यशवंत कानिटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यशवंत कानिटकर (१२ डिसेंबर, इ.स. १९२१:लिंबागणेश, मराठवाडा - २२ जुलै, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी भाषातज्‍ज्ञ असून मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक होते.

भाषासंचालक या नात्याने भाषाविषयक प्रश्नावर राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना आदी स्वरूपाचे तसेच व्यक्तिचित्रे विषयकही विपुल लेखन केले होते.


हैदराबादमधील शिक्षण, लेखन व नोकरी[संपादन]

१९५३ ते १९५७ या काळात त्यांनी प्रतिष्ठानचे संपादन केले व त्याच वेळी मेनका हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी कानिटकर हैदराबादला गेले. उस्मानिया विद्यापीठातून प्रावीण्यासह त्यांनी मराठी विषयात एम.ए. केले. तेथे त्यांनी काव्यलेखन केले. प्रतिष्ठान मासिकात यशवंत कानिटकरांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. हैदराबाद येथेच एम. एन. रॉय यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांच्या विचारांनी यशवंत कानिटकर प्रभावित झाले व नंतर रॉयवादी बनले.

चार भाषांवर प्रभुत्व असल्याने हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ते भाषांतरकार म्हणून रुजू झाले.

मुंबईत बदली[संपादन]

१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर त्यांची बदली तत्कालीन मुंबई राज्यात झाली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शासनाने सरकारी कारभाराची भाषा मराठी राहील, असे धोरण जाहीर केले. त्यासाठी कानिटकरांनी प्रारंभी प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याचे काम केले.

भाषा संचालनालय सुरू झाल्यानंतर राजभाषा मराठीविषयक धोरण राबविणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा आयोजित करणे, केंद्र राज्य अधिनियमांचा अनुवाद करणे अशी कामे यशवंत कानिटकरांनी केली. ते भाषासंचालक पदावर दीर्घ काळ काम करून सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित पुस्तके आणि संपादन[संपादन]

  • आज इथे तर उद्या तिथे (मराठवाड्यातील अनुभवावरील ललित लेखन - पुस्तक)
  • ते दिवस ती माणसे (पुस्तक)
  • पश्चिमवारे (पुस्तक)
  • 'मराठी भाषा : स्वरूप आणि उपयोजन (पुस्तक)
  • मेनका (कवितासंग्रह)
  • लोकमान्य टिळकांचा भाषाविचार (पुस्तक)
  • लोकमान्य टिळक या अष्टखंडात्मक ग्रंथाच्या आठव्या खंडाचे संपादन त्यांनी केले.
  • साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे ते मुख्य संपादक होते.