Jump to content

विकिपीडिया:सूर्यमाला दालन/विशेष लेख/3

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्लूटो हा सूर्यमालेतील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा बटु ग्रह आहे (एरिस नंतर) तसेच सूर्याला प्रदक्षिणा मारणार्‍या खगोलीय वस्तूंमधील दहाव्या क्रमांकाची खगोलीय वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो. प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे.

कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतियांश). याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो. प्लूटो व त्याचा सर्वात मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते. प्लूटोला अजून दोन छोटे उपग्रह आहेत - निक्सहायड्रा - ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.

प्लूटोचा शोध १९३० साली लागला व तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. पण २०व्या शतकाच्या शेवटीशेवटी तसेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकतीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे.या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला. मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लूटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे.


पुढे वाचा...