विभागीय साहित्य संमेलन, चिंचवड
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर २००९ या दिवसांत चिंचवड येथे विभागीय साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामवंत कवी व गीतकार प्रवीण दवणे होते.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून युवा कामगारनेते अॅड. विजय पाळेकर होते, तर संमेलनाची स्मरणिका करण्याचे काम इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष प्रकाश पमनानी यांनी केले.
उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम व साहित्यिक द. मा. मिरासदार उपस्थित होते. ए. टी. आठल्ये, दीपक करंदीकर, संदीप खरे, गीतकार जगदीश खेबूडकर, निवेदक बंडा जोशी, अभिनेत्री व चित्रपट दिग्दर्शिका स्मिता तळवलकर, लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ. रामचंद्र देखणे, हरि नरके, वैशाली नाईकवडे, अशोक नायगांवकर, कवयित्री नीरजा, साहित्यिक विश्वास पाटील, कवी प्रश्न, रामदास फुटाणे, अशोक मोरे, डॉ. सदानंद मोरे, बाबा राणे, विठ्ठल वाघ, रमेश वैद्य, अभिनेत्री रेणुका शहाणे, सुनील शिनखेडे, नारायण सुमंत, प्रकाश होळकर, तसेच कायदेतज्ज्ञ भास्करराव आव्हाड, पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये, व्यवस्थापनतज्ज्ञ जे. व्ही. मुळे, पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर आदी मान्यवर या संमेलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे व विभागीय साहित्य संमेलनाचे निमंत्रक राजन मुठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या गेलेल्या या विभागीय साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम झाले.
विश्वास पाटील व अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत, द. मा. मिरासदार यांचे कथाकथन, अशोक गंगावणे यांचा महात्मा फुले हा एकपात्री प्रयोग, जगदीश खेबूडकर गीतमाला, कामगार साहित्यावरील परिसंवाद, प्रसारमाध्यमे व वाचनसंस्कृती या विषयावरील चर्चासत्र, अध्यात्म आणि साहित्य या विषयावरील परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन तसेच स्थानिक कवींसाठी समांतर कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात झाले.
या संमेलनात, श्री. जगदीश खेबूडकर यांना संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते "मराठी साहित्य जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पहा : साहित्य संमेलने