मोहन लोके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहन लोके (१९४२ - २०१७) हे एक सिनेछायाचित्रकार आणि अभिनेते होते. त्यांची कारकीर्द सुमारे ५० वर्षांची होती. स्टुडिओ एक तूही निरंकारच्या नावाने त्यांनी सुमारे दीडशेहून अधिक चित्रपटांच्या स्थिरचित्रणाचे काम केले.

स्थिर छायाचित्रणाचा चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये वापर होतो. जेव्हा मुद्रित माध्यम हे एकमेव प्रसिद्धीचे माध्यम होते तेव्हा स्थिर छायाचित्रणाला महत्त्व होते. त्या काळात लोके यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अनेक कलावंतांना प्रसिद्धी मिळवून दिली.

मोहन लोके हे स्वतःच चांगले कलावंत असल्याने कॅमेऱ्यासमोरच्या साध्या दृश्यालाही वेगळे परिमाण लाभे, आणि साध्या व्यक्तिमत्त्वाचेही सौंदर्य खुलून दिसे. मोहन लोके यांनी अनेक दशके ही कामगिरी पार पाडताना जुन्या नव्या काळातील कलावंतांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दादा कोंडके यांच्यासोबत कुणीही कलावंत सलगपणे दीर्घकाळ काम करू शकला नाही. मात्र, मोहन लोके ही एक अशी व्यक्ती होती की, ज्यांनी दादांसोबत बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये काम केले. स्थिर छायाचित्रण करण्यापुरते मर्यादित न ठेवता दादांनी त्यांना अनेक छोट्या-मोठ्या भूमिकाही दिल्या. आली अंगावर, जिवलगा, नवरा माझा नवसाचा, पांडू हवालदार, बजरंगाची कमाल, येऊ का घरात, शूर आम्ही सरदार, सून लाडकी सासरची अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या, त्यांनी केलेल्या भूमिकांचेही वेळोवेळी कौतुक झाले.

गौरव[संपादन]

  • स्टिल फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन २०११ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.