"आशालता करलगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: आशालता करलगीकर (जन्म : वैजापूर-औरंगाबाद जिल्हा, इ.स. १९४३; मृत्यू : ५... |
(काही फरक नाही)
|
२३:३३, १२ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
आशालता करलगीकर (जन्म : वैजापूर-औरंगाबाद जिल्हा, इ.स. १९४३; मृत्यू : ५ जानेवारी, २०१८) या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांचे वडील वकिली व्यवसायानिमित्त हैदराबादेत स्थायिक झाले होते, त्यामुळे आशालता यांची सांगीतिक कारकीर्द हैदराबाद शहरात बहरली. तेथे ‘भारतीय जीवन आयुर्विमा कॉर्पोरेशन’मधील नोकरी सांभाळून त्यांनी संगीत सेवा केली.
आशालता करलगीकर यांना संगीत महामहोपाध्याय पंडित स.भ. देशपांडे, डॉ. एन.के. कऱ्हाडे, पंडित व्ही.आर. आठवले यांचे मार्गदर्शन लाभले. करलगीकरांनी देशभरात शास्त्रीय गायनाचे दोन हजार कार्यक्रम केले. तेलुगू चित्रपटांसाठी आणि १९६६ मध्ये आलेल्या ‘मुजरिम कौन’ सारख्या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. मात्र, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत त्या अधिक रमल्या. भक्क्तिसात ओथंबलेले त्यांचे गायन ऐकून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना ‘आंध्रलता’ म्हटले. हीच उपाधी पुढे त्यांची ओळख झाली. शास्त्रीय संगीतात संथ ख्याल गायन त्यांच्या विशेष आवडीचे होते. सुगम गायन, भक्तिगीत, दादरा, गझल या प्रकारातही त्यांनी योगदान दिले. पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान यांच्यासोबत त्यांनी काबूल शहरात १९६३ साली गायन केले होते.
संगीतकार विश्वनाथ ओक ऑल इंडिया रेडियोत-आकाशवाणीत असताना ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे. त्यात आशालता गात असत. हैदराबादमध्ये संगीताचे शिक्षण झालेल्या करलगीकरांच्या गाण्यांचा बाज काहीसा कर्नाटकी अंगाने जाणारा होता. शब्दोच्चारही कधी कधी दाक्षिणात्य असायचे. त्यांचे उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. गाण्यातला शब्दार्थ त्यांना पक्का कळालेला असे. तो त्या स्वरांतून मांडत. त्यामुळेच पं. नाथराव नेरळकरांबरोबर त्यांनी देशभर हिंडून त्यांनी गझल मैफली केल्या.
त्यांच्या आवाजातला ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ हा एकनाथ महाराजांचा मराठी कूट अभंग प्रसिद्ध आहे. प्रत्येक मैफलीत हा अभंग त्या आवर्जून गात.
सूरमणी, सूरश्री यांसारख्या विविध पुरस्कारांनी करलगीकर यांना सन्मानित करण्यात आले होते.