"गुलमोहर दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: साताऱ्यात एक मे हा दिवस ' गुलमोहर डे ' म्हणून साजरा केला जातो. हा दि...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१५:०९, १ मे २०१३ ची आवृत्ती

साताऱ्यात एक मे हा दिवस ' गुलमोहर डे ' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणारे सातारा हे बहुधा जगातले पहिलेच शहर असावे. इ.स. १९९९ सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे.

मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो. लाल-केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. मराठी साहित्यिकांनी आपल्या कथा-कवितांतून गुलमोहर मुक्तपणे रेखाटला आहे. गुलमोहराच्या झाडाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खास स्थान असते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव आपण दरवर्षी अनुभवत असतो. त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा असे वाटून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून ' गुलमोहर डे ' साजरा करण्याची पद्धत साताऱ्यात सुरू झाली. सागर गायकवाड आणि पी. व्ही. तारू या दोघांनी सर्वांत आधी ही कल्पना मांडली. दरवर्षी १ मेला कलासक्त मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या परीने गुलमोहराचे वर्णन करतात. चित्रकार गुलमोहराची चित्रे काढतात, कवी गुलमोहरावर कविता करतात, फोटोग्राफर कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या गुलमोहराच्या फोटोंचे प्रदर्शन भरवितात.

साताऱ्याच्या पोवई नाक्याजवळ ६७ गुलमोहराची झाडे असणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम साजरा केला जातो. सातत्याने हा उपक्रम तेथे होत असल्यामुळे या रस्त्यालाही ' गुलमोहर रस्ता ' असे नाव देण्यात आले आहे. हा उपक्रम आता एक सांस्कृतिक चळवळ बनून गेला आहे. वृक्षारोपण, प्रत्यक्ष निसर्गचित्रण, चित्रप्रदर्शन, कविता वाचन, कथ्थक नृत्य, शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम या दिवशी केले जातात. गुलमोहोराची रोपे देऊन त्यांची काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते.

कला महाविद्यालय, हिरवाई प्रकल्प या संस्था आयोजनासाठी सहकार्य करत असल्या तरीही दरवर्षी अनेक कलाकारांची त्यात उत्स्फूर्त भर पडते आहे. साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक कवी, संगीतकार, लेखक यामध्ये सहभागी होतात. गुलमोहराच्या झाडाचे संगोपन करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार, गुलमोहरांच्या नवीन रोपांची लागवड असे पर्यावरणपूरक उपक्रमही राबविले जातात. त्यामुळे केवळ हौशी लोकांचा हा दिवस न राहता त्याचा एक स्वतंत्र असा पॅटर्न विकसित झाला आहे. साताऱ्यासोबत महाराष्ट्रातल्या इतर शहरांतही तो साजरा व्हावा, असे या दिवसाचे आयोजन करणाऱ्या प्रत्येकाला वाटत आहे. दिवगंत ज्येष्ठ कवी ग्रेस यांनी निधनापूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा वर्तविली होती. मात्र, साताऱ्याचा गुलमोहर डे त्यांना अनुभवता आला नाही.

हा दिवस सातत्याने साजरा करणे हीदेखील दखलपात्र गोष्ट आहे. सातत्याने काळ्या घटनांनी गाजत असणाऱ्या साताऱ्यात सकारात्मक वृत्तीने लावलेल्या ' गुलमोहर दिवसाच्या ' रोपाचा आता एक डौलदार वृक्ष झाला आहे.


पहा : जागतिक दिवस