Jump to content

यास्मिन शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यास्मिन शेख
जन्म नाव यास्मिन शेख
जन्म २१ जून, १९२५
महाराष्ट्र
मृत्यू २४ ऑगस्ट, २०२६ (वय १०१)
भोसले नगर पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन
प्रसिद्ध साहित्यकृती मराठी शद्बलेखनकोश

श्रीमती यास्मिन शेख (२१ जून १९२५ - २४ ऑगस्ट, २०२६)[] या मराठी भाषेच्या व्याकरण-तज्ज्ञ होत्या. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असत.

मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत होते.[]

व्यक्तिगत जीवन

[संपादन]

यांचे पूर्वाश्रमीचे नाव 'जेरुषा रुबेन' असे असून त्या जन्माने ज्यू धर्मीय होत्या.[] लेखक वसन्त कानेटकरांच्या पुढाकाराने त्यांची नाशिकमध्ये एका चित्रमन्दिरात काम करणा-या अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) या मुस्लिम तरुणाशी भेट झाली, आणि १९५० साली त्यांनी शेख यांच्याशी विवाह केला. त्यांनी आपला धर्म बदलला नाही, पण जेरुषा रुबेन नांव बदलून त्या यास्मिन शेख झाल्या, असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला. त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.

कार्य

[संपादन]

प्रा. श्री.म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी श्री.पु. भागवत आणि साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले होते.[ संदर्भ हवा ]

शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चौतीस वर्षे अध्यापन केले आहे. एस.आय.ई.एस. महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, मुंबई' मध्ये आय.ए.एस. च्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र याचे दहा वर्षे अध्यापन केले.[ संदर्भ हवा ]

बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या 'कार्यात्मक व्याकरणा'च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.[ संदर्भ हवा ]

त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून पंधरा वर्षे कार्यरत होत्या.[ संदर्भ हवा ]

लेखन

[संपादन]
  • विविध नियतकालिकांमधून त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे.

ग्रंथसंपदा

[संपादन]
  • मराठी शब्दलेखनकोश, हर्मिस प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती - २००७, दुसरी आवृत्ती - जून २०१५, ISBN: 978-81-924920-7-0
  • मराठी लेखन मार्गदर्शिका, प्रकाशक - राज्य मराठी विकास संस्था, मुंबई

सन्मान

[संपादन]
  • नाशिक मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.

पुरस्कार

[संपादन]
  • प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. गं.ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. शेषराव मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
  • महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
  • मसापचा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
  • कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 'शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने जीवनगौरव पुरस्कार' (२२ फेब्रुवारी २०२६) []

गौरव-ग्रंथ

[संपादन]

यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर []

संदर्भ

[संपादन]
  1. "मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". २४ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/
  3. 1 2 यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर
  4. दै.दिव्य मराठी, पुणे आवृत्ती, २२.०२.२०२६

बाह्य दुवे

[संपादन]