Jump to content

राणी पाकोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्ल्यू मॉरमॉन

ब्लू मॉरमॉन (शास्त्रीय नाव: Papilio polymnestor) (मराठी उच्चार - ब्ल्यू मॉरमॉन) हे महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' आहे. याच्या पंखांचा विस्तार १२०-१५० मिमी असतो. देशातील 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असण्याचा मान ब्लू मॉरमॉनला जातो. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात.

वितरण[संपादन]

हे फुलपाखरू केवळ भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. भारतात हे पश्चिम घाट, दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावरच आढळते. उत्तरेला गुजरात पर्यंत हे सापडल्याच्या नोंदी आहेत. हे बऱ्याचदा अगदी बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरात अगदी वाहतुकीच्या गर्दीत सुद्धा आढळते.

स्थिती[संपादन]

हे सामान्यपणे आढळणारे फुलपाखरू आहे आणि हे धोक्यात असल्याचे मानले जात नाही. हे वर्षभर आढळते, पण विशेषतः पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात जास्त आढळते.

मूळ स्थान[संपादन]

जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासारख्या भागात हे खास करून आढळते. पानगळीच्या जंगलात सुद्धा हे आढळते. याचे वसतीस्थान लिंबूवर्गीय वनस्पती असल्यामुळे या वनस्पतींची लागवड असलेल्या शहरी भागात सुद्धा हे आढळते. हे एका दिशेने वेगात उडते आणि उडताना सतत मार्ग बदलते, वर-खाली उडत असते. त्यामुळे याचे छायाचित्र घेणे सुद्धा कठीण जाते. खनिज समृद्ध जमिनीत हे चिखलपान मड पड्लिंग करताना दिसते. सीताफळाचा कुजलेला गर पडलेला असेल तर त्याचा दर्प सुटतो. त्याकडे आकर्षित होऊन राणी पाकोळी हमखास त्यावर आल्याची निरीक्षणे आहेत. मधातून न मिळणारी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठीच फुलपाखरे चिखल, कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात.

आंबोली येथे आढळणारे फुलपाखरु

खाद्य वनस्पती[संपादन]

पपनस,लिंबू या वनस्पतींची पाने याचे खाद्य आहे.

सवयी[संपादन]

हे फुलपाखरू जंगलातील वाटा आणि झरे यावर आढळते. याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे तो सावली टाळतो. विशेषतः अशोकी, मोगरा कुलातील फुले, झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देत असते.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]