"नागराजबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''नागराजबाबा''' यांचे पूर्वाश्रमीचे नाव दिगंबर बाळाजी जाधव. पुणे ...
(काही फरक नाही)

१२:५१, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

नागराजबाबा यांचे पूर्वाश्रमीचे नाव दिगंबर बाळाजी जाधव. पुणे जिल्ह्यातील आमदाबाद या गावातील एका सधन शेतकरी कुटुंबामध्ये १६ मार्च १९३४ या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना महानुभाव पंथाला समर्पित केले होते. त्यामुळे दिगंबर बाळाजी जाधव हे आपल्या वयाच्या २४ व्या वर्षी, म्हणजेच १९५८ साली, नागराजबाबा झाले. त्याचवर्षी त्यांनी नाशिक जिल्ह्यामधील लासलगाव येथे महानुभाव आश्रमाची स्थापना केली.

चक्रधरस्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ, त्यांनी खूप परिश्रम घेऊनही त्यांच्या हयातीत समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच्यानंतर त्या पंथाची धुरा नागदेवाचार्य यांच्याकडे आली. त्यांनी या पंथाची उत्तम बांधणी केली. कित्येक वर्षांनंतर तीच परंपरा नागराजबाबा यांनी चालविली. समाजाचे प्रबोधन करावे आणि संपूर्ण समाजाचे आध्यात्मिक आणि शैक्षणिक उन्नयन व्हावे , यासाठी नागराजबाबा यांनी अखंड ध्यास घेतला होता. आश्रमाची स्थापना करण्यामागे त्यांचा उद्देशही तोच होता. आश्रमातच त्यांनी मुलांच्या बरोबरीने मुलींच्याही शिक्षणाची सोय केली. त्यांच्या आश्रमात जवळपास १५० मुले- मुली शिक्षण घेतात. अध्यात्माबरोबरच एकंदरच समाजाचे भले कसे होईल, याचा विचार करणाऱ्या नागराजबाबांनी व्यसनमुक्तीसाठी अनेक चर्चासत्रे आयोजित केली, शिबिरे भरवली. भाषणे दिली. जुनी हस्तलिखिते आणि पोथ्या यांचे महत्त्व जाणणाऱ्या नागराजबाबांनी आपल्या आश्रमात पाचशे पोथ्यांचा संग्रह ठेवला आहे. तो खराब होऊ नये, यासाठी त्यांनी खास व्यवस्था केली आहे. प्राचीन पोथ्यांचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचा उपयोग व्हावा, हाच त्यांचा हेतू होता. महानुभाव पंथ आणि त्याचे तत्त्वज्ञान यांचा प्रसार व्हावा या ध्यासाने भारलेल्या नागराजबाबा यांनी महाराष्ट्रातच नव्हेत, तर मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , दिल्ली , पंजाब, काश्मीर, गुजरात येथे प्रवचने दिली. १९७३ सालापासून त्यांनी सातत्याने अखिल भारतीय महानुभाव परिषदेची अधिवेशने भरविली. चक्रधर दर्शन, विदेह प्रबोध, रत्नमाला, कथा कल्पतरू, ब्रह्माविद्या आदी ग्रंथांचे लेखन केले आणि डॉ. वि.भि. कोलते संपादित ' लीळाचरित्र ' प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. आध्यात्मिक बैठकीला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या आणि वैचारिक लेखनाबरोबरच शिक्षणप्रसार करणाऱ्या नागराजबाबा यांचा शिष्यपरिवार खूप मोठा आहे. समाजसेवेचे त्यांनी व्रत घेतले होते आणि अखेरपर्यंत ते त्यांनी निष्ठापूर्वक पाळले. त्यांचे एका अपघातात निधन झाले.

पहा : महानुभाव पंथ