विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २००७
चंगीझ खान किंवा चंगेझ खान (इ.स. ११६२ - इ.स. ११६२) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वात शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते.
चंगीझ खानाचा जन्म इ.स. ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. येसुगेई हा कियाड टोळीचा प्रमुख होता. ही टोळी इतर टोळ्यांच्या मानाने हलक्या दर्जाची समजली जाई. त्याच्या आईचे नाव हौलन असे होते. चंगीझ खानाच्या जन्मापूर्वी येसुगेईने तेमुजीन उगे या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव तेमुजीन असे ठेवले.