रामदासी मठ, परळी वैजनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावात बारा ज्योतिर्लींगांपैकी एक असे वैजनाथ महादेवाचे भव्य पुरातन मंदिर पौराणिक काळापासून आहे. या ठिकाणी एक रामदासी मठसुद्धा आहे. परळी वैजनाथ येथे महाराष्ट्र राज्याच्या बसने जाता येते. शिवाय नागपूर, पुणे, मुंबई, हैद्राबाद, बंगलोर, कोल्हापूर अशा ठिकाणांहून रेल्वेनेसुद्धा परळीला जाता येते. या गावात गोराराम, काळाराम आणि सावळाराम अशी तीन राम मंदिरे आहेत असा उल्लेख नानासाहेब देव यांनी ’रामदास आणि रामदास” ग्रंथाच्‍या द्वितीय खंडाच्या २८व्या भागात पान १९३ वर केला आहे. नानासाहेब देव हे चैत्र-वैशाख महिन्यांत शके १८३४ मध्ये जालना ते गुलबर्गा या प्रवासात परळीच्या मठात येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो.

मठ, तेथील परंपरा व हस्तलिखित ग्रंथ यांचा परिचय[संपादन]

बस स्टॅंड किंवा त्या जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर एका टाॅवरच्या नंतर गणेश पार नावाचे गणपती मंदिर आहे. त्याच्या जवळच गोराराम मंदिर नावाने ओळखला जाणारा हा परळी वैजनाथ येथील मठ आहे. विद्यमान मठपती रामदास बुवा रामदासी हे आहेत..

या मठाची परंपरा पुढील प्रमाणे आहे. :-
आप्पास्वामी--> जयरामबुवा--> गंगारामबुवा--> नागोबुवा--> लक्ष्मणबुवा--> माणकेश्वरबुवा--> त्यांचे बंधु परशुरामबुवा--> कल्याणबुवा (निधन - मार्गशीर्ष शुद्ध २, शके १८९१)--> नागनाथबुवा (निधन - आषाढ शुद्ध ५, शके १८८६)--> विद्यमान मठपती रामदास बुवा रामदासी.

मठाचे मूळ पुरुष आप्पास्वामी हे परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड तालुक्यातील गोदावरी काठच्या सुपे या गावचे राहणारे होते. आप्पास्वामी व त्यांचे सात भाऊ या गावात राहात जहागीरदारी व वतनदारी सांभाळत होते. एक साधू त्या गावी आले. त्यांना आपली आध्यात्मिक विद्या या आठ मुलांना द्यायची होती. पण ती घेण्यास ज्यानी नकार दिला ते त्या साधूच्या शापाने निर्वंश झाले. एकट्या आप्पास्वामी यांनी ती विद्या स्वीकारली. त्या सुपे गावी एका रामाच्या मूर्तीची स्थापना केली व तेथेच असलेल्या लिंबाच्या झाडाला रोज रामाच्या पूजेचे तीर्थ घातले तर तुझा वंश वाढेल हा आशीर्वाद दिला. दरम्यान वासुदेवानंदस्वामी तेथे आले. त्यांनी त्या लिंबाला एक लोखंडी कांब ठोकली. तेंव्हापासून त्या झाडाला अर्ध्या भागात गोड पाने येऊ लागली.. पुरामुळे आज ते झाड नाही पण तेथे एक ब्रम्हराक्षसाची शिळा आहे. त्या राम मंदिराची पूजा आजही तेथे वंशपरंपरेने सदाशिवराव जोशी हे करीत आहेत.

या आप्पास्‍वामींना समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी जयरामबुवा हे गाव सोडून परळी वैजनाथ येथे स्थायिक झाले. रामदासांनी परळी वैजनाथ येथील मठात शके १५९४ मध्ये शाडूची हनुमानाची तळहाताएवढी मूर्ती स्थापन केली होती. आजही मठात गेल्यावर डावीकडे ही मूर्ती दृष्टीस पडते.

स्वरूपसांप्रदाय अयोध्या मठ | जानकी देवी श्री रघुनाथ दैवत |
मारूती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी ||

जयरामबुवा हे रामदासी पद्धतीने राहून भिक्षामिसे लहान थोर परिक्षून सोडत होते. त्यांची रामाची उपासना वाढत गेली व शिष्य संप्रदाय मठाशी जोडला जाऊ लागला. समर्थ रामदास स्वामींच्या भेटीसाठी जयरामबुवा यांची तळमळ व तीव्रता वाढत गेली. व शेवटी त्यांनी सज्जनगडावर जाऊन रामदासांची भेट घेतली.

आमची प्रतीक्षा ऐसी | कांही न मागावे शिष्यासी |
आपणामागे भगवंतासी | भजत जावे ||

जयरामबुवा यांनी समर्थ रामदास स्वामींकडे "आपण परळी वैजनाथ येथील मठात हनुमंताची स्थापना केली, आता रामरायाची स्थापना आपल्या हस्तेच व्हावी " अशी मनीषा व्यक्त केली. समर्थांनी श्री जयराम बुवांना एक तलवार भेट दिली. आज्ञा केली की अयोध्येला जाऊन एक रामाची मूर्ती घेऊन या. मुसलमानी अत्याचार सुरूच आहेत. कुठे दगा फटका झालाच तर ही तलवार तुझ्या रक्षणासाठी बरोबर ठेव. रामरायाच्या मूर्ती स्थापनेचे पुढे पाहू. समर्थांची आज्ञा घेऊन जयरामबुवा परळी वैजनाथ येथे आले. शुभ दिवस व मुहूर्त पाहून अयोध्येला जाण्यास रवाना झाले. व अयोध्येहून राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती घेऊन परतले..

जयरामबुवा हे अयोध्येला जाऊन मूर्ती घेऊन परळी वैजनाथला परतही आले. इकडे रामदास स्वामींचे माघ वद्य ९ शके १६०३ या दिवशी निर्वाण झाले. सर्व मठांतून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. इकडे परळी वैजनाथ मठात जयरामबुवा राम मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी वाट पहात होते. अचानक समर्थांच्या आज्ञेने कल्याणस्वामी यांचे परळी वैजनाथ येथील मठात आगमन झाले. समर्थांनी जयराम बुवांना सांगितले होते की मूर्ती स्थापनेसाठी मी कल्याणास पाठवितो. या वचनाप्रमाणें समर्थांच्या निर्वाणानंतर मठात आलेल्या कल्याण स्वामींच्या हस्ते शके १६०४मधील एका शुभदिनी परळी वैजनाथ येथील रामदासी मठात समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीरायापुढे मंत्रघोषात अयोध्येहून आणलेल्या राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली.