Jump to content

विकिपीडिया:मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे आवाहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपणां सर्वाना मराठी भाषा गौरव दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !


श्री विनोद तावडे, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

कुसुमाग्रजांचा जन्मदिन दि. 27 फेब्रुवारी, आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून विविधांगी उपक्रम शासनाच्या वतीने योजले जातात. यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी महाराष्ट्र शासनाने ‘संगणकावरील आणि महाजालावरील मराठी’ या विषयाला प्राधान्य देण्याचे ठरविले. तसेच, महाराष्ट्रातील विविध (11) विद्यापीठांच्या ठिकाणी मराठी भाषेच्या गौरवार्थ मनोरंजक आणि प्रबोधक असे सांस्कृतिक कार्यक्रम योजले.

आधुनिक काळात कोणतीही भाषा टिकवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी त्या भाषेचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. शिक्षणाचे माध्यम, बोली, प्रकाशित साहित्य, कोश, व्याकरण, सार्वजनिक वापर इत्यादी घटक भाषेसंदर्भात महत्त्वाचे आहेतच, त्याचबरोबर ‘भाषेचा संगणकावर आणि महाजालावर (इंटरनेटवर) होणारा वापर’, हा आजच्या युगात सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. यावरच भाषेचा विस्तार आणि विकास मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येकाने महाजालावर मराठीचा वापर वाढविण्याचा आणि प्रत्येक संगणकावर युनिकोड-आधारित मराठी कार्यान्वित करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात, समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) ई-मेल, ब्लॉगलेखन, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्‍ ॲप इत्यादी माध्यमांतून मराठीचा वापर वाढतो आहे. परंतु, या वापराचा वेग आणि व्याप्ती वाढणे गरजेचे आहे.

विकिपीडिया हा जगभरातील असंख्य भाषांमध्ये कार्यरत असलेला लोकप्रिय असा मुक्त ज्ञानकोश आहे. एखाद्या भाषेतील मजकुराची महाजालावरील पृष्ठसंख्या किंवा शब्दसंख्या हा भाषेच्या मोठेपणाचा आणि श्रेष्ठत्वाचा आजच्या काळातील निकष ठरतो आहे. हे लक्षात घेऊनच, मराठी भाषा गौरव दिनी, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी जनांनी, मराठी देवनागरी लिपीतील किमान 1 परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टंकलिखित (टाइप) करावा, असे आग्रही आवाहन मी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केले. दि. 27 फेब्रुवारी या एकाच दिवशी केवळ प्रतिकात्मक कृती न करता, पुढील काळातही आपण सर्व जण, संगणकावर आणि महाजालावर मराठीचा सातत्याने वापर कराल, अशी मला खात्री आहे.

शिक्षणाचे माध्यम, बोली, प्रकाशित साहित्य, कोश, व्याकरण, भाषेचा सार्वजनिक वापर इत्यादी सर्वच बाबतीत मराठी भाषेच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपण सर्वांनीही या प्रयत्नांना पूरक साथ द्यावी, या अपेक्षेसह आपणा सर्वांना पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !

आपला,
विनोद तावडे
शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण
उच्य व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक विकास व वक्फ
मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री
महाराष्ट्र राज्य