मडिसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मडिसार ही भारताच्या तमिळनाडू राज्यातील ब्राह्मण समाजाच्या स्त्रीयांकडून साडी परिधान करण्यासाठीची एक शैली आहे. पाश्चात्य काळी, कोणत्याही लग्न झालेल्या स्त्रीने या शैलीद्वारे साडी परिधान करण्याची प्रथा होती, परंतु आज, बदलत्या काळानुरूप या पद्धतीत अनेक बदल झालेले दिसतात. जरी मडिसार स्त्रीयांकडून सर्ववेळ परिधान केली जात नसली तरीही संस्कॄतीची जपवणूक व्हावी या दृष्टीने काही ठरावीक सामाजिक व धार्मिक सण, उत्सव वा इतर समारंभ जसे लग्न समारंभ, इत्यादींमध्ये आजही काही स्त्रिया या पद्धतीने साडी परिधान करतांना दिसतात. शिवाय केवळ ब्राह्मण समाजातीलच नव्हे तर इतर समाजांतील व इतर प्रांतांमधील स्त्रीयादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.

सामान्यतः साड्यांची लांबी ही ५.५ मीटर एवढी असते, परंतु मडिसार विविध कारणांमुळे उदाहरणार्थ लग्न समारंभांसाठी वेगळ्या शैलीच्या साड्या, काही सण व धार्मिक समारंभांसाठी वेगळ्या प्रकारच्या साड्या इत्यादी अशांमुळे या साड्यांची लांबी सुमारे ९ मीटरपर्यंत असू शकते. अय्यर आणि आयंगर या तमिळनाडू मधील संस्कृतींचा मडिसार हा एक आविभाज्य व अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. अय्यर आणि आयंगर ब्राह्मण स्त्रिया त्यांच्या जीवनकालातील महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या वेळी, जसे की त्यांचा लग्न-समारोह, सर्व महत्त्वपूर्ण पुजा व विधी, आणि मृत्यू व शोक सभांच्या वेळी मडिसार परिधान करतात. अय्यर आणि आयंगर दोन्हींमध्ये मडिसार परिधान करण्याच्या पद्धती निराळ्या आहेत, जसे की अय्यर स्त्रिया उजव्या खांद्यावर साडीचा पदर घेतात, तर आयंगर स्त्रिया साडीचा पदर डाव्या खांद्यावर घेतात.

सध्या मडिसार साड्या रेशीम, सूती, रेशीम-सुती मिश्रित, पॉलिस्टर-सुती मिश्रित इत्यादी कापड प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय या साड्या परिधान करण्यासाठीची माहिती आंतरजालावरील विविध संकेतस्थळांवर मिळू शकते. आणि जर तरीदेखील साड्या परिधान करण्यास अडचण येत असेल तर बाजारांमध्ये आयत्या बनवलेल्या मडिसार साड्या देखिल उपलब्ध आहेत.