Jump to content

माधवी पुरी-बुच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधवी पुरी-बुच या सेबीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला आहेत.

अहमदाबादच्या ‘आयआयएम’मध्ये त्या शिकल्या. तेथून आयसीआयसीआय बँकेत १९९७ पासून विविध पदांवर त्यांनी काम केले. अर्थात नाव घेण्याजोगी उच्चपदे त्यांना एकविसाव्या शतकात (२००२-०३ : हेड ऑफ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, २००४-०६ : हेड ऑफ ऑपरेशन्स) मिळाली. आयसीआयसीआय बँकेत सुमारे तपापेक्षा अधिक काळ काढून, २००९ मध्ये त्या ‘आयसीआयसीआय सिक्युरिटीज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. या गुंतवणूक कंपनीचे हे प्रमुखपद त्यांनी २०११ पर्यंत सांभाळले. २०११ नंतर त्यांच्या प्रगतीचा दुसरा अध्याय सुरू झाला. सिंगापूरस्थित ‘ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल’चे प्रमुखपद (२०१३ पर्यंत) त्यांनी सांभाळले. २०१६ मध्ये, शांघायच्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’साठी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.

‘सेबी’पुढे अनेक प्रकारची आव्हाने असताना त्यांची कारकीर्द सुरू होते आहे. ‘एनएसई’मधील गैरव्यवहाराकडे सेबीने केलेल्या दुर्लक्षाची चर्चा अद्याप विरलेली नाही, तसेच अवाचेसवा मूल्यांकनाचे ‘आयपीओ’ बाजारात आल्यावर फुगा कसा फुटतो, हेही गेल्या काही महिन्यांत दिसून आलेले आहे. याहीपेक्षा, येत्या काही महिन्यांमध्ये भांडवल बाजारातील कृत्रिम तेजी आणि तिचे लाभार्थी यांच्यामुळे बाजाराच्या नियमांचा भंग होऊ शकतो, असे वातावरण राहील. त्याकडे सेबीसारख्या नियामकालाच पाहावे लागेल.

देशातील भांडवल-बाजारांचे नियंत्रण व नियमन करणाऱ्या ‘सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे प्रमुखपद हा काटेरी मुकुट. ती जबाबदारी आता माधवी पुरी-बुच यांच्याकडे आली आहे. सेबीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला, म्हणून त्यांचे स्वागत झाले असले तरी, वयाच्या ५६ व्या वर्षी या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या व्यक्ती आहेत हेही विशेषच. ही दोन वैशिष्टय़े व्यक्तिगत आणि काहीशी योगायोगाची मानली, तरीही या नियुक्तीमागील तिसरे वेगळेपण मात्र सेबी आणि भारतीय वित्त क्षेत्राविषयी बरेच काही सांगणारे. ते वैशिष्टय़ असे की, खासगी क्षेत्रात कारकीर्द केलेल्या व्यक्तीची ‘सेबी’च्या प्रमुखपदावर नियुक्ती पहिल्यांदाच झाली आहे. १ मार्चपासून त्यांनी कार्यभार स्वीकारला. तसा ‘सेबी’मधील त्यांचा अनुभव एप्रिल २०१७ पासूनचा. तेव्हा त्यांची ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झाली आणि ती ऑक्टोबर २०२१ पर्यंत टिकली. मात्र पुन्हा डिसेंबर २०२१ मध्ये त्यांची नियुक्ती सेबीला समभागांच्या दुबार/तिबार विक्रीवर लक्ष ठेवण्यास साह्य करणाऱ्या ‘सेकंडरी मार्केट्स कमिटी’वर झाली होती.‘आकडे पाहून, विदेचा (डेटा) अभ्यास करूनच निर्णय घेणाऱ्या’, संगणकीकरणाचा पुरेपूर वापर करून मानवी चुकांची शक्यता कमी करणाऱ्या, अशी त्यांची प्रतिमा आहे. स्वतःची कार्यशैली, स्वतःची छाप यापेक्षा कामे करवून घेण्याकडे त्यांचा कल असतो, असे निकटवर्तीय सांगतात. ‘सेबी आज तंत्रज्ञानाधारित नियामक संस्था ठरली आहे, हे माझ्या सदस्यता काळात (२०१७-२१) याचा मला अभिमान आहे’ असे त्या म्हणाल्या असल्याचे वृत्त अन्यत्र प्रकाशित झाले होतेच. विदा पाहताना नेमकेपणाचे भान असावे लागते हेही त्या जाणतात. साहजिकच, अगदी सेबी-प्रमुखपदावरील नियुक्तीनंतरही त्यांच्याबद्दलची- जन्मगाव कोणते, भावंडे किती, आदी माहिती कुठे प्रसृत झालेली नाही, यात काय नवल?