वर्ग:व्यंगचित्रकला
Jump to navigation
Jump to search
व्यंगदर्शन 2016- व्यंगचित्रकलेला पुढे नेणारा आशादायी सोहळा
अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’च्या वतीने ‘व्यंगदर्शन 2016’ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील दादर येथील सावरकर स्मारक येथे 16 व 17 एप्रिल 2016 अशा दोन दिवस चाललेल्या उपक्रमांस प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. विनोद, हास्य, व्यंगचित्रांची आवड असलेल्या व व्यंगचित्रकलेत, अॅनिमेशन क्षेत्रात काही करु इच्छिणा-यांना नामवंत व्यंगचित्रकार, चित्रकार यांची प्रात्यक्षिके पहावयास मिळाली. मनातील शंकांचे निरसन करण्याची संधी आणि मार्गदर्शन मिळाले. व्यंगचित्रकारांचे संमेलन, व्यंगचित्र प्रदर्शन, व्यंगचित्र स्पर्धा, व्यंगचित्रकारांचा परिचय करुन देणारी स्मरणिका, नामवंताची प्रात्यक्षिकांसह व्याख्याने, महाराष्ट्रातील व परराज्यातील व्यंगचित्रकारांशी संवाद साधण्याची संधी यामुळे व्यंगचित्रकारांसह रसिकांनाही ही एक पर्वणीच होती. मराठी व्यंगचित्रकलेसाठी आयुष्यभर रेखाटन करुन कलेची जोपासना करणा-या वसंत सरवटे आणि शि.द. फडणीस या उभयतांना पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. कंबाईनचे अध्यक्ष चारुहास पंडित, उपाध्यक्ष वैजनाथ दुलंगे, सचिव बाबूजी गंजेवार, विनय चाणेकर, दिनेश धनगव्हाळ, भटू बागले, अरविंद गाडेकर हेही यावेळी उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यंगचित्रकलेचा गौरव करतांना, व्यंगचित्रकार हे प्रतिभावंत साहित्यिक असल्याचा उल्लेख करुन ईश्वराने दिलेल्या या देणगीचा योग्य वापर करुन जगाला आनंद देत रहा, असे आवाहन केले. चार अग्रलेखांनी जे काम होणार नाही, ते एका व्यंगचित्राने साधता येते, ही व्यंगचित्राची ताकद आहे. ईश्वराने दिलेल्या प्रतिभेचे मोल वाया जाणार नाही, याची व्यंगचित्रकारांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देतांना फडणीस यांनी आपला कलाप्रवास विस्ताराने सांगितला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार सरवटे यांच्या मैत्रीचाही आवर्जून उल्लेख करुन गेल्या 70 वर्षातील कलाक्षेत्रात केलेल्या सेवेचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली. ‘चित्रे लहान झाली तरी चालतील, पण मनाचा कॅनव्हास मोठा ठेवा’, असा मोलाचा सल्ला दिला. राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटतांना घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली. व्यंगचित्रातून भूमिका स्पष्ट करण्याच्या स्वभावामुळे सध्या सुचणारी चित्रे कोठे छापावीत, असा प्रश्न पडतो, असेही ते म्हणाले. व्यंगचित्र ही चित्रकलेची पहिली पायरी नव्हे तर शेवटची पायरी आहे, हे स्पष्ट करतांना नवोदित व्यंगचित्रकारांनी रिएलॅस्टीक ड्राईंग व एनॉटॉमीचा अभ्यास करण्याची गरज प्रतिपादीत केली. संमेलनाच्या निमित्ताने व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मोबाईलचे वेड, सेल्फी, स्मार्ट सिटी आदी विषय त्यासाठी देण्यात आले होते. अमोल ठाकूर, रवीश धनावडे आणि रवींद्र राणे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. प्रभाकर दिघेवार, किशोर शितोळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आलीत. प्रदर्शनामध्ये विजेत्या व्यंगचित्रांसह जुन्या व्यंगचित्रकारांचीही हास्य-व्यंगचित्रे लावण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, हरिश्चंद्र लचके, वसंत हळबे, श्याम जोशी, प्रभाकर ठोकळ यांच्यासह ज्ञानेश सोनार, मनोहर सप्रे, प्रभाकर झळके, सुरेश क्षीरसागर, जगदीश कुंटे, महेंद्र भावसार, श्रीनिवास प्रभुदेसाई, राजीव गायकवाड, रवींद्र बाळापुरे, ब्रिजेश मोगरे, नीलेश कानकिरड, राधा गावडे, गणेश जोशी, राजेंद्र सरग, लहू काळे, राम मांडुरके, धनंजय गाडेकर, सुरेश राऊत, अतुल पुरंदरे, रवी भागवत, दीपक महाले, अरविंद देशपांडे, संतोष धोंगडे, राहूल सावे, अनिल डांगे, मंगेश माळवदे, प्रकाश मोरे, अविनाश जाधव अशा शंभरहून अधिक व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली विविध शैलीतील हास्य-व्यंगचित्रे रसिकांना आकर्षित करत होती. संमेलनात विकास सबनीस यांनी ‘व्यंगचित्रे -लोकल ते ग्लोबल’ यावर मार्गदर्शन केले. व्यंगचित्रकाराची नजर हलकट असते, पण त्याला ‘बिटवीन द लाईन्स’ वाचता येते, असे ते म्हणाले. दैनिकासाठी सामाजिक, राजकीय व्यंगचित्रे रेखाटतांना आलेले अनुभव, सुचलेल्या कल्पनांमागचा इतिहास त्यांनी प्रात्यक्षिकांसह दाखविला. राजकीय व्यंगचित्रकारांसाठी रोजचा पेपर हा नवा पेपर असतो, हे विशद करतांना सजगता, वेळेचे बंधन, विषयाचे ज्ञान याची आवश्यकता कथन केली. संजय मिस्त्री यांनी ‘व्यंगचित्रकलेचा इतिहास’ मनोरंजक पध्दतीने उलगडून दाखवला. काव्य, विनोद, शेरो-शायरी यांची पेरणी करत व्यंगचित्रकलेचा प्राचीन इतिहास अधिकच रंजक केला. विवेक मेहेत्रे यांनी ‘व्यंगचित्रे-रंगमंचीय सादरीकरणासाठी प्रभावी माध्यम’ असल्याची सर्वांनाच जाणीव करुन दिली. सकाळी उठल्यापासून अनेक वेळा आपला कार्टूनशी संबंध येतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्र कार्टूनने व्यापलेले आहे. प्रत्येक आई-बापाला आपला मुलगा हा क्रिकेटर, फिल्मस्टार व्हायला हवा असे वाटते, चित्रकार-व्यंगचित्रकार झालेला कोणालाही नको आहे. घरातील भिंतीवर लहान मुलाने रेघोट्या ओढल्या की बाप भिंत खराब झाली या रागाने त्याच्या कानाखाली ओढतो. तिथेच मुलातील कलाकार मरतो, या वास्तवाची मेहेत्रे यांनी जाणीव करुन दिली. व्यंगचित्र क्षेत्रात नाव, प्रसिध्दी आणि पैसा मिळू शकतो, हे त्यांनी सोदाहरण सांगितले. रविवारी डॉ. दीपक शिकारपूर यांनी ‘व्यंगचित्रकारांसाठी इंटरनेट व सोशल मिडीयामधील संधी’ यावर मार्गदर्शन केले. पारंपरिक माध्यमांप्रमाणेच आधुनिक माध्यमांचा उपयोग करुन ही कला जोपासता येऊ शकते, असे ते म्हणाले. सर्जनशील व्यक्तींनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास निश्चितच मदत होईल, असे ते म्हणाले. ‘कॉपीराईट’ कायद्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कायदा म्हणजे काहींना ‘राईट टू कॉपी’ वाटतो. सोशल मिडीयावर असे प्रकार अनेकदा आढळतात. मात्र, एकदा कलाकृती सादर झाली म्हणजे ती त्या कलाकाराचीच मालमत्ता असते, असे डॉ. शिकारपूर यांनी स्पष्ट केले. शालेय जीवनापासूनच व्यंगचित्रक्षेत्रात रमलेल्या चेतन शर्मा यांनी ‘ व्यंगचित्रकारांचे स्वप्न- अॅनिमेशन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना जाहिरात, चित्रपट यातील अनुभव साभिनय सादर करुन रसिकांची मने जिंकली. पाश्चात्य देशांमध्ये नवीन सुपर हिरो तयार करावे लागले. आपल्याकडे पुराणकाळांपासूनच अस्तित्वात आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले. जाहिरातीत कार्टूनचा वापर करतांना उत्पादनानुसार, पात्रानुसार रेखाटन करण्यामुळे कसा परिणाम साधला जातो, हे त्यांनी दाखवून दिले. अॅनिमेशनद्वारे केवळ मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन करण्यात ‘राजू एण्ड आय’ या फिल्ममुळे यशस्वी झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. व्यंगचित्रकार मंजुल यांनी हिन्दी आणि इंग्रजी व्यंगचित्रक्षेत्रातील प्रवास कथन केला. चित्रकलेचे कोणतेही प्राथमिक शिक्षण न घेता त्यांनी साधलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद वाटली. दैनंदिन व्यंगचित्र सुचण्यापूर्वीचा तणाव, उत्सुकता आणि व्यंगचित्र आकारास आल्यानंतरचे समाधान अवर्णनीय असते, असे मंजुल म्हणाले. बाबू गंजेवार यांनी ‘ग्रामीण व्यंगचित्रकार-कथा आणि व्यथा’ मांडल्या. शहरी भागात व्यंगचित्रांचे जसे विषय आहेत, तसे ग्रामीण भागातही अनेक विषय असल्याचे सांगतांना व्यंगचित्रकार ग्रामीण विषयांकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त केली. लहू काळे, रवींद्र बाळापुरे, प्रभाकर दीघेवार अशी मोजकी मंडळी ग्रामीण विषयाला सातत्याने न्याय देत असल्याचा उल्लेख करुन इतर व्यंगचित्रकारांनीही या विषयाची दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशांत कुलकर्णी यांनी ‘दिवाळी अंकातील व्यंगचित्रे’ रेखाटतांनाचे अनुभव सांगितले. शाश्वत आणि सदाबहार विषयांमुळे दिवाळी अंकांतील व्यंगचित्रे आजही आवडीने वाचली जातात. विषयाची निवड, प्रयोग करण्याची संधी, अंकांची पुरेशी पाने, पुरेसा वेळ यामुळे अनेक व्यंगचित्रमालिका साकारता आल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाच्या शेवटी सर्व व्यंगचित्रकारांनी श्रेष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. एकूणच ‘व्यंगदर्शन 2016’ हे संमेलन सर्वांनाच आनंद देणारा, नवीन माहिती देणारा सोहळा ठरला. बाळ-गोपाळांची, तरुणांची उपस्थिती ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. मराठी व्यंगचित्रकलेला गौरवशाली इतिहास असल्याने या कलेला भवितव्य आहे की नाही, असा प्रश्न पडू शकला असता. मात्र, या संमेलनावरुन नवीन पिढी व्यंगचित्रकलेचा हा वारसा निश्चितच पुढे नेईल, अशी आशा निर्माण झाली आहे. राजेंद्र सरग
9423245456