रामचंद्र गणेश बोरवणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र गणेश बोरवणकर (जन्म : ? ; - २२ मार्च १९५१) हे एक मराठी लेखक, संस्कृत ग्रंथांचे अनुवादक आणि संस्कृत व्याकरणकार होते. बोरवणकरांनी 'रघुवंश', 'मेघदूत', 'मित्रलाभ', बाणभट्टाची कादंबरी ही संस्कृत वाङ्मयावर आधारलेली भाषांतरित पुस्तके लिहिली. यांनी सार्वजनिक काका, वासुदेव बळवंत फडके, देवी अहिल्याबाई होळकर, इत्यादींची चरित्रेही लिहिली.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

रघुवंश या त्यांच्या अनुवादित ग्रंथातील उल्लेखानुसार त्यांनी भाषांतराचे काम मनावरील नैराश्य दूर सारण्याच्या हेतूने हाती घेतले असावे. १९३५ च्या मेघदूताच्या अनुवादात त्यांनी आपला पत्ता 'गणेश लॉज, ठाणे' असा नोंदवलेला दिसतो.

साहित्यिक कारकीर्द[संपादन]

बोरवणकर हे 'रघुवंश,मेघदूत' इत्यादी संस्कृत काव्यांच्या सार्थ-सटीप पुस्तकांचे कर्ते होते. बोरवणकरांनी जी पुस्तके लिहिली त्यांत चित्रशाळा प्रकाशनाचा मोलाचा वाटा आहे. रामचंद्रशास्त्री किंजवडेकर ह्यांनी ह्या पुस्तकांचे संपादन केले आहे. 'रघुवंश' व 'मेघदूत' ह्यांच्या भाषांतराकरिता बोरवणकरांनी मल्लिनाथ सूरीच्या 'संजीवनी' टीकेचा आधार घेतला आहे. असे असले तरी, त्यांचे भाषांतर हे मल्लिनाथी टीकेचा मराठी अनुवाद नसून ते स्वतंत्र प्रज्ञेने लिहिलेले आहे. मतभेदाच्या सर्व जागा ते स्पष्टपणे दर्शवितात. तसेच कालिदासावर केवळ स्तुतिसुमने न उधळता त्याच्या काव्यांत आढळणाऱ्या दोषांवरही ते परखडपणे भाष्य करतात. रघुवंशाचे भाषांतर व मेघदूताचे भाषांतर ही दोन्ही प्रौढ विद्यार्थ्यांच्या व ज्यांना संस्कृत भाषा येत नसून संस्कृत ग्रंथांची गोडी चाखायची उत्कट इच्छा आहे अशा लोकांच्या उपयोगाच्या दृष्टीने केली होती. त्यांनी हितोपदेशांतील 'मित्रलाभ' प्रकरणाचे भाषांतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने केले आहे.

बोरवणकरांचा संस्कृत भाषेचा दांदगा व्यासंग होता, हे त्यांच्या पुस्तकांवरून दिसून येते. असे 'अभ्यस्त' असूनसुद्धा ते प्रस्तावनेत स्वतःला 'अनभ्यस्त' असे म्हणतात. तसेच अनेकदा प्रस्तावनेच्या खाली ते स्वतःचे नाव न लिहिता 'भाषांतरकर्ता' असे लिहितात. म्हणजे मुखपृष्ठ वगळल्यास लेखकाच्या नावाचा कुठेही उल्लेख होत नाही.

बोरवणकरांच्या पुस्तकांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :

महाकवि श्रीकालिदासविरचित रघुवंश[संपादन]

महाकवि कालिदासाच्या रघुवंश या काव्याचा अनुवाद रामचंद्र गणेश बोरवणकरांनी एकूण चार भागांत केला आहे. हा अनुवाद बोरवणकर यांचा तर संपादन रामचंद्रशास्त्री किंजवडेकर यांचे होते. हा ग्रंथ पुण्यातील चित्रशाळा प्रकाशनने प्रथम प्रकाशित केला होता.

प्रत्येक सर्गातील मूळ श्लोक, त्यावरील मल्लिनाथाची टीका, मराठी अन्वयार्थ, सरलार्थ, टीपा, संस्कृत टिप्पणी, अशी ग्रंथाची रचना आहे. प्रत्येक सर्गाला रसग्रहणात्मक एक छोटासा उपसंहार जोडलेला आहे. तसेच शेवटच्या चौथ्या भागाला सुमारे पन्नास पानांचा एक दीर्घ उपसंहार जोडला असून त्यांत कालिदासाचे थोडक्यात चरित्र सांगून सबंध काव्याचे मार्मिक रसग्रहण आले आहे.

या ग्रंथाचे पुढीलप्रमाणे चार भाग आहेत :

भाग पहिला : सर्ग एक ते पांच : पृष्ठसंख्या २५२

भाग दुसरा : सर्ग सहा ते नऊ : पृष्ठसंख्या २३२

भाग तिसरा : सर्ग दहा ते तेरा : पृष्ठसंख्या २१२

भाग चौथा : सर्ग चौदा ते एकोणीस : पृष्ठसंख्य़ा ३००

महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत'[संपादन]

या ग्रंथाचाही अनुवाद चित्रशाळा प्रकाशनने (प्रथमावृत्ती १९३५, द्वितीयावृत्ती एप्रिल १९५८) प्रकाशित केला. संपादन रामचंद्रशास्त्री किंजवडेकर यांनी आणि अनुवाद बोरवणकरांनी केला होता. संपादकाच्या मतानुसार मेघदूताचे कथासूत्र महाकवि कालिदासाला रामायणातील रामचंद्राने सीतेला उद्देशून हनुमंताबरोबर पाठविलेल्या संदेशावरून सुचले असे विद्वानांचे मत आहे; या काव्यातील अंतर्गत पुराव्यावरूनही हीच गोष्ट निश्चित होते. मेघदूताचे भाषांतर रघुवंशाच्या भाषांतराच्या धर्तीवरच केले आहे.

सार्थ हितोपदेश भाग पहिला - मित्रलाभ[संपादन]

पंडित विष्णूशर्म्याचे 'हितोपदेश' हे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बालपुस्तक आहे. या पुस्तकात पशुपक्षांच्या, बालमनाला रुचतील अशाच मनोरंजक कथा सोप्या संस्कृत भाषेत लिहिलेल्या आहेत. हितोपदेशांतील 'मित्रलाभ' प्रकरणाचे भाषांतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने केले आहे. म्हणून त्यांत समास, क्रियापदाची रूपे वगैरे सर्व स्पष्ट करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. भाषांतराला भाषेच्या दृष्टीने सरळपणा यावा म्हणून कोठे कोठे मूळ भाषांतराच्या पुढे (-) खूण करून घातली आहे. तसेच अर्थबोध सरळ होण्यासाठी काही ठिकाणी 'पदरमोड' करावी लागली आहे. ती चौकोनी कंसांत दाखवली आहे. यांत मूळ अन्वय, अन्वयार्थ, सरलार्थ, टीपा व संपादकीय पादटीपा, श्लोकसूची इतक्या अंगांचा समावेश केला आहे.

अनुवादग्रंथातील संपादकीय टिपणानुसार ही आवृत्ती मुख्यतः विद्यार्थ्यांसाठीच असल्यामुळे संविधानकास धक्का न लावता मुळातील अश्लील भागास कात्री लावली आहे.

व्यावहारिक संस्कृत व्याकरण[संपादन]

या पुस्तकाची रचना आणि लेखन बोरवणकर यांनी फावल्या वेळात हा विषय आपल्या मुलांना शिकवीत असताना केले. पुस्तकाची रचना कै. मो रा. काळे यांच्या 'Higher Sanskrit Grammar' या ग्रंथावर आधारित अशी आहे.

या ग्रंथात मुंबई-गिरगावातील हिंद प्रकाशनचे नरहर मोरेश्वर जोशी यांनी त्यांच्या कल्पनेनुसार निम्म्याहून अधिक भर घातली असली तरी कै. बोरवणकरांच्या मूळ प्रयत्नामुळेच ते शक्य झाले असे समजून प्रकाशकांनी त्यांचेच एकमेव नाव या पुस्तकाचे लेखक म्हणून औचित्यपूर्वक कायम ठेवले आहे.

या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात अ, आ, या अक्षरक्रमाने शेकडो महत्त्वाच्या संस्कृत धातूंची विविध रूपे दिली आहेत. अशा तऱ्हेची विविध रूपे ही कृष्णाजी गोविंद ओक या संस्कृत शिक्षकांच्या 'A Companion to Sanskrit Grammar' पुस्तकातील महत्त्वाचा धातुरूप कोशाचा भाग असून, तो आवश्यक ती भर घालून, या पुस्तकात उद्धृत करून दिलेला आहे.