मल्लरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मल्लरी 'मल्लरि' किंवा 'मल्लरी' ही 'अलारिपु'प्रमाणेच भरतनाट्यमच्या कार्यक्रमाच्या आरंभी सादर केली जाणारी एक नृत्तप्रधान रचना असते. ही रचना नर्तक, प्रेक्षक आणि एकंदर कार्यक्रमासाठी उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणाची निर्मिती करते.मुळात मल्लरि ही दक्षिण भारतातील एक धार्मिक अधिष्ठान असलेली संगीतरचना होय. 'नागस्वरम्, तालम्, तविल्ल, मुत्त' यांसारख्या वाद्यांवर वाजवली जाणारी ही रचना दक्षिण भारतीय मंदिरांत 'पालखी, प्रसादम्' यांसारख्या विशेष प्रसंगी उपासनेचा भाग या स्वरूपात ईश्वरासमोर सादर केली जाते. 'मल्ल' या शब्दाचा अर्थ पैलवान असा आहे. 'रि' म्हणजे घोष. असुरविजयानंतर देवाची वाहनासह मिरवणूक काढली जाताना, त्यांना खांद्यांवर वाहून नेणाऱ्या मल्लांच्या तोंडून निघणाऱ्या घोषांचा आविष्कार म्हणजे 'मल्लरि' असाही एक अर्थ सांगितला जातो. अत्यंत श्रवणीय आणि लयबद्ध अशी मल्लरि ही रचना काही दशकांपूर्वी भरतनाट्यमच्या 'मार्गम'चा भाग म्हणून सादर होऊ लागली. वाद्यांवर आधारित या रचनेत अर्थपूर्ण साहित्य नसते, तर 'तम् दिम् तोम् नम्' यांसारख्या गेय शोल्लुंच्या रचनेवर नृत्यांगना सौष्ठवसंपन्न नृत्य सादर करते. प्रसंगानुसार 'मल्लरि' या संगीतरचनेचे 'पेरिय मल्लरि, तीर्थ मल्लरि, कुम्भ मल्लरि, तळिगै मल्लरि, ऋषभ मल्लरि, तेर मल्लरि' असे अनेक प्रकार सांगितले जातात. सर्वसाधारणपणे मल्लरिमध्ये गेय शोल्लुंचे एक आवर्तन पहिल्या लयीत एकदा, दुसऱ्या लयीत दोनदा, तिसऱ्या लयीत तीन आणि चौथ्या लयीत चार वेळा होऊन, पुन्हा पहिल्या लयीत परतून ही रचना संपते.