Jump to content

यशवंत महाडिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यशवंत दत्त या पानावरून पुनर्निर्देशित)
जन्म यशवंत महाडिक
७ नोव्हेंबर १९४५ (1945-11-07)
पुणे
मृत्यू ११ नोव्हेंबर, १९९७ (वय ५२)
मुंबई
इतर नावे यशवंत दत्त
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, नाटके)
भाषा मराठी
प्रमुख नाटके तो मी नव्हेच

यशवंत महाडिक ऊर्फ यशवंत दत्त (नोव्हेंबर ७, १९४५ - नोव्हेंबर ११, १९९७) हे मराठी अभिनेते होते.

उत्तम अभिनयशैली, विनोदी स्वभाव आणि इतरांची नकला करण्याची वृत्ती तसंच आई-वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा त्यामुळे मराठी नाटक व चित्रपट विश्वाला यशवंत दत्त यांच्या रूपाने सशक्त कलाकार लाभला; मुळं नाव यशवंतसिंह महाडीक असलेल्या यशवंत दत्त यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९४५ साली पुणे येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल येथे झाले.शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्‍या हुबेहूब नकला करत असत, यामुळे बऱ्याचदा त्यांना शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभे केले जात. भविष्यात नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. “थंडर्स” नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असल्यामुळे निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते.

यशवंत दत्त यांचे आई-वडिलांनी चित्रपटातून व नाटकांत कामे केली होती. यशवंत दत्त यांच्या वडिलांनी “गरिबांचे राज्य” या नावाचा चित्रपट देखीळ काढला होता; पण आर्थिक दृष्ट्या या चित्रपटाचे खुप नुकसान झाले होते. त्यामुळे हालाखीची परिस्थिती त्यांच्या कुटुबियांवर ओढवली होती. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि लागेल ते मार्गदर्शनही केले.

घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी मिळेल ती कामे केली. अगदी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली तर कधी पानाच्या गादीवर काम केले, अखेर “फिलिप्स कंपनी” मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले.पण आपली अभिनय व कलेची उपासना तसुबर पण कमी होऊ दिली नाही;

अनेक एकांकीका तसंच राज्य नाट्यस्पर्धांमधुन यशवंत दत्त यांनी काम करणे सुरू होते. त्यांचे “अडीच घरं वजिराला” हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले आणि अंतिम स्पर्धेसाठी मुंबईला गेले. आणि यशवंत दत्त यांच्या अभिनयाचा करिष्मा मुंबईतील नाट्यसंस्थांना पाहायला मिळाला. त्यानंतर मग मुंबईतल्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली. याच काळात दत्ता भट यांनी दत्त यांना काम करण्यासाठी बोलावले व “गरिबी हटाव” या नाटकाचच्या माध्यमातून यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं रंगभुमीरव दाखल झाली; पण दुर्दैवाने या नाटकांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. पण या काळात यशवंत दत्त यांच्या आईने त्यांना धीर दिला, “तू इकडची काळजी करू नकोस, मी इथलं सांभाळते तू तुझं बघ” या शब्दात आईकाडून आधार मिळाल्यावर यशवंत दत्त यांनी अधिक उत्साहाने काम सुरू केले.

अभिनेते यशवंत दत्त यांना खऱ्या अर्थाने नाव मिळवून दिले ते “नाथ हा माझा” या नाटकाने! या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका अप्रतिमरित्या रंगवला की प्रेक्षकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, त्यामुळे यशवंत दत्त काही काळ रंगभूमीपासून दूर गेले;पण काही काळातच “वेडा वृंदावन’ या नाटकातून यशवंत दत्तांनी ‘कमबॅक’ केले. त्यानंतर त्यांचा रुपेरी पडद्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.”सुगंधी कट्टा’मध्ये त्यांनी खलनायकसची भूमिका साकारली;”दगा” चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेमभंगाने खुनी झालेला नायकही रंगवला. ज्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका उत्तम नायकाची गरज होती, त्यावेळी ती उणीव यशवंत दत्त यांनी भरून काढली. “भैरू पैलवान की जय”, “दौलत”,”गनिमी कावा”,”सौभाग्यदान”,”मामा भाचे”,”निष्पाप”,”फटाकडी”, “आपली माणसं”, “आयत्या बिळात नागोबा”,”चानी”,”पैजेचा विडा”,”आपलेच दात आपलेच ओठ”,”माफीचा साक्षीदार”,”नवरा माझा ब्रम्हचारी”; तर हिंदीत “जेंटलमन”, “युगपरुष”, “क्रोध”, “जुंबीश” अश्या चित्रपटांतून त्यांनी विविधांगी व्यक्तीरेखा साकारल्या. फटाकडी या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रीत झालेले “फाइट सीन्स” आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले आहेत.

चित्रपट क्षेत्राशी संबंध आल्यावर सुद्धा, रंगभूमीशी असलेली नाळ दत्त यांनी कधीही तुटू दिली नाही.“नटसम्राट” नाटकातील सत्तर वर्षांच्या वृद्ध माणसाची भूमिका वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुद्धा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; यशवंत दत्त यांनी “शापित” तसंच “संसार” या चित्रपटातून साकारलेल्या भूमिकांना “राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे; ११ नोव्हेंबर १९९७ या दिवशी म्हणजें वयाच्या ५२व्या वर्षी यशवंत दत्त यांचे अकाली निधन झाले.[१]

  1. ^ "यशवंत दत्त (यशवंतसिंह महाडीक) – profiles" (इंग्रजी भाषेत). 2020-04-13 रोजी पाहिले.