Jump to content

वासुदेव बळवंत पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत (जन्म : १५ मे १८७०; - २६ ऑक्टोबर १९२१) हे एक मराठी कवी व काव्यसमीक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास, व माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून १८९३ साली बी.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर ते पुण्याला प्रथम न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि नंतर फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाले.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात इंग्लिश शिकवणारे ते एक व्यासंगी प्राध्यापक होते. तेथे ते शेक्सपियर आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांनी चालविलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या टोपणनावाने त्यानी कविता लिहिल्या आहेत.

शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (१८८९-१९३१) यांनी मोनोलॉगसदृश जो नवा साहित्यप्रकार मराठीत आणला त्या प्रकाराला वा.ब पटवर्धनांनी ड्रॅमॅटिक शॅडो हे इंग्रजी आणि नाट्यछटा हे मराठी नाव सुचविले. दिवाकरांना नाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा पटवर्धनांनीच दिली होती.

पटवर्धनांनी 'विनायकांची कविता' या पुस्तकाला कवी विनायक यांच्या काव्याची समीक्षा कराणारी प्रस्तावना लिहिली आहे.

काव्य आणि काव्योदय

[संपादन]

काव्य आणि काव्योदय हा आपला पहिला ग्रंध पटवर्धनांनी इ.स. १९०९मध्ये लिहिला. या ग्रंथात त्यांनी काव्याच्या संदर्भात काही प्रश्नांची चर्चा केली आहे. मराठीतील आधुनिक साहित्य तत्त्वविवेचनाला खराखुरा प्रारंभ या ग्रंथापासून झाला असे म्हणले जाते.[ दुजोरा हवा] काव्योदय आणि भौतिक व मानवी परिस्थिती यांतील परस्पर संबंध पटवर्धनांनी या ग्रंथात विशद केला आहे. मराठीतील काव्यवाङ्‌मय प्रामुख्याने निवृत्तिपर बनण्याला महाराष्ट्राची अस्थिर राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे असे त्यांचे मत होते. ग्रंथात केलेले प्रतिभेच्या लक्षणांचे वर्णन अत्यंत मार्मिक आणि सूक्ष्म आहे.

तुकारामांच्या अभंगांची चर्चा

[संपादन]

पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन संत तुकाराम यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे गणेश हरी केळकर व प्रा.वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड दुर्मीळ झाल्यामुळे, त्यांचे महत्त्व ओळखून दिल्लीच्या साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड फेब्रुवारी २००९मध्ये पुनःप्रकाशित केले आहेत.

विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चर्स

[संपादन]

१९१७साली मुंबई विद्यापीठातर्फे "महाराष्ट्रातील भक्तिमार्गी संत, त्यांचे वाङ्मय व कार्य" या विषयावर वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी इंग्रजीतून सात व्याख्याने "विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चर्स" या मालेतून दिली. त्यांपैकी सहा व्याख्यानांचा मराठी अनुवाद ’मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या व्याख्यानांतून पटवर्धनांनी काही नवे विचार मांडले होते.

अन्य ग्रंथ

[संपादन]
  • ’शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम’(१९०६) हे वासुदेव बळवंत पटवर्धनांचे स्वतंत्रपणे लिहिलेले आणि गाजलेले पुस्तक. हे राज्य मराठी विकास संस्थेने पुनःप्रकाशित केले आहे.
  • ’राजनीतीची मूलतत्त्वे’ (१८९६) हा हेन्‍री सिजविकच्या ग्रंथाचा अनुवाद.

चरित्र

[संपादन]

साहित्यिक सरोजिनी वैद्य यांनी "काव्य आणि काव्योदयकर्ते वासुदेव बळवंत पटवर्धन - जीवन आणि लेखन" या नावाचे पटवर्धनांचे चरित्र लिहिले आहे.

शब्द बापडे केवळ वारा

[संपादन]

शब्द बापडे केवळ वारा ।
अर्थ वागतो मनात सारा ॥
नीटनेटका शब्दपसारा ।
अर्थाविण पंगू ॥॥
ही वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत यांची गाजलेली कविता. या कवितेची पहिली ओळ "शब्द बापडे केवळ वारा" ही आजही म्हणीसारखी वापरली जाते.