"शकुंतला रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: २५ डिसेंबर १९0३ रोजी सुरू झालेली '''शकुंतला रेल्वे''' ही अनेक वर्ष वऱ... |
(काही फरक नाही)
|
००:०७, १० एप्रिल २०१२ ची आवृत्ती
२५ डिसेंबर १९0३ रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची लाइफलाइन होती. विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर, क्लिक-निक्सन अॅन्ड कंपनी या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशने होती.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती. तेव्हा त्याकाळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च तेव्हढी होती.
क्लिक-निक्सन अॅन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी असे झाले होते) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील १00 वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही २00३ पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. त्यामुळे स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे त्या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची रक्कम देत असे.
वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वऱ्हाडवासीयांना आपलेसे केले. त्यांच्या प्रेमात न्हाऊन अंगाखांद्यावर प्रवासी घेऊन किती वर्षे आपण धावतो आहोत, हे तिचे तिलाही कळले नसावे. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती.
या रेल्वेने, यवतमाळ-मूर्तिजापूर या ११४ किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंत ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १0५ रुपये घेते.
अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घेते. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. या एवढ्या वर्षांत या शकुंतलेत काही बदल झाले नाहीत. पूर्वी तीन डबे होते, पुढे ती संख्या पाचवर गेली. १९९४ पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. (ते इंजिन आता पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते.) १५ एप्रिल १९९४ पासून गाडीला डिझेल इंजिन लागले. मात्र, तिच्या वेगात काहीही बदल झालेला नाही.
आर्थिक दृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली, ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलीही स्टेशने न घेता धावते. असाच प्रकार मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाबाबत झाला आहे. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नाही, आणि कहर म्हणजे त्या स्टेशनांवरील बहुतेक कर्मचारी हलविण्यात आले आहेत.
ह्या दोन्ही रेल्वे बंद झाल्यावर, मूर्तिजापूर सोडले तर बाकी सारी गावे रेल्वेच्या नकाशावरून कायमची गायब होतील.