लोकानुनय
वागताना, लिहिताना, बोलताना वास्तव भूमिका मांडण्याचे टाळून पाठीराखे/ लोकसमूह/राज्यकर्ते यांना रुचेल अशी भूमिका घेणे म्हणजे लोकानुनय होय.
मनोरंजन लोकानुनय
[संपादन]डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या म्हणण्यानुसार मनोरंजन लोकानुनय म्हणजे रंजनवाद, रोमॅन्टिसिझम व मिथ्यावाद . [१].
इतिहास लेखनातील मनोरंजन लोकानुनय
[संपादन]'मनोरंजन लोकानुनय' मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारे होतो, तसा तो इतिहासाच्या लेखनमांडणीतही होतो. आत्मविश्वास मिळवण्याकरिता, व्यक्ती आणि समुदायास अभिमानाचीही गरज असते. या अभिमान निर्मितीकरिता आदर्शांची आवश्यकता असते, अथवा आदर्श मूल्याशी/नायकाशी/प्रसंगाशी जोडून घेण्याची भूक असते. या स्वतःच्या आणि वाचकाच्या भुकेचा विचार करून ललित लेखक हे व्यक्ती, प्रसंग व आदर्श मूल्ये यांभोवती मिथकांची रचना करताना, प्रमाण पुराव्यावर आधारित वास्तववादी लेखनापर्यंत मर्यादित न रहाता कल्पनेच्या भराऱ्या घेत लेखन करतो. बऱ्याचदा असे लेखन पूर्वलक्षी पद्धतीने केले जाते म्हणजे एखादे मूल्य, एखादा नायक किंवा प्रसंग एका विशिष्ट पद्धतीनेच दिसेल असे पाहिले जाते. असे करताना काही वेळा वास्तवाशी/तर्कशास्त्राशी फारकत होत असूनही काना डोळा केला जातो .इतिहास लेखनात केवळ लोकानुवर्ती लेखन एवढाच उद्देश न रहाता मनोरंजन लोकानुनय येऊन राष्ट्रवादी आणि धर्म-जातवादी इत्यादी प्रकारच्या लेखनाची मुहूर्तमेढ रोवली जाते [१].
लोकमानसात काही गोष्टी अपेक्षित समजावयास लागतात. त्याच्या म्हणजे लोकधारेत हा इतिहास ललित लेखनाच्या रूपात बसवून घेतला जातो. याचा उपयोग इतिहासपुरुषाचे दैवतीकरण करण्याकरता केला जातो. बऱ्याचदा परिणामी राष्ट्रवादाचा उपपरिणाम (साइड इफेक्ट) वंशवादात आणि धर्म-जाती-भाषा-प्रांत यांच्या पुनरुज्जीवन वादास बळकटी येण्यात होतो [१].
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ a b c डॉ. रा.श्री. मोरवंचीकर. "लेखनात लोकमनाचे प्रतिबिबं असते मात्र, वास्तवाची कोंडी नको". २०१२-०७-२७ रोजी पाहिले.