वेदनेच्या तळाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'वेदनेच्या तळाशी...' ( प्र.आ. २०१९ ; सृजन प्रकाशन, मुंबई) हा कवी प्रभाकर गंभीर यांचा कवितासंग्रह आहे. परिवर्तनवादी व्यवहाराशी बांधिलकी मानणाऱ्या अस्वस्थ कार्यकर्त्याच्या जाणिवांची विविध काव्यरूपे त्यातून प्रकर्षाने व्यक्त होतात. दलित जीवनातील बदलत्या अनुभूतींची अनेक शब्दरूपे त्यातून पुढे येतात जगभरातील सर्वहारा वर्गाच्या व्यथा, वेदना आणि विद्रोहाच्या जाणिवाही त्यातून प्रत्ययकारकतेने अभिव्यक्त होतात. आंबेडकरी विचारधारेच्या वैश्विक मूल्यांचे अंगभूत वैशिष्टये अंगी बाणवलेली ही कविता समकालीन जातवर्गीय वास्तवाची विवेकनिष्ठ चिकित्सा करते. तिची ही वैशिष्टयपूर्णतः जागतिकीकरणोत्तर काळातील शोषितांच्या विस्तारित रूपाचे तीव्रतेने अधोरेखन करते. सोबतच या शोषित विस्तारीत समूहाच्या नवप्रबोधानावर भर देते.

कवी प्रभाकर गंभीर हे समूहाच्या अभिव्यक्तीतच आपल्या अभिव्यक्तीचे सौंदर्यमूल्य शोधतात. आपले अस्तित्व हे समष्टीच्या अस्तित्वाचा एक भाग आहे, याच जाणीवेतून ते समूहाच्या सांघिक सर्जनाचा कालसुसंगत पुनर्विचार मांडतात. यांसदर्भात ते त्यांचे म्हणणे असे, "कविता ही एक जोखीम आहे, त्यात दलित कविता ही एक मोठी जोखीम आहे. संख्यात्मकदृष्टया एक मोठं राष्ट्र सामावणारं दलितांचं जग आणि त्यांच्या जगण्याच्या बेरकेपणाची आगळीवेगळी वैशिष्टये भारतीय उपखंडात अजूनही कायम असून व्यापक सांस्कृतिक चळवळीच्या उभारणीच्या गरजेसोबतच एका विश्वव्यापी कला-साहित्य निर्मितीची ती मोठी उगमस्थाने आहेत, असे मला वाटते. व्यवस्थेने बहाल केलेल्या प्रचंड अभावग्रस्ततेतही आपल्या पावल्याएवढया भूमीवर भक्कमपणे पाय रोवून आणि सतत संघर्षरत राहून उद्याच्या पहाटेची स्वप्ने पाहत पाहत जगाला जीवनजगण्याची आगळीवेगळी कला शिकवणाऱ्या दलितांच हे जग साहित्यकलाक्षेत्रातील कलावंत - विचारवंत - बुद्धिवंतांकरिता आजच्या वर्तमानातही एका वेगळ्या प्रतिभासंवर्धनासाठी एक मौलिक उपलब्धी ठरावी असंच आहे, असे मला वाटते." (पृ. क्र. ३३-३४) कवीची ही भूमिका आपल्या पूर्वसुरींच्या सांस्कृतिक सचितांची बदलत्या सामाजिक परिप्रेक्ष्यातील नवी अभिव्यक्ती जाणवते. कवीची असे भूमिका हे घेणे समकालीन मराठी कवितेतील विरळ होणाऱ्या स्वराची नवी गर्जना जाणवते. कवी ज्या दलित जीवन जाणिवांची प्रस्तुत विधानात चर्चा करतात, ते जीवन खचितच खेडयांमधील व शहरांमधील अभावग्रस्त दलित आणि वंचितांच्या जगातील आहे. वेदनेच्या या तळाशी कवीची असणारी बांधलकीच कवीच्या संवेदनविश्वाला व्यापून आहे. पायाभूत सुविधांच्या अभावात खितपत पडलेल्या वर्गाच्या वेदना कवी अधिक महत्त्वाच्या वाटतात. या दृष्टीने कवितासंग्रहाचे 'वेदनेच्या तळाशी...' हे शीर्षक अधिक समर्पक जाणवते.

जेष्ठ समीक्षक डॉ. युवराज सोनटक्के यांनी या कवितासंग्राहावर भाष्य करताना असे म्हटले आहे, की " ' वेदनेच्या तळाशी ' या कवितासंग्रहात आक्रोश, तणाव व संघर्षाच्या विविध सोपनांचे रूपांकन झालेले दिसते. सामाजिक जीवनाच्या काळोखाला उदघटित करताना प्रभाकर गंभीर आपल्या कवितेत पूर्ण अस्वस्थतेने व आवेगाने अपेक्षित स्फोटाची बाब उघडपणे सांगतात. त्यांची मान्यता आहे की संघर्ष स्वतःच एक सार्थकता आहे. अत्याचार, अन्याय व शोषणाच्या भिंती तोडणे हे त्याचे साध्य आहे. कवी क्रांती आणि परिवर्तनांच्या स्वरांद्वारे या भिंतीनाच नव्हे तर पायालाही हादरे देऊ इच्छितो. कवीचा हेतू शब्दांचे जाळे पसरून शब्देतिहास घडविणे नाही, तर समाजाचा चेहरा बदलणे आहे.म्हणून या कवितेत जनक्रांतीचे प्रबळ स्वर ध्वनित व प्रतिध्वनित होताना दिसतात. या कवीने वैचारिकता व विद्रोहाच्या चिंतनाला आपल्या कवितेत गांभीर्याने, गहनतेने व योजनाबद्ध रीतीने मांडले आहे. (पृ. क्र. १४) या कवितासंग्रहातील कविता विविध विषयांवरील आहे. तर काही कविता या अनेक विषयांवर मार्मिक राजकीय भाष्य करणाऱ्या आहेत. माय , मला आहे अभिमान माझ्या पूर्वपिढीचा , हे क्रांतिच्या माये ! , तुझा जन्मोत्सव साजरा करताना, सूर्यकुलाचे सारथी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर : URGR FOR COMPASSION , रमाई , हे माझ्या प्रिय देशा ! , ज्यानबा वल्द राघोजी... , आदिवासी बनाम वनवासी , काउंटरींग कास्ट इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण आहे. काही कवितांमधील काही ओळी खालील दिलेल्या आहेत. त्यांवरून कवितेचे प्रातिनिधिक स्वरूप लक्षात येण्यास मदत होईल.


१) "हे खेडे, हे गाव, हे तांडे, हे पाडे / त्यातील ही बीपीएल बनवलेली घामासक्त बायाबापडे / शाळेच्या प्रमाणभाषेने ड्रॉपर करवलेली / त्यांची ही निरागस बाळे ज्ञानवंचित / हे सबसिडिचं जीर्ण धुडकं / फाटक्या अंगावर पांघरलेलं अर्धपोटी / दरसाल पिळवून काढणारं हे कृषिमायेचं लो बजेट / इमानेइतबारे तिला हिरवाकंच चुडा / भरवणारा हा बळीराजा गळाभर फसवलेला / ह्या अर्थभारित गोची झालेल्या जातीची माती पचवलेल्या / ग्रामराज्याच्या अठराविश्वे पंचायती" (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : URGR FOR COMPASSION, पृ. क्र. ६७-६८)

२) "आमचं रक्त, मांस, मननी मेंदू / ज्याने घडवलंय तो होता / दिलदारमनाचा राजा / तुझ्या घोर पापांना / त्याने करून टाकली आहे क्षमा / तो निर्मू शकला असता रे इतरांसारखं / आमच्यासाठी वेगळं बेट / पण शैशवापासून जपले होते त्याने / विश्वात्मक करुणेचे डोळे / तो गर्जत गेला बेटाबेटांतून / "आय ॲम इंडियन फर्स्ट ॲण्ड इंडियन लास्ट" / त्याचा गाज उरात साठवून / आम्हा करायचे आहे तुला डिकास्ट / हे माझ्या प्रिय देशा / सहस्त्रो मैल तुडवत आल्यालेत माझ्या पिढया" ( हे माझ्या प्रिय देशा !, पृ. क्र. ८३ )

३) "तो आता निळ्या छावणीतून / निसटून गेला आहे डीबीच्या प्रदेशात कायम / त्याचे असते आता शेड्युल बिझी / व्हिजीटबुकात नसते स्पेस स्लमसाठी / तो फिरून येतो वर्षातून एकदा कुल्लूमनाली /नी मूडचेंजसाठी अधीमधी आयफेल टॉवर / वर्षातून चारदा कापत असतो तो महागडा केक / पर्यटकी मनसुब्यातून अशी वाहत असते त्याची डबलडेक (डीबीच्या प्रदेशाततून , पृ. क्र. १०३)


यांसारख्या अनेक महत्त्वाच्या ओळींनी कवितासंग्रह अधिक लक्षणीय बनला आहे. जातिव्यवस्था ही केवळ दलितांच्या जीवनाला घेरून असणारी समस्या नसून ती शुद्रातिशूद्रांच्या पर्यायाने संपूर्ण भारतीय समाजाच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे. तिच्या निर्मूलनाचा क्रांतिकारक विचार प्रभाकर गंभीर प्रभावीपणे मांडतात. म्हणून त्यांच्या कवितेत शेतकरी, भटके-विमुक्त, कष्टकरी यांच्या मुक्तीचा विचार प्रकर्षाने व्यक्त होते. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे असे हे विश्वव्यापक रूप कवी प्रभाकर गंभीर आपल्या कवितेतून उभे केले आहे.

त्यातील प्रतिमा आणि प्रतीके प्रभावी आहेत. सूर्यकुळाशी नाते सांगणारी त्यांची प्रतिमासृष्टी प्रयोगशीलतेला प्राधान्य देते. त्यामुळे त्यात नाविन्य आहे. प्रतिमांचे हे जग दुर्बोधतेतून गूढगम्य होणे टाळते. तिच्यातील सामाजिक बांधिलकीचे भान तीव्र असल्याने त्यात अर्थप्रवाहीपणाला विशेष महत्त्व आहे. समकालीन मराठी कवितेत या कवितासंग्रहाचे वाड्मयीन मूल्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातील काव्यगुण  वैचारिक सामर्थ्य तसे समकालीन कवितेत दुर्मिळच जाणवते.