भाषाभ्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार, भावनाअनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हीही एक शाखा आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स्वरूपही गुंतागुंतीचे आणि कधीकधी अनाकलनीय भासते. भाषा आणि समाज यांचा एक अनन्यसाधारण संबंध असतो. संस्कृतीच्या परंपरा, श्रद्धा, रुढी, धार्मिक आचार-विचार इत्यादी बाबींचे दर्शन भाषेतून होत असते म्हणून व्यक्तीसमूह समजून घेण्यासाठी भाषाभ्यासाची गरज असते. अशा अभ्यासामुळे मानवाचे मनोव्यापार, मानवी संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करण्यास मदत होते. म्हणूनच भाषावैज्ञानिकांनी समाजविज्ञान, मनोविज्ञान आणि मानववंशविज्ञान यांचा अभ्यास सुरू केला त्यातूनच सामाजिक भाषाविज्ञान, मानववंशभाषाविज्ञान, आणि मनोभाषाविज्ञान अशा भाषाभ्यासाच्या नव्या शाखा सुरू झाल्या.