Jump to content

"गुञ्जारव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''गुञ्जारव''' हे इ.स.१९६५पासून महाराष्ट्रातील अहमदनगर येथून प्रसि...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

२२:५८, २२ मे २०१२ ची आवृत्ती

गुञ्जारव हे इ.स.१९६५पासून महाराष्ट्रातील अहमदनगर येथून प्रसिद्ध होणारे, एक संस्कृत भाषेतील त्रैमासिक आहे. या मासिकाचे भारताच्या अनेक राज्यांमधे वर्गणीदार आहेत. हे त्रैमासिक अहमदनगरच्या सनातन धर्मसभेचे कार्यवाह कै.पां.का.मुळे यांनी सुरू केले. त्यावेळी डॉ. व.त्र्यं.झांबरे त्रैमासिकाचे मुख्य संपादक होते. १९८६पासून त्याचे संपादक डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर आहेत. अंकाचे वर्गणीदार सुमारे पाचशे असावेत.

संस्कृतची आवड असणाऱ्या, तसेच भारतीय संस्कृतीविषयी आस्था असलेल्या व्यक्तीला संस्कृतचा व संस्कृतीचा अधिक परिचय व्हावा, आणि संस्कृतचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थिवर्गाला संस्कृतविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशांपोटी ‘गुञ्जारव’ हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते. भारतीय संस्कृती, नीतिमूल्ये, प्राचीन व अर्वाचीन साहित्य, भारतीय परंपरा, संस्कृतचे महत्त्व इत्यादी विषयांना या त्रैमासिकात प्राधान्य देण्यात येते. ‘गुञ्जारव’चे आजपर्यत ‘ज्ञानेश्वरी’, ‘रामदास’, ‘ज्ञानेश्वर महाराज’ आदी विविध विषयांवर विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. केवळ साठ रुपये वार्षिक वर्गणीमध्ये सुयोग्य माहिती असलेल्या, सुमारे चव्वेचाळीस पानी संस्कृत मजकुराच्या या अंकावर संस्कृतप्रेमी मनापासून प्रेम करतात.

त्रैमासिकाच्या वर्गणीदारांची संख्या कमी असली तरी शैक्षणिक संस्थांमधील वाचकवर्ग बराच असावा. हे त्रैमासिक संस्कृत काव्य, कथा, व्यक्तिपरिचय, ललित आदींनी नटलेले असते. त्याबरोबरच गुञ्जारवमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील साहित्य संस्कृत भाषेत भाषांतरित करून प्रकाशित करण्यात येते.

गुञ्जारवचे संपादक डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांना लखनऊच्या ‘उत्तरप्रदेश संस्कृत संस्थानम्‌’ या संस्थेकडून पत्रकारितेचा ‘नारद पुरस्कार’ मिळाला आहे.