Jump to content

रहाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रहाटगाडगे या पानावरून पुनर्निर्देशित)

रहाट म्हणजे रुंद तोंडाच्या (५ फुटा पेक्षा जास्त व्यासाच्या) विहिरीतून दोरीला बादली बांधून पुलीच्या मदतीने पाणी वर काढले जाते ते चाक होय. पूर्वी बागायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी वाडीतील मोठ्या व्यासाच्या विहिरीच्या एका बाजूला मोठा लाकडी किंवा लोखंडी रहाट बसवून लोखंडी डब्यातून किंवा मातीच्या मडक्यातून ज्याला बांडी म्हणले जायचे त्याद्वारे पाणी उपसले जायचे आणि ते दांडाद्वारे किंवा पाटाद्वारे केळी, नारळ, पानवेल इत्यादी झाडांना पुरविले जायचे.साधारणपणे २०-२२ मडक्यांची माळ गोलाकार चक्रावर लावून हा रहाट फिरविण्यासाठी टोणगा किंवा बैल जुंपला जात असे जो ऊसाच्या घाणी प्रमाणे गोलाकार फिरत असे.प्रत्येक मडक्याला बुडाला एक लहानसे छिद्र पाडले जाई जेणेकरून चक्राच्या एका बाजूला अतिभार पडत नसे.


पाणी उपसण्यासाठी ‘नोरिया’ या नावाने रहाटगाडग्याचा वापर मध्यपूर्वेत फार पूर्वीपासून होत आलेला आहे. रहाटगाडगे चालविण्यासाठी पर्शियात गाढवे, मध्यपूर्वेतील इतर बऱ्याच देशांत उंट, भारत व आग्नेय आशियातील देशांत रेडे व बैल आणि ग्रीस, इटली इ. दक्षिण यूरोपातील देशांत घोडे अशा निरनिराळ्या जनावरांचा उपयोग केला जातो.

भारताच्या समुद्रकिनाऱ्यालगत घाटाखालील प्रदेशात ९ मी. पर्यंत खोल विहिरीतून पाणी उचलण्यासाठी रहाटगाडग्यांचा उपयोग करतात. पूर्वापार वापरात असलेली रहाटगाडगी लाकडी आहेत. अशा रहाटगाडग्यात लाकडी चक्राकार मातीच्या पोहऱ्यांच्या (गाडग्यांच्या) निरंत माळा चढलेल्या असतात. त्या माळांमधील पोहऱ्यांतून वर आलेले पाणी एका पन्हळीत पडते. तेथून ते एका हौदात जाते व हौदातील पाणी पाटाने शेतात नेले जाते. या रहाटगाडग्यातील लाकडी सामान वरचेवर दुरुस्त करावे लागते. ते पाण्याने भिजत असल्याने कुजते. त्यामुळे दर तीन वर्षांनी ते बदलावे लागते. दैनंदिन वापरात तसेच पाण्याच्या पातळीनुसार माळेची लांबी कमीजास्त करताना मातीचे पोहरे फुटतात व ते बदलावे लागतात. या सर्व कारणांमुळे लाकडी रहाटगाडग्यांचा वापर कमी झालेला आहे. लाकडी रहाटगाडग्याने ८-९ मी. उंचीवर ताशी ५,००० लि. पाणी उचलता येते.