Jump to content

चेतासंस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मज्जा संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
चेतासंस्था

चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.

वर्गीकरण

[संपादन]

चेतासंस्था

[संपादन]

चेतासंस्था किंवा मज्जासंस्था हा एक वैशिष्ट्यपूर्ण चेतापेशींचा समूह आहे. चेतापेशींच्या साहाय्याने शरिरातील क्रियांची व्यवस्थित जुळणी होते. शरिरातील सर्व भागांकडे आवश्यक संदेश पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संदेश ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मज्जारज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परीघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टिम), उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेतामधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते.

चेतापेशी इतर चेतापेशींना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणाऱ्या अवयवास अगर ग्रंथीस, प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशींकडे सर्व संवेदी, प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते. प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशींशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे

बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते. स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेसदृश (होमोलॉग) असणाऱ्या जनुकामध्ये चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारीरिक हालचाल नियंत्रित करणे हे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या विस्कळीत जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परीघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास.

स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणिसृष्टीबाहेरील सजीवांमध्ये सुद्धा पेशीपेशींमध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यांमध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कॅंब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली.

रचना

[संपादन]


चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते.

चेतासंस्था चेतापेशी आणि सहयोगी अशा दोन प्रकारच्या पेशीनी बनलेली असते.

चेतापेशी :

चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.

मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात.

सहयोगी पेशी:

सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था.

मध्यवर्ती चेतासंस्था

[संपादन]

परीघवर्ती चेतासंस्था

[संपादन]

परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत.

तुलनात्मक शरीर रचना आणि उत्क्रांती.

स्पंज वर्गातील पूर्वगामी चेतापेशी : स्पंजवर्गीय प्राणी हे अगदी सुरुवातीला निर्माण झालेले अनेकपेशी प्राणी आहेत. पण बहुपेशीय असले तरी स्पंजामध्ये अनुबंध संबंध नाही, चेतापेशीही नाहीत. त्यामुळे चेतासंस्था नाही. पण स्पंगवर्ग़ीय प्राण्यामध्ये पेशी अनुबंधासाठी आवश्यक पूर्वगामी जनुके आढळली आहेत. चेतापेशीमधील संवेद ग्रहण करू शकेल अशी प्रथिने स्पंज पेशीमध्ये आढळली आहेत. अशा पेशींचे नेमके कार्य अजून नीटसे समजले नाही. अनुबंध संबंध नसले तरी स्पंजाच्या पेशीमध्ये परस्पर सहकार्यासाठी कॅल्शियम आयनावर आधारित तरंग (वेव्ह) सापडल्या आहेत. या कॅल्शियम तरंगामुळे काहीं पूर्ण शरीर आकुंचन पावण्यासारख्या काहीं क्रिया घडतात.

  • अरीय सममित प्राणी: उदर गुहिका संघ (सीलेंट्रेटा)

जेलीफिश , जलव्याल आणि प्रवाळ यासारख्या प्राण्यामध्ये विखुरले गेलेले चेतापेशींचे जाळे आहे. इतर प्रगत बहुपेशीय प्राण्यासारखी मध्यवर्ती चेतासंस्था त्यांच्यामध्ये विकसित झाली नाही. जेलिफिशमध्ये चेतापेशींचे जाळे शरीरभर विखुरलेले आहे. या चेतापेशीमध्ये संवेदी चेतापेशी रासायनिक, स्पर्श आणि प्रकाश संवेद सहयोगी चेतापेशीद्वारे प्रेरक चेतापेशीकडे नेतात. प्रेरक चेतापेशी त्यानंतर शरीराची हालचाल नियंत्रित करतात. काहीं अरीय सममित प्राण्यामध्ये सहयोगी चेतापेशी एकत्र येऊन गुच्छिका तयार झाल्या आहेत.

चेतासंस्थेचा अरीय सममित प्राण्यामधील चेतासंस्थेचा विकास बाह्यस्तर पेशीपासून झाला आहे.बाह्यस्तर पेशी या शरीरातील बहुतेक सर्व बाह्यस्तर पेशींचा उगम आहेत.

द्विपार्श्व्सममित चेतासंस्था :

सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात.

सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणाऱ्या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात.

द्विपार्श्वसममित प्राण्यांचे दोन प्रमुख गट पडतात. हे गट गर्भावस्थेपासूनच परस्परापासून वेगळे झाले आहेत. अशेरुकी प्राण्यांचा एक गट आणि कशेरुकी प्राण्यांचा दुसरा. यातील अकशेरुकी गटामध्ये अधिक वैविध्य आहे. अकशेरुकी गटात संधिपाद प्राणी, वलयांकित आणि सर्व कृमी, मृदुकाय प्राणी यांचा समावेश होतो. दोन्ही गटामध्ये चेतासंस्थेच्या शरीरातील स्थितीमध्ये भिन्नता आहे. अकशेरुकी गटातील प्राण्यामध्ये चेतासंस्था अधर बाजूस तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व बाजूस आहे. प्रत्यक्षात शरीरातील अनेक अवयव कशेरुकी आणि अकशेरुकी प्राण्यामध्ये परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात. उती विस्तारासाठी असलेल्या जनुकामुळे असे घडले आहे. कीटकांच्या उतीविस्तार जनुकांचा अभ्यास केल्यानंतर जिओफ्रॉय सेंट हिलारी या शास्त्रज्ञाने याचा प्रकाराचा प्रथम उल्लेख केला. उदाहरणार्थ कीटकांची चेतासंस्था अधर मध्य रेषेवर तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व मध्यरेषेवर असते.

कृमि चेतासंस्था

वलयांकित कृमी द्विपार्श्वसममित प्राण्यापैकी तुलनेने कमी किचकट शरीराचे आहेत. गांडुळासारख्या प्राण्यामध्ये शरीराच्या लांबीच्या दोन मज्जारज्जू असतात. शरीराचा अग्रभाग आणि पार्श्वभागामध्ये दोन्ही रज्जू एकत्र येतात. प्रत्येक खंडात मज्जारज्जू आडवे जोडलेले असतात. त्यामुळे शिडीसारखी त्यांची रचना दिसते. मज्जारज्जू शिडीसारखे जोडलेले असल्याने शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे नियंत्रण सुलभ होते. अग्रभागामधील एकत्र आलेल्या दोन गुच्छिका मेंदूसारखे कार्य करतात. अग्रभागा जवळील प्रकाशसंवेदी भाग प्रकाश संवेद चेतासंस्थेकडे पाठवितो.

सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत.

संधिपाद प्राणी चेतासंस्था संधिपाद प्राणी : कीटक आणि कवचधारी संधिपाद प्राण्यांची चेतासंस्था शरीराच्या खंडाप्रमाणे क्रमवार गुच्छिकानी बनलेली असते. अधर बाजूस असलेला मज्जारज्जू परस्पराशी आडव्या बंधानी जोडलेले असतात. प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका जोडी असते. काहीं गुच्छिका संलग्न झालेल्या असतात. मेंदू आणि अधोग्रसित गुच्छिका ही त्याची उदाहरणे. कीटकांच्या चेतासंस्थेमध्ये मेंदू पूर्वमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क अशा तीन भागामध्ये असते. मेंदूच्या अधर बाजूस अधोग्रसित गुच्छिका असते . अधोग्रसित गुच्छिका तीन संलग्न गुच्छिकेनी बनलेली असते. मुखांगे, लाळ ग्रंथी आणि उरोभागातील काहीं स्नायू अधोग्रसित गुच्छिकेनी नियंत्रित होतात. बहुतेक संधिपाद प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिये असतात. संयुक्त नेत्र दृष्टिसाठी , शृंगिका स्पर्श, ग्राणेंद्रियाचे आणि कामगंध ओळखण्याचे कार्य करतात. ज्ञानेंद्रियानी आणलेले संवेद मेंदू ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे वर्तन निश्चिती होते. कीटकचेतासंस्थेतील मेंदूमध्येच्या बाह्य भागावर असलेल्या चेतापेशी विद्युत आवेग निर्माण करीत नाहीत. या मेंदूमधील अंतर्गत पेशीना पोषण पुरवण्याचे कार्य बाह्य पेशींचे असते. मेंदूच्या अंतर्गत चेतापेशीपासून अनेक अक्ष निघतात. या अक्षामुळे संवेद आणि विद्युत आवेग इतर चेतापेशीमध्ये पोहोचविले जातात. थोडक्यात कीटकांमधील मेंदूच्या बाह्य भागावरील चेतापेशी संवेद आणि आवेग ग्रहणाचे कार्य करीत नाहीत. मेंदूमधील चेतापेशीपासून निघालेले पेशीद्र्वाचे अक्ष आवेग आणि संवेद ग्रहण आणि वितरणाचे कार्य करतात. या पेशीद्रव अक्षाना ‘न्यूरोपिल’ असे म्हणतात.

“ अभिनिर्धारित चेतापेशी” सजीवातील एखाद्या चेतापेशीचे कार्य पूर्णपणे इतर चेतापेशीपासून वेगळे असल्याचे आढळल्यास त्याला अभिनिर्धारित (आयडेंटिफाइड) चेतापेशी असे म्हणतात. हे त्या चेतापेशीचे वेगळेपण स्थान, चेतासंवेदी संप्रेरक, जनुक व्यक्तता पद्धत, इतर चेतापेशीशी वेगळ्या त-हेने जोडणी असे कशातही असू शकते. मानवी चेतासंस्थेमध्ये अशा अभिनिर्धारित पेशी अजून आढळल्या नाहीत. पण काही प्राण्यांच्या चेतासंस्थेमध्ये अशा सर्वच चेतापेशी अभिनिर्धारित असू शकतात. कीनो-हॅबडायटिस इलेगॅन्स या सूत्रकृमीमधील सर्वच चेतापेशी अभ्यासलेल्या आहेत. यातील प्रत्येक चेतापेशी अभिनिर्धारित आहे. प्रत्येक चेतापेशीमधील जनुकांची व्यक्तता सुद्धा वेगळी आहे. इतर प्राण्यामधील चेतापेशीमध्ये होणारा बाह्य स्थितुनुरूप बदल सीनो-हॅबडायटिसमध्ये होत नाही. अनेक मृदुकाय प्राणी आणि कीटकामध्ये अभिनिर्धारित चेतापेशी शोधून काढलेल्या आहेत. पृष्ठवंशी प्राण्यातील मत्स्यवर्गातील चेतासंस्थेमध्ये माउथनर पेशी मस्तिष्क स्तंभाच्या (ब्रेन स्टेम) तळाशी असतात. प्रत्येक माशामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस मेंदूमध्ये असलेल्या या पेशींचे अक्षतंतू परस्पर विरुद्ध येऊन मज्जारज्जू मधून जाताना अनेक चेताबंधाने जोडलेले असतात. माउथनर पेशींमुळे झालेले अनुबंध एवढे सक्षम असतात की त्यांच्या उद्दीपनामुळे माशाच्या वर्तनावर सेकंदाच्या दहाहजाराव्या भागाएवढ्या वेळेत परिणाम होतो. सरळ पुढे जाणारा माशाला नवीन आवाज ऐकू आला किंवा पाण्याच्या दाबामध्ये बदल जाणवला म्हणजे तो झपाट्याने इंग्रजी ‘ C’ आकारात वळतो. अडचणीच्या वेळी त्यातून सुरक्षित पळ काढण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो. माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्श्वरेखेमधील (लॅटरल लाइन) संवेदी अवयवामुळे त्याला पाण्यातील दाबाचे ज्ञान होते. माउथनर पेशीमुळे अडचणीच्या वेळी जीव वाचविण्या शिवाय सतत सुरक्षित पोहणे आणि स्वजातीय समुदायाबरोबर राहण्यासाठी माशास मदत होते. माउथनर पेशीला आज्ञा चेता (कमांड न्यूरॉन) असे म्हणले आहे. आज्ञा चेता माशाशिवाय नळ आणि म्हाकूळ या सारख्या मृदुकाय प्राण्यात आढळल्या आहेत. सागरामधील एक अजस्त्र नळाच्या ( स्क्विड) शुंडामध्ये या चेता साध्या डोळ्याने दिसतील एवढ्या मोठ्या आहेत.

चेतासंस्था कार्य चेतासंस्थेचे मूळ कार्य संवेद एका चेतापेशीपासून दुसऱ्या पेशीकडे पाठवणे. किंवा शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे घेऊन जाणे. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संवेद घेऊन जाण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे संप्रेरके . संप्रेरके हे रासायनिक संकेत आहेत. संप्रेरके रक्ताभिसरण संस्थेद्वारे संप्रेरक ज्या पेशीमध्ये किंवा ग्रंथीमध्ये त्या संप्रेरकाची ग्रहण यंत्रणा आहे अशाठिकाणी ग्रहण केल्या जातात. अशा रितीने जेथून संप्रेरक बाहेर पडते त्यापासून दूरवरच्या ग्रंथीमध्ये कार्य करू शकते. हे थोडेसे रेडियो प्रक्षेपकासारखे कार्य करते. रेडियो स्टेशन रेडियो सिग्नल ब्रॉडकास्ट करते. आपल्या घरी असलेला रेडियो त्या तरंग लांबी ग्रहण करतो. याउलट चेतासंस्था नेमक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संकेत पाठवते. तुमच्या घरी असलेला टेलिफोन ज्याने तुमचा नंबर फिरवला त्याच्याशीच तुम्हाला बोलता येते. चेतासंस्थेमधील यंत्रणा अतिशय वेगाने संवेद पाठवण्याचेआणि ग्रहण करण्याचे कार्य करते. 100 मीटर प्रति सेकंद एवढ्या अधिकतम वेगाने चेतापेशीमधून संवेद पाठवला जातो. अनेक चेतापेशी एकत्र आल्याने चेतासंस्थेचे प्रमुख कार्य शरीराचे नियंत्रण. परिसरातील बदलाची नोंद घेणे हे कार्य संवेदी इंद्रियाद्वारे होते. आणलेले संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे एकत्र होतात. या संवेदावर प्रक्रिया हो ऊन संवेदाचा नेमका प्रतिसाद प्रेरक संवेदामार्फत स्नायू किंवा ग्रंथीकडे पाठवला जातो. चेतासंस्था जशी प्रगत होत गेली तसे दृष्टि, सामाजिक परस्पर संबंध, शरीरातील अवयवांचे एकसूत्रीकरण होत गेले. मानवी चेतासंस्थेमध्ये भाषा, सामाजिक संदर्भ ,संकल्पना , या मानवी समुदायाच्या कल्पना मानवी मेंदूशिवाय सर्वस्वी अशक्य होत्या.

"चेतापेशी आणि अनुबंध" बहुतेक चेतापेशी संवेद अक्षतंतूद्वारे पाठवतात. काहीं संवेद वृक्षिकेमार्फत पाठवले जातात. चेतापेशीपैकी ॲुमाक्रिन पेशीना अक्षतंतूऐवजी फक्त वृक्षिका प्रवर्ध असतात. चेता संवेद अक्षतंतूद्वारा विद्युत रासायनिक तरंगाच्या स्वरूपात पाठवला जातो. यास ॲ क्शन पोटेंशियल असे म्हणतात. ॲयक्शन पोटेंशियल अक्षतंतूच्या टोकापर्यंत जातो. अक्षतंतूची टोके दुसऱ्या पेशीशी अनुबंधाने (सायनॅप्स) जोडलेली असतात. दोन पेशीपटलामध्ये सूक्ष्म संपर्क स्थान असते. संपर्कस्थानामधील दोन्ही पेशींच्या पटलामध्ये 2-20 नॅनोमीटर अंतर असते. अनुबंध दोन प्रकारचे असतात. विद्युत आणि रासायनिक. दोन चेतापेशीमधील विद्युत अनुबंध प्रत्यक्ष चेतापेशीना जोडतात. सर्वसामान्यपणे सर्वाधिक अनुबंध रासायनिक आहेत. त्यांचामध्ये चांगलीच विविधता आहे. रासायनिक अनुबंधामध्ये दोन पेशी भाग घेतात. अनुबंधपूर्वपेशी आणि अनुबंधपश्चातपेशी. अनुबंधपूर्व पेशी आणि अनुबंधपश्चात पेशीमध्ये असलेली रसायने नवीन संवेद निर्माण करू शकतात किंवा आलेल्या संवेदाचे शमन (इन्हिबिशन) करू शकतात. आलेल्या संवेदाच्या निकडीवर हे अवलंबून असते. अनुबंध पूर्व पेशीच्या अक्षीय गुंडीमध्ये सूक्ष्म पुटिका असतात याना अनुबंध पुटिका म्हणतात. या पुटिकमध्ये चेताउद्भवी रसायने(न्यूरोट्रान्समिटर) असतात. अनुबंधपूर्व अक्षीय गुंडीमध्ये संवेद पोहोचला म्हणजे अक्षीय गुंडीमधील पुटिका चेताउद्भवी रसायने अनुबंधपूर्व आणि अनुबंधपश्चात पेशीमधील संपर्क स्थानामध्ये सोडतात. अनुबंध पश्चातपेशीपटलावर असणारे ग्राहक (रिसेप्टर) चेताउद्भवी रसायने ग्रहणकरतात. अनुबंधपश्चात पेशी उद्दीपित होते. आणि नवीन संवेद निर्माण होतो. ग्राहकाच्या प्रकाराप्रमाणे अनुबंध पश्चात पेशीचे उद्दीपन,शमन किंवा संस्करण होते. उदाहरणार्थ असिटल कोलिन हे चेताउद्भवी रसायन प्रेरक चेतापेशी अनुबंध आणि स्नायू संपर्क स्थानामध्ये आल्यास स्नायू त्वरित आकुंचन पावतो. अनुबंधातील पारगमन सेकंदाच्या दशलक्षाव्या भागात पूर्ण होते. अनुबंध पश्चात पेशीवरील परिणाम मात्र बराच काळ टिकून राहणारा असतो.

“ अनुबंध आणि अनुबंध कार्य” चेतापेशी अक्षरशः शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक ॲ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठराविक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते. डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे. अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्त्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लॉंग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत.


चेताजोडण्या आणि चेतासंस्था चेता संस्थेचे मूळ कार्य चेतापेशीकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि परस्पर संबंध प्रस्थापित करणे. चेतापेशींच्या परस्पर संबंधामुळे चेतापेशी अनेक विस्तृत कामे करू शकतात. त्यामध्ये अभिज्ञान (डिटेक्शन) ,आकृतिबंध बनविणे ( पॅटर्न जनरेशन) , आणि काळाचे भान अशाचा समावेश होतो. चेतापेशींच्या नेमक्या कामाचा आढावा ही मोठी कठीण बाब आहे. कारण अनेक पेशी एकाच वेळी अनेक कार्याशी संबंधित असतात. आजच्या प्रगत संशोधनाने सुद्धा परस्पर संबंधी चेता पेशी काय करीत असतात याची पुसटशी कल्पना गणिताच्या सहाय्याने करण्यात अपयश आले आहे. शास्त्राच्या इतिहासात चेतासंस्थेचे प्रमुख कार्य संवेद आणि प्रतिसाद देणारी यंत्रणा असे आहे. या अनुषंगाने संवेदी चेता पेशीमध्ये संवेदापासून पेशीचे कार्य सुरू होते. साखळी पद्धतीने संवेद एकापाठोपाठ दुसऱ्या चेतापेशीकडून मेंदूकडे पाठविले जाते. मेंदूकडून आज्ञापेशीकडे पाठविलेला आवेग स्नायूकडे आल्यानंतर प्रतिक्रिया पूर्ण होते. देकार्त या शात्रज्ञास प्राण्यांचे आणि मानवी वर्तन संवेद प्रतिसाद यंत्रणेने स्पष्ट होईल असे वाटत होते. पण उच्च बोधीय (कॉग्निटिव्ह) वर्तनाचे उदाहरणार्थ भाषेचा वापर, प्रेरणा, अमूर्त कल्पना यांचे स्पष्टीकरण केवळ संवेद प्रतिसाद या पद्धतीने देता येईल असे त्यास वाटत नव्हते. 1906 साली चार्लस शेरिंग्टन याने लिहिलेल्या “इंटिग्रेटेड ॲतक्शन ऑफ नर्व्हस सिस्टीम” या पुस्तकामध्ये संवेद प्रतिसाद यंत्रणेवर विस्तृत विवेचन केलेले आहे. विसाव्या शतकात मानसशास्त्रज्ञानी वर्तन हे चेतासंस्थेचे प्रमुख कार्य मानल्याने संवेद प्रतिसाद प्रक्रियेने मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला. विद्युत शरीररचना शास्त्र, या नव्या शाखेच्या विसाव्या शतकातील अभ्यासानंतर 1940 मध्ये चेतासंस्थेमध्ये उपजत संरचना (पॅटर्न) बनविण्याची यंत्रणा असते. या संरचना बनविण्यासाठी बाह्य संवेदाची गरज नसते असे समजले. चेतापेशी ठराविक वेळाने संवेद किंवा संवेद समूह आपोआप पाठवितात हे कळले. चेतापेशी पूर्णपणे वेगळी केली तरी हे चालूच राहते. चेतापेशी परस्पराशी जोडल्या गेल्यानंतर ही यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची कामे करू लागते. सध्याच्या आधुनिक सिद्ध्धांताप्रमाणे चेतासंस्थेचे कार्य संवेद प्रतिसाद साखळ्या आणि उपजत आवेग संरचनेच्या तयार होण्याने नियंत्रित होतात आणि प्राण्याचे वर्तन याच्या समुच्चयाने होते असे सिद्धझाले आहे.

प्रतिक्षेपी क्रिया

[संपादन]

सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठराविक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात.

संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “ॲ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो.

प्रेरक पेशीच्या अक्षतंतूकडून संवेद येण्याआधी मध्यवर्तीचेतासंस्थीमधील संवेद सहकारी चेतापेशीमध्ये नियंत्रित होतात. संवेदी आणि प्रेरक चेतापेशेमध्ये असलेल्या सहकारी चेतापेशी संवेद एका पेशीकडून नेमक्या पेशीकडे नेण्याचे कार्य करतात. नेमक्या कोणत्या प्रेरक चेतापेशीकेडे संवेद पोहोचवायचा याचा निर्णय मध्यवर्ती चेतासंस्थेमध्यी गुंतागुंतीच्या प्रक्रियेने घेतला जातो.

सर्वच संवेदी पेशींचे संवेद प्रेरक पेशीमध्ये येत नाहीत. काहीं संवेद मेंदूमध्येना येता मज्जारज्जूमध्ये संवेद परस्पर प्रेरक पेशीकडे पाठविला जातो. या प्रकारास प्रतिक्षेपी क्रिया म्हणतात. साध्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये एक संवेदी पेशी, एक किंवा अनेक सहकारी पेशीकडून प्रेरक चेतापेशीकडे संवेद येतात. थोडक्यात सर्व संवेद मेंदूकडून नियंत्रित होण्याऐवजी परस्पर मज्जारज्जूकडून ज्या क्रिया नियंत्रित होतात त्याला प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. पापण्यांची हालचाल, सायकल चालवणे, जेवताना बोलणे, हातवारे करणे या सर्व प्रतिक्षेपी क्रिया आहेत. या क्रिया करण्यासाठी मेंदूच्या सहभागाची फारशी गरज नसते. अर्थात सर्वच प्रतिक्षेपी क्रिया साध्या (सिंपल रिफ्लेक्स) नाहीत. अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये अनेक चेतापेशींचा संबंध असतो.

या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात, आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्यांना प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात.