रेखावृत्त
पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.
अक्षांशाप्रमाणे एका रेखांशाचेही साठ समान भाग करतात. त्या प्रत्येक भागाला एक मिनिट (') म्हणतात. एका मिनिटाचे साठ भाग केल्यास प्रत्येक भाग हा एक सेकंद (") मोजमापाचा होतो.
रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि.मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते.
२३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि.मी असते.
तसेच ६६°३०' उत्तर आणि ६६°३०' दक्षिण अक्षांशावर म्हणजेच आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्तावर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे ४४ कि.मी असते.
ध्रुवांवरती रेखावृत्ते मिळत असल्याने तेथे लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर ० कि.मी असते.
सर्व रेखावृत्ते समान लांबीची असतात.
प्रमुख रेखावृत्ते
[संपादन]- आंतरराष्ट्रीय वार रेषा (+१८०० पूर्व किंवा -१८०० पश्चिम)
- ग्रीनविचमधून जाणारे मुख्य रेखावृत्त (००)
रेखांशानुसार बदलणारी घड्याळी वेळ
[संपादन]लगतच्या दोन रेखावृत्तांवरच्या घड्याळ्यांमधील स्थानिक वेळांत ४ मिनिटांचा फरक असतो. ग्रीनिविचला मध्यरात्रीचे १२ वाजले असल्यास १ पूर्व रेखावृत्तावर स्थानिक वेळेनुसार रात्रीचे १२ वाजून चार मिनिटे झाली असतील. रात्री बाराला वार बदलतो, या हिशेबाने, १ पश्चिम रेखावृत्तावर १२ला चार मिनिटे कमी असतील, आणि वार आधीचा असेल. भारताच्या मध्यभागातून जाणाऱ्या साडे ब्याऐंशी पूर्व (८२०३०' पूर्व) या रेखावृत्तावर त्यावेळी (८२.५X४=३३० मिनिटे=साडेपाच तास) पहाटेचे साडेपाच वाजले असतील. या घड्याळी वेळेला भारताची प्रमाण वेळ म्हणतात.
ग्रीनविचला मध्यरात्रीच्या बारा वाजता रविवार असेल तर पूर्वेकडे गेल्यावर १८० पूर्व रेखावृत्त ओलांडल्यावरही रविवारच असेल, पण ग्रीनविचवरून पश्चिमेला आधीचा वार म्हणजे शनिवार असल्याने १८० पश्चिम रेखावृत्त ओलांडताना शनिवार असेल. १८० पूर्व आणि १८० पश्चिम हे एकच रेखावृत्त असल्याने तेथे कोणता वार खरा समजायचा हा प्रश्न उरतो. त्यासाठी १८० रेखावृत्तावर पश्चिमेकडून येणाऱ्या जहाजांनी ते रेखावृत्त ओलांडताना त्यांचा जो वार असेल त्याच्या पुढचा वार धरावा, असा संकेत आहे. पूर्वेकडून येणारी जहाजे साहजिकच १८० रेखावृत्त ओलांडताना आधीचा वार धरतात.
१८० रेखावृत्त पॅसिफिक व हिंदी महासागरांतील काही बेटांना भेदून जाते, त्यामुळे बेटाच्या एका हिश्श्यावर एक वार आणि दुसऱ्यावर दुसराच वार अशी स्थिती होते. ही अवघड स्थिती टाळण्यासाठी १८० रेखावृत्ताची रेषा ही सरळ न जाता, बेटांना वळसा घालून नागमोडी मार्गाने जाते. या नागमोडी रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात.