रोझा पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मानव अधिकार कार्यकर्त्यांची आई रोझा पार्क

मी एकट्याने काही करून काय होणार आहे? हा आपला नेहमीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर रोझा पार्कच्या कहाणीत मिळू शकते. कोण ही रोझा पार्क? तिने अस काय केल? याची कहाणी खूप मोठी आणि दर्दभरी आहे. माणसांच्या माणुसपणाला कायमचा काळिमा फासणारी ही कहाणी सुरू होते आफ्रिकन माणसांना गुलाम बनवून आपल्या घरीदारी आयुष्यभरासाठी राबवून घेण्याच्या अमेरिकी मनोवृत्तीतून.

त्याकाळची म्हणजे १५ व्या शतकातील अमेरिका. भरपूर जमीन पण कष्ट करायला माणस नाहीत. अशावेळेस साऱ्या युरोपातून अमेरिकेत येऊन नशिब अजमावणाऱया गोऱ्यांच्या नजरेसमोर आली ती आफ्रिका. काळ्या वर्णाच्या आणि बसक्या नाकाच्या माणसांची आफ्रिका. जगाचा अनुभव नसलेल्या आणि स्वतःच्या गावात, आजुबाजूच्या परिसरातील निसर्गात रममाण असणाऱ्या माणसांची आफ्रिका.

त्यानंतर सुरू झाला एक भयानक सिलसिला, फसवणुकीचा, क्रुरता आणि अमानूषपणाचा.

आफ्रिकेच्या कुठल्याशा किनाऱ्याला लागून एक मोठी बोट उभी आहे. अतीशय सुरेल संगीत त्या बोटीतून ऐकायला येतय, किनाऱ्यावर काही गोरे उतरलेत, किनाऱ्यावरील लोकांना आग्रह करून बोटीवर नाचगाण्यासाठी, मेजवानीसाठी आमंत्रण दिले जातेय. संगिताचे वेडे असलेले आफ्रिकन स्त्रीपुरूष छोट्या छोट्या होडग्यातून बोटीवर जाताहेत. तिथे जेवणाची व्यवस्था आहे, सोबत मद्यही आहे. संगिताच्या तालावर नृत्य सुरू आहे. बेभान आहेत सगळे. जिवढे जास्त भरता येतील तेवढे काळे लोग आता आले आहेत, असे कॅप्टनच्या लक्षात आले आहे. हळू हळू बोट किनारा सोडतेय, किनारा लांब लांब जातोय. अजूनही संगिताची आणि मद्याची नशा ओसरलेली नाहीय. पण हळू हळू जाग येईल तसा साऱ्या जहाजावर आक्रोशाची लाट पसरतेय. बोट थांबवण्यासाठी आणि पुन्हा आपल्या घराकडे जाण्यासाठी विनवण्या सुरू होतायेत. प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्याला थेट गोळी घातली जातेय आणि त्याचे प्रेत सरळ समुद्रात फेकल जातेय. आता ही बोट थांबायची नाही, आता आपल घर पुन्हा दिसणार नाही ही कल्पनाही सहन होत नाहीये. पण बोटीवर मात्र धावपळ आहे. साखळदंड बाहेर काढले जातायत. प्रत्येक काळ्या माणसाला आणि बाईला साखळदंडात बांधल जातय. आता ही माणस नाहीत, हा माल विक्रीसाठी चाललाय.

आता हे दुसर दृष्य. अमेरिकेच्या किनाऱ्यावरील एक शहर. मोठ्या चौकात खुप गर्दी जमलीय. चौकातल्या एका चौथऱ्यावर पाचसहा काळी माणस उभी आहेत. काही पुरुष, काही स्त्रीया, काही मुलही. लिलाव पुकारणारा ही लोक कशी कामाची आहेत हे पटवून जास्तीत जास्त किंमतीला मालाची विक्री करण्याचा प्रयत्न करतोय. लोक जवळ जाऊन मालाची तपासणी करतायेत. आता लिलाव पुरा झालाय. माणुसकीची विक्री पुरी झालीय.

अशा अनेक कहाण्या. फसवणूकीच्या, क्रुरतेच्या, अमानूषतेच्या वेगवेगळ्या कल्पनांच्या आयडिया. अशी माणसांनी भरलेली शेकडो जहाजे अमेरिकेच्या दिशेने गेली. लाखो काळे आपल्या घरापासून कायमचे तुटले आणि अमेरिकेतील गोऱ्या शेतमालकांच्या शेतावर राबू लागले.

अशी शेकडो वर्ष गेली. काळ्यांच्या अनेक पिढ्या गुलामगिरीत खितपत राहिल्या. पण हळूहळू दिवस बदलत गेले. एक दिवस असा उगवला कि अमेरिकेच्या अब्राहम लिंकन या अध्यक्षाने लोकांना गुलाम म्हणून राबवण्यावर बंदी आणली आणि त्यानंतरच्या मोठ्या संघर्षातून काळ्यांची गुलामगिरीतून सुटका झाली.

रोझा पार्क अशाच एका काळया गुलामाच्या पिढीतील एक मुलगी. गुलामगिरी संपली पण दारिद्य्र संपले नाही. समाजातील अवहेलना संपली नाही. अलाबामा प्रांतातल्या माँटगोमेरी शहरात राहणारी आणि एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करणारी रोझा. कामावर जायच आणि परत यायला शहरातील बससेवेचा आधार होता. पण या बसचा एक कायदा होता. मागची अर्धी जागा काळ्या लोकांसाठी आणि पुढची अर्धी जागा गोऱ्या लोकांसाठी. आणि हो, आणखी एक. जर गोऱ्यांच्या सगळया जागा भरल्या आणि एखादा गोरा प्रवासी उभा असेल तर काळ्यांच्या भागातील पहिल्या रांगेतील सगळ्या प्रवाशांनी उठून उभे राहायचे आणि त्या गोऱ्या प्रवाशाला जागा करून द्यायची. या सगळ्यावर लक्ष ठेवायच बसच्या ड्रायव्हरने. या बाबतील त्याला पोलिसाचाही दर्जा होता. जर एखाद्या काळ्या माणसांने उठायला नकार दिला तर त्याच्यावर खटला भरला जात असे आणि तुरुंगवासही भोगावा लागत असे. अर्थातच रोझाला पुष्कळवेळा उभ्यानेच प्रवास करावा लागे. एकदा तर ती चुकून पुढच्या दरवाजाने बसमध्ये चढली तर ड्रायव्हरने तिला पुन्हा खाली उतरवले व मागच्या दरवाजाने येण्यास फर्मावले. ती मागच्या दरवाजापर्यंत पोचेपर्यंत बस पुढे निघून गेली. त्या दिवशी रोझाला आपल्या कामावर जाण्यासाठी दुसऱ्या बसची वाट पहावी लागली.

असाच एक दिवस होता १९५५ च्या १ डिसेंबरचा. रोझा कामावरून परत निघाली होती. ती बसमध्ये चढली. मागच्या सगळ्या रांगा भरलेल्या होत्या. काळ्यांसाठीच्या पहिल्या रांगेत ती बसली. बस निघाली आणि काही वेळानंतर गोऱ्या लोकांच्या सगळ्या रांगा भरल्या. ड्रायव्हरच्या लक्षात आले की काही गोरे प्रवासी उभे आहेत. त्याने बस थांबवली आणि काळ्यांच्या पहिल्या रांगेतील सर्व प्रवाशांना उठायला सांगितले. रोझा सोडून सगळेजण उठून उभे राहिले. ड्रायव्हरने रोझाच्या अंगावर ओरडला, “तु का उठत नाहीस? “ रोझाचं उत्तर होत, “ मी उठावे अस मला वाटत नाही.” ड्रायव्हर आणि बाकीच्या प्रवाशांनी अनेकदा सांगूनही रोझाने उठायला नकार दिला. अखेर ड्रायव्हरने पोलिसांना बोलावले आणि रोझाला अटक करण्यात आली. तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. घडल ते ऐवढेच.

रोझाला तुरुंगात टाकल्याची बातमी साऱ्या शहरभर पसरली. काळ्यांचे सगळे पुढारी एकत्र आले. त्यांनी माँटिगोमेरी शहर बससेवेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन साऱ्या काळ्या लोकांना केले. आणि एक परिवर्तनाचे एक आंदोलन उभे राहिले. हा बहिष्कार ३८१ दिवस चालला. या काळात काळ्यांनी पायी कामावर जाणे पसंत केले. काळ्या टॅक्सी ड्रायव्हरनी बसच्याच भाड्यात काळ्या प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर अनेक दडपणे आली पण सगळे ठाम राहिले. शहर बससेवेचा वापर करण्यामध्ये काळ्यांचाच सहभाग मोठा होता. अर्थातच शहर बससेवा तोट्यात जाऊ लागली. एकीकडे न्यायालयात खटला सुरूच होता. अखेर शहर बससेवेत अशी रंगभेद करणारी व्यवस्था बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.

मानवाधिकाराच्या संघर्षातील एक मोठी लढाई म्हणून या आंदोलनाचे नाव घेतले जाते. याच आंदोलनातून मार्टिन ल्यूथर किंग दुसरा याचा उदय झाला. त्याने काळ्यांचे आंदोलन आणखी वरच्या स्तरावर नेले. एका बाईने केवळ जागेवरून उठण्यास नकार दिला, तर त्यातून जगामध्ये खुप मोठे परिवर्तन घडून आले. सामान्य माणसाची ताकद रोझा पार्कने दाखवून दिली.

या आंदोलनानंतर रोझा पार्क हे नाव सर्वांना माहिती झाले,पण त्यामुळे तिच्या आर्थिक स्थितीत फरक पडला नाही. उलट तिला तिच्या कामावरून काढण्यात आले. तिच्या नवऱ्यालाही त्याचे काम सोडून द्यावे लागले. काही काळानंतर तर तिला माँटेगोमेरी सोडून जाण्याची पाळी आली.

२००५ च्या ऑक्टोबरमध्ये मिशिगनमधल्या डेड्राईट शहरात रोझा पार्क जग सोडून गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मॉन्टगोमेरी आणि डेट्रॉईट शहरातील सर्व बसमधील पहिली सीट काळ्या रिबिनमध्ये बांधून " रिझर्व्ह" ठेवली गेली होती. आज रोझा पार्क जगभरातील मानवाच्या अधिकारासाठी लढणारांची आई म्हणून ओळखली जाते.

अशी ही कहाणी सामान्यातील असामान्यतेची, रोझा पार्कची.