Jump to content

रामकृष्ण हरिश्चंद्र चेंबूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामकृष्ण हरिश्चंद्र चेंबूरकर हे एक सामाजिक द्रष्टे नेते होते. त्यांचा जन्म मुंबईमध्ये चेंबूर येथे ६ ऑक्टोबर १८८४ साली झाला. चेंबूर गावावरून त्यांना चेंबूरकर नाव पडले.चेंबूर पोलिस स्थानकाजवळ त्यांचे घर आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर १२ ऑगस्ट १९२० रोजी स्थानिक प्रतिष्ठित लोकांच्या विरोधाला न जुमानता लोकमान्य टिळकांच्या तसबिरीची पालखीतून मुक मिरवणूक काढण्यात आली होती.त्यामध्ये रामकृष्ण चेंबूरकर ह्यांनी पुढाकार घेतला होता. ह्या घटनेमुळे राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या लोकांची एकजूट झाली आणि एक संघटना स्थापन झाली. त्यांनी १ ऑगस्ट १९२१ रोजी चेंबूरमध्ये लोकमान्य टिळक लायब्ररी स्थापन केली. ते हयातभर वाचनालयाचे अध्यक्ष राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. ते लोकल बोर्डात असताना त्यांनी अनेक खेड्यांमध्ये विहिरी बांधल्या. अनेक धर्मादाय दवाखाने चालू केले. इसवी सन १९२९ साली त्यांनी शेठ द्वारकादास त्रिभुवनदास धर्मादाय दवाखाना चालू केला. तुर्भे येथे कॉलरा ची साथ असताना लोकल बोर्डाच्या डॉक्टरांसोबत कोळीवाड्यात राहून तीन दिवस अहोरात्र आजारी लोकांवर उपचार करून घेतले.स्कूल बोर्डाच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी नवीन शाळा चालू केल्या. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी दिवाबत्ती, पाणीपुरवठा, आणि आरोग्यसुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. सन १९२९ मधील घाटले गावातील सायमन कमिशन वरील बहिष्कार आंदोलनात ते सहभागी झाले होते.सन १९३० च्या कायदेभंग चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना पाच महिने कारावास झाला.पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सहा महिने रात्रंदिवस कार्य केले. दिनांक ३० जानेवारी १९६६ रोजी त्यांचे देहावसान झाले.त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव चेंबूर आणि घाटकोपर जोडणाऱ्या घाटकोपर माहुल रस्त्याला रामकृष्ण चेंबूरकर मार्ग म्हणून देण्यात आले आहे.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४