Jump to content

रामचंद्रबुवा शिरवळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर (देशपांडे) (१९०१-१९७५) शिरवळकरांचा ज्ञात इतिहासात प्रथम उल्लेख आढळतो तो मोगलांच्या उत्तरार्धात पेशवाईच्या काळात, सुरुवातीचा काळ. शिरवळला एक भुईकोट गढी होती. गढीवर शिरवळकर अधिकारी होते. त्यांनी मोगलांविरुद्ध ही गढी लढवून त्यांचा पराभव केला म्हणून पेशव्यांनी शिरवळकरांना देशपांडे वतन दिले. तेव्हापासून शिरवळकरांचे देशपांडे आडनाव पडले. पुढे इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी सर्व वतने, जहागीऱ्या खालसा केल्या. देशपांडेंकडे तेव्हा धन होते. म्हणून त्यांनी काहीतरी व्यवसाय असावा म्हणून सराफीचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्याकाळात त्यांचे आडनाव जाऊन सराफ हे आडनाव प्रचलित झाले. पुढे हा व्यवसाय करताना ५ पिढ्यांना असा अनुभव आला की हे धन शापित आसावे. कारण मुलगा जन्मला की वडील मरत असत. म्हणून हे सर्व धन लोकांमध्ये वाटून त्यांनी सराफी बंद केली. आता सर्वत्र फिरंग्यांचा अंमल सुरू झाला होता. आता इंग्रजांविरुद्ध अभियान सुरू झाले. त्यात १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध इंग्रजांनी दमन नीतीने मोडून काढलं. संस्थाने जप्त झाली, खालसा झाली. पुढे देशपांडे कुटुंब महाड येथे स्थायिक झाले. मुळचे शिरवळचे म्हणून शिरवळकर आडनाव पुढे प्रचलित झाले. कुटुंब प्रमुख अंताजी नारायण देशपांडे (आप्पा) हे होते. महाडला १९०१ साली चंपाषष्ठीचे नवरात्र बसले त्या दिवशी त्यांना १ ले अपत्य झाले. नाव रामचंद्र ठेवले. राम ८ वर्षांचे असताना डोळे आले म्हणून वैद्याकडे नेले. वैद्याने चुकून एका डोळ्यात आयोडीन टाकले आणि रामचंद्रांचा एक डोळा कायमचा गेला. तरुण वयात आप्पांच्या मित्रांनी इंग्रजांची नोकरी करायची नाही अशी शपथ घेतली. ती फक्त अप्पांनीच शेवटपर्यंत पाळली. बाकी सर्वांनी नोकऱ्या स्वीकारल्या. मग ते कीर्तन सेवा करू लागले आणि हाच त्यांचा व्यवसाय बनला. पुढे अप्पांना ५ अपत्ये झाली- पांडुरंग, मधुकर, सदाशिव, चिंतामणी व श्रीपाद व १ मुलगीही झाली. महाडला आप्पांनी चातुर्मास (४ महिने) कीर्तन सोहळा सुरू केला. मध्येच आप्पा आजारी पडले. तेव्हा त्यांनी रामचंद्रांना कीर्तन करण्यास सांगितले. रामाचे वय तेव्हा १५ वर्षे होते. रामने मोठ्या हौसाने व आवडीने १ले कीर्तन केले. ते कीर्तन लोकांना इतके आवडले की पुढची सर्व कीर्तने रामनेच करायची असा आग्रह श्रोत्यांनी केला. व रामचंद्रबुवांनी पहिला चातुर्मास पूर्ण केला. कीर्तनासाठीच त्यांचा जणू जन्म झाला होता. पुढेही कीर्तनच करायचे तर महाडला राहून कसे जमेल? त्याकरता पुण्यासारख्या शहरात गेले पाहिजे म्हणून महाडचा मुक्काम हालवून सर्व पुण्यात आले. नेमकी ह्यावेळी प्लेगची साथ सुरू झाली. एका मारुतीच्या देवळात मुक्काम केला. अन् नेमकी आप्पांच्या पत्नीला प्लेगची गाठ आली. पुढे १०३५ गणेशपेठ येथे भाड्याने जागा घेऊन राहिले. पुण्यात रामचंद्र बुवांची कीर्तने सुरू झाली. अफाट गर्दी असे. सोमेश्वर मंदिरासमोर एक विष्णूचे मंदिर आहे. कीर्तनाला बसायला जागा पुरेना म्हणून मालकाने वर एक मजला बांधून घेतला. बंडू- मधुकर, श्रीपाद उत्तम पेटी वाजवत तर सदाशिव व चिंतामणी तबला वाजवत. पुढे गणेश पेठेतले घरच विकत घेतले. आता संपूर्ण भरभराटच झाली होती. म्हणून ८५२ रविवार पेठ, लोणार आळी येथील ३ मजली वाडा विकत घेतला. व त्याची डागडुजी करून तेथे रामाचे स्वतःचे मंदिर बांधले. व ते लोकांना दर्शनासाठी उघडे केले. बेळगावहून राम-लक्ष्मण सीता मारुतीच्या मूर्ती आणून स्थापन केल्या. गणेश पेठेतील घर विकून टाकले. देशपांडेंचे शिरवळकर कसे झाले तो भागही मजेशीर आहे. त्यावेळी आप्पा कीर्तन करीत. लोकं विचारीत- बुवा कोण आहेत? अहो ते आपले शिरवळकर देशपांडे हो! पुढे देशपांडे बाजूलाच राहिले आणि शिरवळकरच प्रचलित झाले. रामचंद्रांचे (दादा) भाऊ मात्र देशपांडेच लावत. रामचंद्रांना सर्व बंधू दादा म्हणत कारण भावंडात ते सर्वांत मोठ होते. दादांची पहिली पत्नी केसकरांकडची होती. ती अकाली गेली. पुढे दादा बडोद्याला कीर्तनाकरता गेले असता बिडकरांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. नाव जानकी ठेवले. जुन्या पतिव्रतेप्रमाणे पती हाच तिचा देव. त्यामुळे दादांची सेवा हेच ध्येय. जानकी यांना सर्व वहिनी म्हणू लागले कारण दादांचे धाकटे बंधू त्यांना परंपरेने वहिनी म्हणत. हीच नावे पुढे कायम झाली. अगदी दादा वहिनीची मुले देखील त्यांना दादा व वहिनी अशीच हाकमारत. याचे कारण म्हणजे दादांचे लहान बंधू हे देखील दादांकडे त्यांच्या अपत्याप्रमाणे वाढले. वाड्यात मुळातच एका बाजूला विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती होत्या. त्या तशाच कायम ठेवल्या. व राम मंदिराचा भाग बनल्या. मग वाड्यावर पाटी देखील लावण्यात आली ‘श्री शिरवळकर बुवांचे श्री राम मंदिर’. राम उपास्य दैवत. पुढे सज्जनगडाशी संबंध आला व बुवा रामदासी बनले. वाड्यामध्ये कोणीही अनोळखी मनुष्य; कोणाही लांबच्या नात्यातील ओळख सांगून राहत असत. दादा अतिशय शांत व स्थितप्रज्ञ होते. एकदा दादा उत्सवाला बाहेर गावी गेले असताना देवाचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने भर दुपारी चोरीला गेले. उत्स्वाहून आल्यावर राम दर्शनाला गेले तर मस्तकावर मुकुट नाही. चांदीची दीड किलोची छत्री नाही. गळ्यात अलंकार नाहीत. भोवतालचे सर्व एकदम चूप! विचारले- "देवाचे दागिने, मुगुट वगैरे कुठे आहे? स्वच्छ करण्यासाठी काढलेत का?" “चोरीला गेले!” क्षणभर शांतता. दादा म्हणाले- "ठिक आहे. जशी रामची इच्छा. त्याला हवे असेल तर तोच पुन्हा बनवेल." न दुःख न खेद! स्थितप्रज्ञ! म्हणून दादांना सर्वच कीर्तनकार आधुनिक एकनाथ महाराज म्हणत असत. कधी रागावणं माहितीच नाही! त्याकाळी बहुतेक बुवा मुला-पत्नीह प्रवास करीत. पेटीवाले- तबलजी बरोबर असत. ते पगारी असत. इंदौरच्या राणीसाहेबांचे दरबारात चातुर्मास कीर्तन झालेले बहुदा दादा हे एकमेव असावेत. या चातुर्मासातील एक विशेष आठवण. दादा इंदौरला गेले म्हटल्यावर बरेच नातेवाईक इंदौरला येऊन राहत. दरबाराने एक दुकान सांगून दिले होते. 'तेथून तुम्हाला काय लागेल ते घेऊन या. बिल संस्थान देईल.' चातुर्मास संपला. वाण्याचं बिल आलं. तेव्हा राणीसाहेबांनी विचारलं- "बुवा, बिल इतकच कसं? तुमच्याकडे तर सतत पुण्याहून लोकं येऊन राहत होते." तेव्हा दादांनी उत्तर दिले ते फारच व्यवहारी होते. ते म्हणाले- "तुम्ही आमची म्हणजे, मी, पत्नी, पेटी-तबलजी यांची जबाबदारी घेतली. माझ्याकडे माझे इतर नातेवाईक आले तर त्यांचा खर्चं मी करत असे. त्याचा बोजा आपणावर का म्हणून ठेवायचा?" राणीसाहेब आश्चर्याने पाहतच राहिल्या. पण त्यामुळे ४ हजार रुपये बिदागीच्या ऐवेजी ५ हजार रुपये बिदागी आदराने दिली. (त्यावेळचे ५ हजार म्हणजे २०२१ सालचे ५० हजार तरी होतील.) त्यानंतर इंदौरमध्ये निरनिराळ्या भागात ४ चातुर्मास झाले. दादा हे उपजत स्वयंभू कीर्तनकार होते. त्यांचा जन्मच कीर्तनाकरीता झाला होता. आप्पांचे पूर्वरंग-चरित्रे अगदीच ठरविक असत म्हणून दादांनी पूर्वरंग व आख्याने नव्याने तयार केली. जवळपास ७० पूर्वरंग व १०० ते १५० चरित्रे त्यांनी रचली. पुढे ती पुस्तक रूपाने (कै.) सदाशिवबुवांनी १० भागात प्रसिद्ध केली. शिवाय सुभाषचंद्र बोस यांचे चरित्रदेखील प्रसिद्ध केले. या पुस्तकांचा वापर पुढील कित्येक कीर्तनकारांनी केला. दादा, कीर्तनाकरीता महाराष्ट्र, मध्ये प्रदेश, गोवा सर्वत्र हिंडत असत. त्याकाळी कुटुंब नियोजन वगैरे कल्पना नव्हत्या. मुले ही ईश्वराची देणगी असा समज होता. दादांना ५ मुलगे व ५ मुली होत्या. १) महादेव २) पुरुषोत्तम ३) दामोदर ४) गंगाधर ५) सुहास हे मुलगे तर १) नर्मदा (सावंत) २) शांताबाई (देशपांडे) ३) मंदाकिनी (वाघ) ४) चंपावती (शेंड्ये) ५) मंगला (देव) या कन्या. १९७५ साली नाशिकच्या बालाजी मंदिराचा ३०० वा वर्धापनदिन होता. दादांना खास आमंत्रण होते. त्यावेळी दादांच्या ह्रदयावर उपचार सुरू होते. त्या अवस्थेत दादा नाशिकला जायला निघाले. एरवी दादांना सोडायला कोणी जात नसे कारण प्रवास नेहमीचाच झाला होता. पण त्यादिवशी सोबत दादांचा धाकटा मुलगा सुहास व सून सुगंधा बरोबर होते. गाडीत चढून दादांनी त्या दोघांना हात केला व अचानक मान टाकली हे पाहून सुहास व सुगंधाने त्यांना घेऊन त्वरित इस्पितळ गाठले पण त्यांची प्राण ज्योत स्टेशनवरच मालवली होती. अंत्ययात्रेला आफाट जनसमुदाय जमला होता. बालाजी संस्थानाने ठरलेला सर्व कार्यक्रम रद्द केला व उत्सव केला नाही. दादांचे खऱ्या अर्थाने तीन शिष्य होते. जे दादांकडे राहून गुरुकुल पद्धतीने शिकले. पैकी एक- (कै.) गजाननबुवा राईलकर, दोन- (कै.) सुंदरबुवा मराठे आणि तीन- (कै.) दिनानाथबुवा गंधे. हे तिघेही अत्यंत प्रसिद्ध होते. पैकी दिनानाथबुवांनी आधुनिक वाद्यांचा वापर करून त्यांची अनोखी शैली विकसित केली. ते कीर्तनात समरस होऊन जात. त्यांच्या शैलीने नवीन पिढीदेखील कीर्तनाकडे आकर्षित झाली. (याशिवाय दादांचे चिरंजीव दामोदरबुवा (कीर्तन भूषण, हेही दादांचे शिष्यच)). दादांच्यानंतर, दादांनी सुरू केलेला दासनवमी उत्सव विठ्ठलबुवा जुन्नरकरांच्या मदतीने दामोदरबुवा, गजाननबुवा व दिनानाथबुवा यांनी सुरू ठेवला.

[][][][][][][][][][१०][११][१२]

  1. ^ कीर्तनकार
  2. ^ रामदासी
  3. ^ रामचंद्रबुवा शिरवळकर
  4. ^ विठ्ठलबुवा जुन्नरकर
  5. ^ जुन्नरकरबुवा
  6. ^ दत्तात्रयबुवा राईलकर
  7. ^ राईलकरबुवा
  8. ^ दिनानाथबुवा गंधे
  9. ^ गंधेबुवा
  10. ^ पुणे
  11. ^ नाशिक
  12. ^ सुंदरबुवा मराठे