर येथे वॉरन हेस्टिंग्स आणि त्याची पत्नी मेरियन.

वॉरन हेस्टिंग्स (६ डिसेंबर, इ.स. १७३२:चर्चिल, ऑक्सफर्डशायर, इंग्लंड - २२ ऑगस्ट, इ.स. १८१८:डेल्सफोर्ड, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड) हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. रॉबर्ट क्लाइव्हने पाया घातलेल्या भारतातील ब्रिटिश राजवटीला हेस्टिंग्सने बलाढ्य बनविले.

हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते.[१] वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकायला असताना हा युनायटेड किंग्डमचा भविष्यातील पंतप्रधान लॉर्ड शेल्बर्न आणि विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक तसेच कवी विल्यम काउपर यांचा समकालीन होता.[२]

हेस्टिंग्स १७५०मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला व त्यासाठी कोलकात्यास आला.[३] हेस्टिंग्स कष्टाळू म्हणून प्रसिद्ध होता. त्याने भारतात आल्या आल्या येथील चालीरीती तसेच उर्दू आणि फारसी भाषा शिकून घेतल्या.[४] त्याच्या कष्टाचे चीज म्हणून १७५२मध्ये त्याला कासीमबझार येथे बढतीसह पाठविण्यात आले. तेथे त्याने विल्यम वॉट्सच्या देखरेखीखाली पूर्व भारतातील राजकारणाचे धडे घेतले. याच सुमारास बंगालचा नवाब अलिवर्दी खान मृत्यूशय्येवर होता व त्याचा नातू सिराज उद दौला सत्तेवर येणे अपेक्षित होते. सिराज उद दौला युरोपीय लोकांच्या विरुद्ध होता व त्यांच्या राजकीय लुडबुडीस त्याचा सक्त विरोध होता. सत्तेवर आल्याआल्या बंगालच्या सैन्याने युरोपीय ठाण्यांवर हल्ले चढविले. त्यात कासीमबझारच्या इंग्लिश ठाण्यासही वेढा घातला गेला. आपल्यापेक्षा अनेकपटींनी मोठ्या असलेल्या शत्रूसैन्याविरुद्ध ब्रिटिशांनी शरणागती पत्करली.[५] हेस्टिंग्ससह तेथील सगळ्या युरोपीय व्यक्तींना मुर्शिदाबादमध्ये कैदेत टाकण्यात आले. त्यानंतर नवाबाच्या सैन्याने थेट कोलकात्यावर चाल करून तेथील इंग्लिश शिबंदीचा पाडाव केला व मुर्शिदाबादसह इतर ठिकाणच्या युरोपीय कैद्यांना कोलकत्यातील कारावासात डांबण्यात आले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. Lyall, Sir Alfred (1920). Warren Hastings. Macmillan and Co. पान क्रमांक 1.  Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)
  2. Turnbull, Patrick. Warren Hastings. New English Library, 1975. p.17.
  3. Turnbull p.17-18
  4. Turnbull p.19-21
  5. Turnbull p.23