"शिरपूर पॅटर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिरपूर पॅटर्न हा जलसंधारणाचा धुळे जिल्ह्यात २००६ सालापासून राब...
(काही फरक नाही)

०३:५४, ३० मे २०१६ ची आवृत्ती

शिरपूर पॅटर्न हा जलसंधारणाचा धुळे जिल्ह्यात २००६ सालापासून राबवला गेलेला एक कार्यक्रम आहे. भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर याचे निर्माते आहेत.

सुरेश खानापूरकर हे महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील निवृत्त भूवैज्ञानिक आहेत. शासकीय नोकरीत असताना वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आणि राजकीय पुढार्‍यांच्या मताने त्यांना काम करावे लागे. अभ्यास असूनही उल्लेखनीय कार्य करण्याची संधी त्यांना शासकीय नोकरीत लाभली नाही. शिरपूर येथे अमरीशभाई पटेल यांच्यासारख्या हुशार आणि विकासाने झपाटलेल्या आमदाराने नोकरीतून निवृत्त झालेल्या खानापूरकरांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि त्यांनी जलसंधारणात उल्लेखनीय काम करून या संधीचे सोने केले.

शिरपूर आणि परिसरात काळ्या मातीच्या थरानंतर रेतीचा थर आणि त्या खाली पिवळ्या मातीचा थर आहे. पिवळी माती पाण्याचा निचरा खाली होऊ देत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी खोलवर मुरत नसे. बंधारेच नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊन शेजारीच असलेल्या तापी नदीत मिसळे. पावसाळ्याचे दोन महिने गेले की पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागे. खानापूरकर यांचा जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न हा यावरचा कायमस्वरूपी उपाय ठरला.

शिरपूर तालुक्यात राबविला गेलेल्या या जलसंधारण कार्यक्रमाअंतर्गत विविध नाल्यांमध्ये दीडशेपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात आले. दोन बंधार्‍यांमध्ये ५०० मीटरचे अंतर ठेवले गेले. एका नाल्यातील पाणी १८ ते २० ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले. बंधार्‍याची जाडी सुमारे पाच फूट, रुंदी सुमारे २० ते ३० फूट आणि खोली ४० फुटापेक्षा अधिक होती.