रेडिओ प्रेषक
रेडिओ तरंगांच्या प्रेषणाकरिता लागणाऱ्या साधनसामग्रीतील एक प्रमुख साधन. याच्या द्वारे उच्च कंप्रता (दर सेकंदाला होणारी कंपन संख्या) असलेला विद्युत् प्रवाह निर्माण करण्यात येतो आणि प्रेषित करावयाच्या माहितीनुसार त्यात बदल करून तो आकाशकाला (अँटेनाला) पुरविण्यात येतो. रेडिओ प्रेषकाद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या प्रवाहाची कंप्रता १० किलोहर्ट्झ ते १,००,००० मेगॅहर्ट्झ यांच्या दरम्यान असते. तथापि पुढील वर्णनात १,००० मेगॅहर्ट्झपेक्षा कमी कंप्रता असणाऱ्या प्रेषक मंडलांसंबंधीच विवेचन केलेले आहे. यापेक्षा जास्त कंप्रता असलेल्या रेडिओ तरंगांसाठी निराळी तंत्रपद्धती वापरावी लागते. अशा रेडिओ तरंगांना ⇨सूक्ष्मतरंग म्हणतात. त्यांचा विचार येथे केलेला नाही [⟶रडार]. प्रेषित करावयाच्या माहितीनुसार या प्रवाहाचा परमप्रसर (मध्यम स्थितीपासून लंब दिशेने होणारे कमाल स्थानांतर), कंप्रता किंवा कला (एखाद्या संदर्भाच्या सापेक्ष असणारी व कोनात मोजली जाणारी स्थिती) यांत बदल होतो म्हणजेच त्यांचे ⇨विरूपण होते. विशिष्ट गरजेनुसार तयार केलेल्या अभिकल्पाचे (आराखड्याचे) हेतू साध्य करण्यासाठी विभिन्न रेडिओ प्रेषकांत अनेक विभिन्न प्रमुख घटकांचा समावेश करण्यात येतो.
प्रेषकाकडून प्रेषण करण्यासाठी आकाशकाला पुरविण्यात येणारी शक्ती काही अंश वॉट ते १० लक्ष वॉटपर्यंत असू शकते. कमी शक्तीचे प्रेषक प्रामुख्याने सुवाह्य वा चल (फिरत्या) सेवेसाठी (उदा., लष्करी वा पोलीस खात्यातील सेवेसाठी) वापरतात, तर उच्च शक्तीचे प्रेषक दूर अंतरापर्यंतच्या प्रेषणासाठी व दोन ठराविक बिंदुस्थानांपुरत्या मर्यादित अशा स्वरूपाच्या संदशवहनासाठी वापरले जातात.
वापरलेल्या विरूपणाच्या प्रकारानुसार प्रेषकांचे वर्गीकरण करता येते. परमप्रसर-विरूपण प्रेषक मध्यम कंप्रतेच्या रेडिओ प्रेषणासाठी वापरण्यात येतात. कंप्रता-विरूपण आणि कला-विरूपण यांचा रेडिओ प्रेषणासाठी उपयोग करण्याकरिता तरंग कंप्रता-पट्ट्यांची रूंदी पुष्कळ मोठी असावी लागते. विरूपणाचे हे प्रकार मुख्यत्वे उच्च कंप्रतांच्या रेडिओ प्रेषणासाठी वापरतात. आकाशकाला आदान केलेली विद्युत् शक्ती या तिन्ही प्रकारांत एकसमान आहे असे मानले, तर परमप्रसर-विरूपणापेक्षा कंप्रता- व कलाविरूपणांच्या बाबतीत प्रेषित संकेत व गोंगाट [विविध कारणांनी प्रणालीत उद्भवणारा अनिष्ट विद्युत् चुंबकीय क्षोभ ⟶विद्युत् गोंगाट] यांचे गुणोत्तर मोठे असते म्हणजेच त्यांच्या बाबतीत उदभवणाऱ्या गोंगाटाचे प्रमाण कमी असते. अतिशय उच्च कंप्रतांच्या बाबतीतगोंगाटाचे प्रमाण निग्न व मध्यम कंप्रता-पट्ट्यांच्या मानाने पुष्कळच कमी असल्याने या दृष्टीने त्यांचा उपयोग करणे फायद्याचे ठरते.
परमप्रसर-विरूपित संकेतात वाहक कंप्रतेच्या वर व खाली असणाऱ्या सममित कंप्रता-पट्ट्यांना उपपट्टे म्हणतात. या उपपट्ट्यांत प्रेषित केलेली माहिती असते. संकेताचे प्रेषण करण्यासाठी एक-उपपट्टा किंवा स्वतंत्र उपपट्टा अशा दोन प्रणाली वापरतात. एक-उपपट्टा प्रणालीत परमप्रसर-विरूपणामध्ये वापरण्यात येणाऱ्या दोन उपपट्ट्यांपैकी एका उपपट्ट्याचे तसेच वाहक तरंगाचे दमन करण्यात येते किंवा प्रेषकाच्या एकूण शक्तीशी तुलना करता नगण्य मूल्यापर्यंत त्याची राशी कमी करण्यात येते. स्वतंत्र-उपपट्टा प्रेषकात वाहक तरंग कमी करण्यात येतो वा अजिबात काढून टाकण्यात येतो आणि त्याच्या वरच्या व खालच्या उपपट्ट्यांमध्ये माहितीचे प्रेषण करण्यात येते. एक-उपपट्टा पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रेषणात परमप्रसर व कोनीय अशा दोन्ही प्रकारे विरूपण केले जाते. एक-उपपट्टा प्रेषणाचा उपयोग मुख्यत्वे दूर अंतरावरील दोन ठिकाणी असलेल्या दूरध्वनी व तारायंत्र मंडलांच्या थेट विशेष संपर्कासाठी केला जातो. अनुरूप एक-उपपट्टा या नावाने ओळखण्यात येणारी प्रेषण पद्धती रेडिओ कार्यक्रमांच्या प्रेषणासाठी वापरता येते कारण तिच्या ग्रहणासाठी नेहमीचा परमप्रसर-विरूपण ग्राही संच उपयोगात आणता येतो.