"गुंडाचा गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पुणे शहरातील कसबा पेठेत गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ... |
(काही फरक नाही)
|
०९:४८, २७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
पुणे शहरातील कसबा पेठेत गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे.
पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. लोकमान्य टिळकांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म या गणपतीच्या आशीर्वादाने झाला असे सांगितले जाते. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी, असा अंदाज आहे.
सध्या (२०१६ साली) या मंदिराची देखभाल चंद्रशेखर मधुकर बाभळे, भालचंद्र यशवंत बाभळे व दीपक प्रभाकर बाभळे यांच्याकडे आहे. गणपतीच्या मूर्तीवरील कवच सन १९७५ साली निघाले. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला.
या मंदिरात पौष मासात गणेश पुराण व माघ महिन्यात गणेश जन्मानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
जीर्णोद्धार
उत्तर पेशवाईत बांधलेले हे गुंडाच्या गणपतीचे हे देऊळ अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तरीही त्याचे लाकडी छत, कळस, सभामंडप यांची डागडुजी करण्यात येणार आहे. मंदिराच्या मूळ रचनेला कोठेही धक्का न पोहोचविता हा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.
चतुःशृंगी येथील पार्वतीनंदन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार ज्या ‘किमया’ नावाच्या वास्तुविशारद संस्थेने केला होता आणि त्याची दखल युनेस्कोने घेतली होती, ती संस्था यागुंडाच्या गणपतीमंदिराचा जीर्णोद्धार करील.(२६-१-२०१६ ची बातमी). ’किमया’ला सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा युनेस्को एशिया पॅसेफिक हेरिटेज अॅवॉर्डही त्या कामासाठी मिळाला आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येणारा खर्च भाविकांच्या देणगीतून करण्यात येणार आहे.