"चं.ह. पळणिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ’ऐक्य’कार चंडिराम हरी पळणिटकर (जन्म : ; मृत्यू : स...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

१३:४९, २० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

’ऐक्य’कार चंडिराम हरी पळणिटकर (जन्म : ; मृत्यू : सातारा, १५ सप्टेंबर १९५७) हे एक निर्भय, झुंजार पत्रकार होते.

पळणिटकर कुटुंब हे मूळचे मोहोपाडा (रसायनी) या पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील गावचे रहिवासी. चंडिराम यांचे वडील प्रसिद्ध प्रवचनकार होते. ते गावोगावी प्रवचनास जात तेव्हा चंडिरामही त्यांच्यासोबत जात असत. त्यातूनच त्यांना साहित्याची आवड निर्माण झाली. बालपणीच साहित्याचा व्यासंग वाढला आणि साहित्याच्या आवडीचे रुपांतर पत्रकारितेत झाले. लहानपणीच पितृछत्र हरपल्यामुळे व्हर्नाक्युलर फायनल (सध्याची सातवी) झाल्यावर ते ऐन तारुण्यात नागपुरात गेले. चं.ह. पळणिटकर १९२९साली विवाहबद्ध झाले.

पत्रकारिता

ब्रिजलाल बियाणी, वीर वामनराव जोशी यांच्या सहवासाने आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या विचाराने पळणिटकरांना लेखनाची स्फूर्ती मिळाली. स्वातंत्र्य लढ्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच बॅ. मोरोपंत अभ्यंकर, डॉ. नारायण भास्कर खरे यांनी २० जानेवारी १९२६ रोजी नागपूरमधून सुरू केलेल्या साप्ताहिक तरुण भारतचे संपादक डॉ. खरे होते पण, आपल्या वैयक्तिक व्यवसायातून, या वृत्तपत्रासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने संपादकीय साहाय्याची जबाबदारी त्यांनी चंडिराम हरी पळणिटकर आणि श्री. ना. हुद्दार यांच्याकडे सोपवली होती. पळणिटकर तेव्हा फक्त २३ वर्षांचे होते.

१९३०मधल्या कायदेभंगाच्या चळवळीत डॉ. खरे यांना अटक झाल्यावर "तरुण भारत'चे प्रकाशन काही काळ स्थगित झाले त्यामुळे पळणिटकर यांना नागपूर सोडावे लागले. नंतर अमरावती येथील बामणगावकर यांच्या वृत्तपत्रात काही काळ काम केल्यावर ते मुंबईत आले. करमणूक आणि चाबूकस्वार या नामांकित साप्ताहिकात ते सहसंपादक होते.

१९३५पासून पळणिटकर रावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांच्या साताऱ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ’ऐक्य’ या साप्ताहिकाचे ’कार्यकारी संपादक' झाले. ’ऐक्य’साठी’साठी पळणिटकर यांनी खूप परिश्रम घेतले. घणाघाती आणि निर्भीड शैलीच्या त्यांच्या धारदार लेखनाने, ’ऐक्य’चा वाचक वर्ग वाढला. ते सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे मुखपत्र झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १९४२ मधल्या "प्रती सरकार'चे सातारा जिल्हा हेच केंद्र होते. त्या काळात पळणिटकर यांनी ’ऐक्य’मध्ये दाहक लेखन करून स्वातंत्र्य चळवळीचा धडाडीने प्रचारही केला.

पुढे खर्च भागेनासा झाला म्हणून मालकांनी ’ऐक्य’ बंद करायचे ठरवले, तेव्हा ’ऐक्य’चा छापखाना जोशी यांनी, आणि साप्ताहिक पळणिटकरांनी विकत घेतले. पळणिटकरांनी बराचसा नोकरवर्ग काढून टाकला आणि १९२९मध्ये स्थापन झालेले ते ’ऐक्य’ चालू ठेवले. ’ऐक्य’चे संस्थापक रावबहादुर रावजी रामचंद्र काळे १९३६सालीच निधन पावले होते. तेव्हा ’ऐक्य’चे लेख घेऊन ते चिमणपुऱ्यातील ल.म. भागवत यांच्या गजानन प्रिंटिंग प्रेसमध्ये स्वत:च जात, छापलेल्या मजकुराचे मुद्रितशोधनही करीत, आणि नंतर साप्ताहिकाच्या प्रतींचे गठ्ठे घेऊन पोस्टातून रवाना करीत. साप्ताहिकाचे स्थानिक वाटप एकदोन मुलांकरवी होत असे.

अपार जिद्द, कष्ट आणि निर्धाराच्या बळावर पळणिटकर यांनी राष्ट्रीय स्वतंत्र बाण्याचे हे साप्ताहिक यशस्वी केले. ’ऐक्य’साठी प्रचंड परिश्रम घेतले, तरी पळणिटकरांची सांपत्तिक आर्थिक स्थिती बेताचीच राहिली. पण, त्यांनी आपला सडेतोड बाणा कधीही सोडला नाही. ’ऐक्य’ला मिळालेले यश हे त्यांच्या लेखणीचे आणि स्वतंत्र पत्रकारितेचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सातारा जिल्ह्याच्या विविध समस्या त्यांनी ’ऐक्य’द्वारे चव्हाट्यावर मांडल्या. जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. नगरपालिका आणि डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शनपर लेख लिहिले, आणि विकासात्मक पत्रकारितेचा नवा आदर्श निर्माण केला.

लेखन

  • पळणिटकर यांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले आहे. त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या शंभर निबंधांची वाचकांनी प्रचंड प्रशंसा केली.

महाराष्ट्रस्तरावरील निबंध स्पर्धेत तेव्हा त्यांच्या निबंधांना पहिल्या क्रमांकाची २५ आणि दुसऱ्या क्रमांकाची १० पारितोषिके मिळाली होती. निबंधकार चं. ह. पळणिटकर असा त्यांचा लौकिक झाला होता.

  • शहीद भगतसिंग यांचे चरित्र (मराठीतले पहिले). ब्रिटिश सरकारने या चरित्रावर बंदी घातली आणि सर्वत्र छापे घालून चरित्राच्या प्रती जप्त केल्या.

निधन

१५ सप्टेंबर १९५७ रोजी चं.ह. पळणिटकरांचे निधन झाले. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ’ऐक्य' साप्ताहिक धडाडीने व निष्ठेने चालवले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी काही काळ संपादकपदाची धुरा सांभाळली. पुढे १९ जानेवारी १९६७रोजी त्यांचे चिरंजीव सुरेश आणि शरद यांनी या साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात केले. रावबहादुर काळे यांनी स्थापन केले असले तरी चंडिराम हरी पळणिटकर हेच ऐक्यकार म्हणून ओळखले जातात.