"मास्टर दत्ताराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''मास्टर दत्ताराम''' वळवईकर(जन्म: वळवई १० जून १९१६; मृत्यू : वसई १२ जू... खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
(काही फरक नाही)
|
१२:४६, २२ मे २०१३ ची आवृत्ती
मास्टर दत्ताराम वळवईकर(जन्म: वळवई १० जून १९१६; मृत्यू : वसई १२ जून १९८४) हे मराठी नाटकांत काम करणार मोठे अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म वळवई या गोव्यातील खेड्यात झाला. विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून व माणूस म्हणून घडवले. मा. दत्तारामांचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते आणि दत्तारामबापूंनीही त्यांना अखेरपर्यंत पित्याचा मान दिला.
वयाच्या ९व्या वर्षी मास्टर दत्ताराम यांनी नाटकांच्या ओढीने घर सोडले, आणि ’कुंजविहारी’ नाटकात पेंद्याची विनोदी भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. ते गोव्यामधील प्रभात संगीत मंडळी’मध्ये पोहोचले. तेव्हा तिथे जुन्या मराठी संगीत नाटकांचा जमाना चालू होता. पण म्हणावी तशी नाटके चालत नव्हती. या स्थित्यंतरातून मा. दत्ताराम यांचे अभिनयकौशल्य कसाला लागून मान्यता पावले. अभिनयामध्ये व दिग्दर्शनामध्ये नव्या-जुन्या दोन्ही शैलींचा सुयोग्य वापर ते करू लागले. मास्टर गंगाराम व मा. दत्ताराम हे दोन वळवई येथील अभिनेते रंगभूमी गाजवू लागले.
जुन्या तालीममास्तरांचा पगडा दत्तारामांवर अधिक असला तरी, नव्या अभिनयशैली त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जुन्या नव्यांचा एक अपूर्व संगम त्यांच्या रंगशैलीत होता. प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या नाटकात अभिनय करताना त्यांनी आपला जुन्या नाटकातील अभिनय किंचितसा बाजूला ठेवून, ते नव्या अभिनयाला सामोरे गेले. तर 'कौन्तेय' आणि 'वैजयंती' या नाटकाच्या दिग्दर्शिका दुर्गा खोटे यांच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी तितकाच समर्थ अभिनय करून दाखवला. सखारामपंत बर्व्यांपासून ते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि केशवराव दातेपासून ते चिंतामणराव कोल्हटकरांपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली काम करून तेवढ्याच ताकदीचा अभिनय त्यांनी करून दाखवला.
उमेदीच्या काळात गोव्यातील नाटकांत अभिनय करून वयाच्या २२ व्या वर्षी मास्टर दत्ताराम मुंबईत लालबागला वास्तव्यास आले. लालबागमधील गणेशगल्लीतील हरदास मथुरादास चाळ नं. ४२, खोली नं. २२ हा त्यांचा पत्ता. तेव्हा दत्तारामच खऱ्या अर्थाने 'लालबागचा राजा' होते. त्यांच्या अभिनयामुळे सर्व लालबाग त्यांच्या प्रेमात होते. सकाळी उठून लालबाग मार्केटमधून पिशवीतून मटण, मासे, भाजीपाला इ. आणायचे काम ते स्वतःच करीत. वर्षाचे बारा महिने ते थंड पाण्याने आंघोळ करायचे. त्यांची आंघोळ अर्धा ते पाऊण तास चालायची. आंघोळ करताना त्या रात्री होणाऱ्या नाटकांचे संवाद जोरजोरात बोलणे चालू असायचे. लालबाग गणेशगल्ली येथील 'महाराष्ट्र सेवा मंडळा' चा नळसुद्धा दुपारी दत्तारामबापूंसाठी रिझर्व्ह असायचा. ते आंघोळ करून जाईपर्यंत दुसरा कुणीही आंघोळ करण्यासाठी तिथे येत नसे.
लालबागमध्ये आल्यावर परळच्या 'दामोदर हॉल' मध्ये त्यांची नाटके व्हायची. तिथे दत्तारामांच्या भूमिका पाहून गिरगांवातील साहित्यसंघाच्या नाटकांसाठी त्यांना बोलवणे आले. साहित्यसंघाच्या ’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी 'नटवर्य' हे बिरुद मिळवले. पुढे 'ललितकलादर्श' च्या 'दुरितांचे तिमिर जावो', 'पंडितराज जगन्नाथ', 'पडछाया' या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
मास्टर दत्ताराम यांनी तर नव्या दमाचे अभिनेते/अभिनेत्री डॉ. काशिनाथ घाणेकर, कृष्णकांत दळवी, रमेश देव, सीमा, श्रीकांत मोघे आणि पुढे सुप्रसिद्ध झालेल्या दिग्दर्शिका व अभिनेत्री विजया मेहता यांना नाट्यदिग्दर्शन केले.
दत्ताराम आणि देवव्रत
मास्टर दत्ताराम यांनी ’मत्स्यगंधा’ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली. त्या नाटकातील एका प्रयोगात, नाटक एका विशिष्ट उंचीवर जाऊन स्तब्ध होते. गंगापुत्र देवव्रताच्या भीष्मप्रतिज्ञेने प्रेक्षागृह अवाक् होत असे. मास्टर दत्तारामांच्या मुखातून तारसप्तकात देवव्रताचा पुढील निर्धार व्यक्त होत असे.
' देवव्रत तर संपला. या गंगातीरावर त्याची उत्तरक्रियाही आटोपली. आता उरलो आहे मीऽऽ मीऽऽ मी ऽऽऽऽ भीष्म! '
मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच.
रंगभूमी पवित्र आहे व तिचे पावित्र्य आपणाकडून राखले पाहिजे असे ते म्हणायचे. आणि म्हणूनच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकातील एक प्रमुख नट दारू पिऊन रंगमंचावर अभिनय करायला लागला, तेव्हा मा. दत्तारामांनी नाटकाच्या निर्मात्याला सांगून त्या प्रमुख नटाला काढून दुसऱ्या नटाला त्याच्या जागी उभे केले, पण मा. दत्तारामांना नाटकातून सोडले नाही. दत्तारामांसारख्या व्रतस्थ माणसांच्या शब्दांना तेव्हाच्या रंगभूमीवर मान होता.
दूरचित्रवाणीवरील मुलाखत
मास्टर दत्ताराम यांची मुलाखत मुंबई दूरदर्शनने प्रसारित केली होती. त्या मुलाखतीत आपले मनोगत व्यक्त करताना दत्तारामबापू म्हणाले होते-
' परमेश्वर कृपेने मला भरपूर काही मिळाले. जीवनाबद्दल माझी कसलीच तक्रार नाही. सर्वांनी मला चांगले वागवले. माझ्यावर लोकांनी खूप प्रेम केले. पोटासाठी हा व्यवसाय मी पत्करला. व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा, निष्ठेने करायचा ही शिकवण मला बालपणीच मिळाली. मी ती आयुष्यभर विसरलो नाही. त्याचे उत्तम फळ मला मिळाले. वसईला स्वतःच्या मालकीचे एवढे घर मी बांधीन असे माझ्या स्वप्नातही वाटले नव्हते. मी पूर्ण समाधानी आहे'.
प्रत्यक्षात भोगलेली अनंत दुःखे, यातना; सुरुवातीचा कठीण काळ आणि संकटांना तोंड देत खंबीरपणे चालवलेला संसार यांचा कुठलाही मागमूस त्यांच्या मुलाखतीत नव्हता. कारण आयुष्यातील फक्त चांगल्या आठवणी तेवढ्या लोकांसमोर ठेवाव्यात. संसारातील यातना आणि नाट्यपंढरीच्या वाटेतील कटू अनुभव विसरून जावे, असा त्यांचा जगण्याचा धर्म होता.
अखेर
गोव्यातील वळवई गावात जन्मलेल्या या अभिनेता व मातब्बर दिग्दर्शकाने वयाची पन्नास वर्षं मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले. मा. दत्तारामांनी गोव्यात सुरुवात केली, लालबागला ते नावारूपाला आले आणि वसईला स्थायिक झाले. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा, व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मास्टर दत्ताराम यांना मिळाला. आपण कमावलेल्या पैशातूनच वसईला स्वतःचा 'अभिनय' बंगला त्यांनी बांधला. आणि वयाच्या ७२व्या वर्षी १० जून १९८४ला त्यांनी या बंगल्यातच अखेरचा श्वास घेतला.
दत्ताराम यांची नाटके आणि त्यात केलेली भूमिका
- इंद्रजितवध (राम)
- कीचकवध (भीम)
- कुंजविहारी (पेंद्या)
- कौंतेय (?)
- तुझा तू वाढवी राजा (?)
- दुरितांचे तिमिर जावो (बापू सोनटक्के)
- पडछाया (?)
- पंडित जगन्नाथ (मन्सूरखान)
- पतंगाची दोरी (?)
- पंतांची सून (घारूअण्णा)
- पुण्यप्रभाव (किंकिणी)
- भाऊबंदकी (?)
- मत्स्यगंधा (देवव्रत, भीष्म)
- मानापमान (?)
- मीरामधुरा (?)
- मृच्छकटिक (?)
- ययाति आणि देवयानी (ययाती)
- रक्त नको मज प्रेम हवे (?)
- रायगडाला जेव्हा जाग येते (शिवाजी)
- राक्षसी महत्त्वाकांक्षा (मदालसा)
- लोकांचा राजा (छत्रपती)
- वैजयंती (जयपाल)
- सम्राट सिंह (सम्राट)
- सवाई माधवराव यांचा मृत्यू (सवाई माधवराव)
- संशयकल्लोळ (कृत्तिका)
- सुंठीवाचून खोकला गेला (खासदार)
- सौभद्र (?)
- होनाजी बाळा (?)
पुरस्कार
चरित्रलेखन
शताब्दी
मास्टर दत्ताराम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वसई महापालिकेने १ ते ७ मे २०१३ या काळात जन्मशताब्दी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ’डिंपल प्रकाशना’ने मास्टर दत्तारामांवर लिहिलेले आणि अरुण धाडीगावकरांनी संपादित केलेले ’अभिनय मास्टर’हे पुस्तक प्रसिद्ध केले.