राम बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट (जन्म : १८ नोव्हेंबर, इ.स. १९३१, मृत्यू : २ जुलै, इ.स. २०१२) हे एक मराठी लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांंच्याकडे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कितीतरी नेते-कार्यकर्ते पन्नासहून अधिक वर्षे आकर्षित झाले होते. त्यांतील बर्‍याच चळवळी-संघटनांचे ते सबकुछ होते. पुणे विद्यापीठात १९६५पासून १९९१पर्यंत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात प्रथम व्याख्याता व नंतर प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले. काही काळ त्या विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. बापट १८ नोव्हेंबर १९९१ रोजी विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांचा सहभाग होता. दलित, आदिवासी, मागास व स्त्रिया आणि पर्यावरण याविषयीच्या चळवळीत त्यांना रस होता. त्यांची रसाळ व्याख्यानं आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्त्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती. प्रा. बापट यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली तेव्हा 'प्रहार'मध्ये त्यांच्याविषयी आलेल्या ’मौखिक परंपरेचे पाईक’ या लेखातून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिलेला होता..

डॉ. सदानंद मोरे यांच्या 'तुकारामदर्शन' पुस्तकाची प्रस्तावना राम बापट यांनी लिहिली होती.

राम बापटांचा राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, नाट्यशास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, सामाजिक चळवळी, महाराष्ट्राची वैचारिक परंपरा यांचा गाढा अभ्यास होता. नाटकांवरील अनेक शिबिरांत त्यांनी व्याख्याने दिली.

राम बापट यांचे मुख्य योगदान त्यांच्या समाजशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांनी शेवटच्या ४०-५० वर्षांत सामाजिक संस्था-संघटना व चळवळी यांच्या विविध उपक्रमांत, अभ्यासवर्गांत व शिबिरांत विश्लेषक व चिकित्सक मांडणी करणारी काही हजार भाषणे तरी दिली असतील.

प्रा. बापट यांच्या विचारांवर लोकशाही समाजवादी विचारांचा प्रभाव होता. समाज प्रबोधन संस्था, आंबेडकर अकादमी किंवा युक्रांद सारख्य़ा संस्थांच्या शिबिरांना हजर राहून अनेक विषयांवर ते विचार मांडत असत. असामान्य अशा विचारशक्तीबद्दल सर्व देशभरात त्यांचा लौकिक होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा दिली. वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचय त्यांनी लोकांना करून दिला. महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके इतकेच काय, पण छोटी-मोठी खेडीही त्यांनी अभ्यासवर्ग, शिबिरे आणि व्याख्यानांसाठी पालथी घातली होती. नियोजित कार्यक्रम कितीही आडबाजूला असो, वाहतुकीची कशीही सोय असो ते तिथे जात आणि सलग दीड-दोन तास आपला विषय रसाळपणे मांडत. बापट हे दीर्घ पल्ल्याचे वक्ते होते. दहा-पंधरा मिनिटांत त्यांना विषय मांडता येत नसे. त्यासाठी त्यांना दीड-दोन तास लागत.

प्रा. बापट यांनी नाशिक येथे इ.स. १९९७ साली झालेल्या चौथ्या विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

राम बापट यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • परामर्श (२०११) : हा त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांना लिहिलेल्या सहा प्रस्तावनांचा संग्रह आह.
  • राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद (२०१३) : यात काही लेख व व्याख्यानांचा समावेश आहे.