मॅपिंग द फील्ड : जेन्डर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॅपिंग द फील्ड : जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे निर्मला बॅनर्जी, समिता सेन आणि नंदिता धवन यांनी स्त्री- अभ्यासज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांकरिता संपादित केलेले व स्त्रीअभ्यासक्षेत्राच्या साहित्यामध्ये उपयुक्त अशी भर घालणारे मार्गदर्शक खंड आहेत. जादवपूर युनिव्हर्सिटीच्या स्त्री-अभ्यास विभागाने २०११ मध्ये हे खंड प्रकाशित केले. या खंडांतील शोधनिबंधांतून, स्त्री-अभ्यास ही विषयशाखा बनण्याकरिता प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात करावा लागलेला संघर्ष, स्त्रीचळवळ आणि सिद्धांकन क्षेत्र यातील नाते यांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडलेला आहे. या खंडांतील शोधनिबंधांतून विविध सामाजिक उपक्षेत्रांची लिंगभाव दृष्टिकोनातून संकल्पनात्मक चर्चा केलेली आहे. केवळ उच्चशिक्षणक्षेत्रात ज्ञाननिर्मिती व साहित्य उत्पादन करणे इतकेच मर्यादित ध्येय न ठेवता यासह सामाजिक परिवर्तन घडवून आणणे,सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे व लिंगभाव समानता साध्य करणे हे व्यापक राजकीय उद्देश स्त्री- अभ्यास क्षेत्राने बाळगलेले आहे. त्यामुळे स्त्रियांच्या चळवळी तसेच परिघावरचे वंचित समाजघटक, दलित आदिवासींच्या चळवळी यांना स्त्री-अभ्यासाची चळवळ जोडून घेताना दिसते वा या चळवळी व स्त्री अभ्यासाचे विद्यालयीन क्षेत्र परस्परपूरक असल्याचे दिसते. म्हणूनचं या खंडांमध्ये शैक्षणिक क्षेत्रांतील स्त्री-अभ्यासविषयाची चळवळ व शैक्षणिक विश्वाच्या पलीकडे उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या चळवळी या दोहोंचा आढावा घेणार्‍या शोधनिबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे.

प्रकरणांचा थोडक्यात आढावा[संपादन]

स्त्रीवाद आणि लिंगभावाचे राजकारण:भारतातील स्त्रीचळवळीचा इतिहास या पहिल्या शोधनिबंधामध्ये समिता सेन व नंदिता धवन ब्रिटिशकालीन सामाजिक सुधारणांचा इतिहास ते भारतातील वर्तमान स्त्रीचळवळ यांवर प्रकाश टाकतात. तर, भारतातील स्त्री-अभ्यास या दुसर्‍या प्रकरणात कुसुम दत्त या भारतामध्ये १९७० च्या दशकात झालेल्या स्त्री अभ्यास क्षेत्राच्या उदयाची चर्चा करतात. स्त्री अभ्यासाचे विद्यालयीन क्षेत्र व स्त्रियांच्या चळवळी या दोहोंचे प्रत्येक टप्प्यावरचे परस्परपूरक संबंध याचा आढावा कुसुम दत्ता यांनी आपल्या या प्रकरणात घेतलेला आहे. पुनरुत्पादन व कुटुंब यांचे सामाजिक, आर्थिक विश्लेषण या प्रकरणात निर्मला बॅनर्जी यांनी स्त्रीवादी आर्थिक सिद्धान्तांतून पुनरुत्पादन व कुटुंब यांकडे बघत विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांचे स्थान काय आहे याची चर्चा केलेली आहे. स्त्रिया आणि शेती या अरुणा कांची यांच्या चौथ्या प्रकरणांमध्ये व जीमोल उन्नी यांच्या स्त्रियांचे काम : मोजमाप, स्वरूप आणि अनौपचारिक क्षेत्र या प्रकरणांमध्ये अर्थव्यवस्थेतील स्त्रियांचे अदृश्य स्थान यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. सहाव्या प्रकरणात, बॅनर्जी नवउदारमतवादी बाजारपेठेची धोरणे व स्त्रियांची कामगार म्हणून अदृश्यता व GAD सारख्या विकासाच्या दृष्टिकोनातून स्त्रियांच्या स्थितीवर टाकण्यात आलेला प्रकाश याची मांडणी करतात. मनाबी मुजुमदार यांच्या सातव्या प्रकरणात लिंगभाव दृष्टिकोनातून शिक्षण या क्षेत्राची चर्चा केलेली आहे. ब्रिटिशकाळामध्ये भारतातील स्त्रीशिक्षणाचा हेतू हा केवळ आदर्श पत्‍नी व माता तयार करणे हा राहिला. नंतरच्या काळात या दृष्टिकोनावर टीका झालेली असली व सध्या 'शिक्षण' हे मानवी हक्कांचे क्षेत्र म्हणून बघितले जात असले तरी मुलींचे शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. या खंडातील शेवटच्या प्रकरणात कृष्णा सोमण लिंगभावाच्या परिप्रेक्ष्यातून आरोग्य क्षेत्राची चिकित्सा करतात. स्त्रियांचे आरोग्य हे केवळ त्यांच्या पुनरुत्पाद्नाशीच मर्यादित ठेवले जाते व पुनरुत्पादक वा माता या भूमिकेतूनच त्यांच्या आरोग्याकडे बघितले जाते. भारतातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल भाष्य करताना, जात, वर्ग, कुटुंब या संरचना व सामाजिक, आर्थिक, राजकीय यांसारखे घटक स्त्रियांच्या आरोग्याकरिता कारणीभूत ठरतात, हे लक्षात घ्यावे लागते.

दुसऱ्या खंडातील प्रकरणांची थोडक्यात ओळख[संपादन]

'‘Mapping the field’च्या दुसर्‍या खंडामध्ये समाविष्ट असणारे ‘’Genderscapes : understanding why gender bias persists in natural resource management’’ हे सुमी कृष्णा यांचे प्रकरण स्त्रिया व पर्यावरण या विषयावर आधारलेले आहे. या प्रकरणात त्या conventional, celebratory व gendered या तीन दृष्टिकोनांची भारतीय संदर्भात चर्चा करतात. स्त्रिया ही एकजिनसी वस्तू नाही, तर जात, वर्ग इत्यादी संरचना स्त्रियांच्या जीवनविश्वाला आकार देतात. त्यामुळे आपणांस अधिक सर्वसमावेशक व स्त्रियांच्या अनुभवास ग्राह्य धरणारे अभ्यासक दृष्टिकोन उभारावे लागतील. स्त्रियांना केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेणे वा पुरुषांची यातून हकालपट्टी करणे ही स्त्रीचळवळीचा व अभ्यासकांचा उद्देश्य नाही ,तर विविध सामाजिक स्थानावरील सर्वसमावेशक बनविणे हा हेतू आहे. लिंगाधारित भूमिका, कौटुंबिक जबाबदार्‍या, घरकाम या गोष्टी नैसर्गिक नाहीत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर, त्याबाबतचे नियोजन करताना ते लिंगभाव असमानतेच्या पारंपारिक दृष्टिकोनातून होत असते, अशी मांडणी सुमी कृष्णा यांनी या शोधनिबंधात केलेली आहे. स्त्रिया, कायदा आणि सामाजिक बदल या प्रकरणामध्ये अर्चना पराशर या, कायदेविषयक ज्ञानाचे वर्चस्ववादी आकलन व मुख्यप्रवाही कायदेव्यवस्था, संकल्पना यांची स्त्रीवादी चिकित्सा करत प्रस्थापित कायदेव्यवस्थेला जे आव्हान देण्यात आले त्यांची उपयुक्तता या दोन गोष्टींची प्रामुख्याने चर्चा करतात. 'हुंड्याकरिता झालेले खून व आत्महत्या - त्यांची न्यायालयांत झालेली चर्चा : स्त्रीवादी कर्तेपणातून विचारलेले प्रश्न' या शोधनिबंधामध्ये फ्लॅव्हिया ॲग्नेस कायद्याच्या section ४९८ अ व section ३०४ या कलमांची चिकित्सा करतात. या शोधनिबंधातून त्या गुन्हेगारीविरोधी संविधानिक तरतुदी व गुन्हेगारी विरोधी कायद्याची प्रत्यक्ष तांत्रिक प्रक्रिया या दोहोंमध्ये अंतर असल्याचे स्पष्ट करतात. कायद्याचे ताठर व औपचारिक स्वरूप आणि कुटुंब,समाज या पितृसत्ताक व्यवस्थेच्या असणार्‍या संरचना यांतील क्लिष्ट नाते याकडे फ्लॅव्हिया ॲग्नेस लक्ष वेधतात. विविधतेचे राजकारण : धार्मिक समुदाय आणि विविध पितृसात्ताकता या शोधनिबंधामध्ये कुमकुम संगारी या,धर्मावर आधारित कौंटुंबिक कायदे उपयुक्त आहेत का असा प्रश्न उपस्थित करत या विविध धर्मातील वेगवेगळ्या स्वरूपाच्या पितृसत्ताकतेची चर्चा करतात. धर्मावर आधारित कौटुंबिक कायदे असण्यापेक्षा सर्व स्त्रियांचे हक्क जपणारा एकाच कायदा असावा अशी मांडणी त्या करतात. All in the family? Gender,caste and politics in an Indian Metropolis या शोधनिबंधामध्ये 'पंचायत राज'व्यवस्थेतील स्त्रियांना मिळणारे आरक्षण याची चर्चा होताना दिसते. लेखिका जानकी नायर अशी मांडणी करतात की, जात व लिंगभाव या दोन्ही परस्परांपासून न वेगळ्या होऊ शकणार्‍या गोष्टी आहेत व सामाजिक ,राजकीय धोरणे व राजकीय व्यवहार या ठिकाणी जात व लिंगभाव या दोन्ही संरचना प्रभाव पाडताना दिसतात. जात आणि लिंगभाव या पुढील शोधनिबंधामध्ये अनुपम राव यांनी 'जात' या संरचनेचे ऐतिहासिक विश्लेषण केलेले आहे. त्या एम.एन श्रीनिवासन यांच्या संस्कृतीकरण व Louis Dumont यांच्या शुद्ध- अशुद्धतेची पारंपरिक उतरंड या दोन्ही सिद्धान्तांवर टीका करतात. अस्पृश्यता, जातीयता ही बाब सामाजिक आणि राजकीय संरचनातून कशी उद्‌धृत होते याला हे सिद्धान्त भिडत नाहीत अशी टीका करतात. लैंगिकता : देहविक्री कामगारांचे राजकारण आणि भिन्नलैंगिकतेला प्रतिरोध करणारी चळवळ या शोधनिबंधामध्ये निवेदिता मेनन या 'लैंगिकता' या संकल्पनेची चर्चा करतात. लैंगिकता ही वेगवेगळ्या कल्पना व मूल्ये यांनी घडवलेली असते व सातत्याने काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जाते. देहविक्री करणार्‍या लोकांनी घेतलेली नवीन भूमिका व समलैंगिक गटांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेला उभे केलेले आव्हान हे लैंगिकतेच्या क्षेत्रातील स्त्रीवादी राजकारणापुढचे नवे प्रश्न आहेत.

योगदान[संपादन]

मॅपिंग द फील्ड : जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे खंड अभ्यासक,अध्यापक व विद्यार्थी यांकरिता अत्यंत मार्गदर्शक ठरतात.भारतातील स्त्रीचळवळीचा ऐतिहासिक प्रवास यांतील शोधनिबंधात वाचकांपुढे उलगडत जातो.'भारतातील स्त्रीवाद'ही संकल्पना एकसुरी नाही,काळाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध विचारप्रवाहातून आलेले गट, जात,वर्ग,लिंग,लैंगिकता या सत्तासंरचनांच्या परीघावर ठेवले गेलेले वंचित घटक यांनी स्त्रीवाद व स्त्रीवादी संकल्पना नव्याने उभ्या केल्या आहेत.भारतातील स्त्रीचळवळ हे प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक व्यापक होत जाणारे क्षेत्र आहे. काळाच्या ओघात पुढे येणारे नवनवे विचारदृष्टीकोन,प्रस्थापित समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणारे नवे आवाज व नवी पिढी यांना स्त्रीअभ्यासव स्त्रीचळवळीच्या कक्षेत आणणे,तसेच स्त्री चळवळ व स्त्री अभ्यास यांची सांगड घालणे हे सध्या स्त्रीवादी चळवळीपुढील आव्हान आहे याची कल्पना या शोधनिबंधांतून वाचकांना येते.