भागिरथीबाई गंगाधर पाटील साकोळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


         पती सामाजिक कार्यात विशेष रस घेत असेल तर पत्नीने पतीच्या कार्यात खांद्याला खांदा लावून कार्य करणारी फार कमी जोडपी असलेली उदाहरणे इतिहासात पहावयास मिळतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर,महात्मा ज्योतिराव फुले व सावत्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पटील व लक्ष्मीबाई पाटील यांनी जसे तत्कालीन परिस्थितीत अपेक्षित परिवर्तनासाठी सामाजिक कार्याच्या लढाईत एकमेकांना साथ दिली तशी हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामात गंगाधर पाटील यांना धाडसाने साथ दिलेल्या भागिरथीबाई गंगाधर पाटील यांचे कार्य उदगीर परिसर कधीही विसरणार नाही.
                                       गंगाधर पाटील यांचा जन्म १९२० मध्ये देवर्जन येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव पाटील व आई राजाबाई पाटील गंगाधर पोटात सहा महिन्याचे असताना वडील बापूराव पाटील यांचा मृत्यू झाला. गंगाधर पाटलांना ऐकच बहिण आनंदीबाई असल्याने त्यांचे संगोपन लोहरा येथील आजोळी झाले.
                    देवर्जन हे उदगीर तालुक्यातील (तत्कालीन जिल्हा बिदर )एक प्रगती पथावर असलेले गाव असून तेथील कार्यकर्ते व जाणता देखील प्रगतीच्या दृषटिकोनातूनच सतत जागरूक असत. लोहारा परिसरातील आर्य समाज शाखेतर्फे होणाऱ्या बौद्धिक कार्यक्रमातून गंगाधर पाटील यांच्या मनावर देशभक्ती स्वातंत्र्याची चळवळ, राष्ट्रीय ऐकता याबाबत मोलाचे संस्कार रुजवले गेले. त्यातून त्यांचे मानसिक बळ वाढले व ते आप्पराव पाटील,डॉ. दादाराव वैद्य यांच्या सहवासातून हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यासबंधी चिंतन करू लागले. उदगीर परिसरामध्ये आप्पाराव पाटील कौळखेडकर ,शंकर टोपे, एकनाथ कसुरे, गंगाधर पाटील सकोळकार, डॉ दादाराव वैद्य,अमृतराव अंबरखाने आदी नेत्यांनी संघ निर्माण केला आणि त्यांच्या संघकार्यातून हैद्राबाद मुक्ती लढ्याची चळवळ उत्साहाने सुरू झाली.त्या चळवळीने उदगीर तालुक्यातील लोहारा, देवर्जन,गडसुर, घोनशी, तोंडचिर,तिरुका, बोरुळ या भागात सन १९४२-४३ पासून निजाम राजवटीतील अन्यायाविरुद्ध संघर्षात्मक भूमिकेतून मोलाचे कार्य सुरू झाले.या लढ्यातील एक जहाल कार्यकर्ते म्हणजे गंगाधर पाटील साकोळकर.
                                                    गंगाधर पाटील हे १६ वर्षाचे असताना किसान दलाचे सदस्य झाले. आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे निजाम सरकारच्या यंत्रणेकडून त्यांना अटक करण्यात आली व सहा महिन्याचा कारावास भोगावा लागला. कारागृहात असताना त्यांच्या आई राजाबाई यांचे निधन झाले.
                                हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यातील यशासाठी सन १९४४-४५साली टोळी बनविताना मिरखेलचे भीमराव पाटील, भीमराव माळी,व्यंकटराव चोंचे,श्याम मांग, डोनगाव चे माणिकराव मुळे, हंसराज आणि आप्पाराव पाटील कौळखेडकर हे सर्वजण कौळखेड येथे बैठकीसाठी जमले त्या बैठकीत गंगाधर पाटील यांना टोळीचा प्रमुख म्हणून विचार करण्यात आला.परंतु गंगाधर पाटलांनी उदार अंतःकरणाने आप्पाराव कौळखेडकर यांना टोळीचा प्रमुख म्हणून निवडले.त्यांच्या नेतृत्वाखाली निजामा विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी एक संघ निर्माण केला .किसान दलाच्या टोळीचे नेते गंगाधर पाटील व आप्पाराव पाटील कौळखेडकर हे कार्यकर्त्यांना घडवत होते. लढ्याच्या काळात गंगाधर पाटील २८ तोट्यांची स्टेनगण नेहमी बाळगत असत.सन १९४४-४५पासून लढा यशस्वी होई पर्यंत ही टोळी हत्तीबेट (देवर्जन) राम घाट (चिरानगर), बोटकुळ व आटरगा या भागात जागा बदलत क्रियाशील होती.सन१९४६-४७ साली ऑगस्ट महिन्यात हत्तीबेटावर टोळीचा मुक्काम पडला तेंव्हा देवर्जन परिसरातील अनेक गावामधील भाजी,भाकरी शेंगा,गुळ अश्या अनेक वस्तू स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्यांसाठी पोहचवत असत. गंगाधर पाटील त्यांच्या पत्नी भगिराथीबाई हे सर्व लोक झोपल्यानंतर भाकरी तयार करून शेतातील  सालगड्यासोबत हत्तिबेटावर पोहचवत असत. देवर्जन येथील पोलीस पाटील हे निजामाच्या शरण गेलेले होते.त्यांना हा प्रकार समजल्या नंतर त्यांनी आसपासच्या गावातील लोकांना धमकी देन्यास सुरुवात केली.त्या टोळीला जर अन्न पुरवले तर घर फुकुन देण्यात येईल.काही दिवस अन्न पुरवणे बंद झाले . भागिरथीबाई आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः भाकरी पुरवण्याचे कार्य चालू ठेवले परंतु पोलीस पाटलाने साहित्य घेऊन आलेल्या गड्याला धमकी देऊन कार्य बंद पाडले.
                                                 दोन तीन  दिवसांनी शंभु,उमरग्याचे हणमंतराव, माणिकराव चनबसप्पा अणि गावातील वीस-पंचवीस लोकांनी हिंमत करून अर्ध्या रात्री हत्तीबेटावर  भाजी भाकरी व काही साहित्य पोहचविल्यानंतर देवर्जन च्या पोलीस पाटलांनी धमकी देऊन हा प्रकार बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे टोळीतील तरुणांचे रक्त खवळले त्यानंतर टोळीतील सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलाचा खून केल्याशिवाय अन्नाचा कणही घेणार नाही अशी शपथ घेतली.त्याच वेळी देवर्जन येथे काही कार्यकर्त्यांनी हत्यारा समवेत जाऊन पाटलाच्या वाड्यावर लक्ष ठेवले.रात्रीची वेळ असल्याने सर्व पहारेकरी गाढ झोपेत होते याचाच फायदा घेऊन टोळीतील नेत्यांच्या सूचनेनुसार गंगाराम रोडगे व निवृत्ती खटके यांनी पोलीस पाटलाला गोळ्या घालून ठार केले व घोड्यावर बसून हत्तीबेटावर निघून गेले.  'वंदे मातरम्' आणि 'क्रांती चिराऊ होवो अशा घोषणा देऊन कार्यकर्ते घोड्यावरून उतरले,टोळी प्रमुखांनी त्यांना मिठी मारून त्यांच्या धाडशी कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
     दि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वातंत्र्य झाला.त्या नंतर गंगाधर पाटील साकोळकर यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून जाहीर करण्यात आले.३०मे १९६४ रोजी देवर्जन येथील काही विरोधकांनी मध्यरात्री लोहारा येथील आजोळी स्थानाहुन गंगाधर पाटील यांना बाहेर बोलावण्यात आले .त्यानंतर त्यांचा खून झाला असे काही दिवसांनी समजले .त्यांचे सुपुत्र प्रा ओमप्रकाश व पत्नी भागिरथीबाई यांनी गंगाधर पाटील यांच्या  स्मरणार्थ १९९० मध्ये स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्था स्थापन केली.
                                                    गंगाधर पाटील यांच्या वीरपत्नी भागिरथीबाईंचे  चरित्र अवलोकन करणे पुढील पिढीस अत्यंत महत्त्वाचे आहे .आपले पती आर्य समाजाच्या विचारसरणीचे असल्याची जाणीव त्यांना होती.त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा,रूढी,परंपरा याला कधीही थारा दिला नाही. भगिरथीबाई ह्या लढवय्या वृत्तीच्या धाडसी महिला होत्या.सकारात्मक दृष्टीकोनातून उपेक्षित व गरीब व्यक्तींना त्यांनी आर्थिक व मानसिक बळ देऊन त्यांची मदत केली. राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन आपले पती काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर तत्कालीन परिस्थितीला तोंड देत जनसामान्यांची सेवा केली.
                                                    भागिरथीबाई यांना १७ ऑक्टोबर १९७२ ला जिल्हाधिकारी कार्यालय उस्मनाबाद येथे गंगाधर पाटील यांचे वारस म्हणून सन्मान पत्र देण्यात आले व त्यानुसार त्यांना केंद्र व महाराष्ट्र शासनाचे पेन्शन मंजूर झाले.

अशा या खडतर जीवन प्रवासामध्ये संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलून आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले .त्यांच्या व गंगाधर पाटलांच्या सुसंस्कारामुळे शिवाजीराव,तानाजीराव, ॲड.विजय , प्रा. ओमप्रकाश व चंद्रप्रकाश यांच्या सारखी आर्य समाजाच्या विचारसरणीची मुले आणि सुस्वभावी कन्या सौ.ललिता घडली व मोठी झाली. शिवाजीराव व तानाजीराव कृषी क्षेत्रात तर ॲड.विजय हे महाराष्ट्र बार काऊन्सिल चे माजी अध्यक्ष होते.प्रा ओमप्रकाश हे गणिताचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथून सेवानिवृत्त झाले . दिवंगत नेते गंगाधर पाटील यांचे नाती व नातू हे वैद्यकीय व इंजिनियरिंग शिक्षण क्षेत्रात यशस्वी पणे कार्य करत आहेत.

       गंगाधर पाटील यांच्या जीवनात ध्येयनिष्ठतेने व देशप्रेमाने साथ दिलेल्या  लढवय्या वीर महिला भागिरथीबाई गंगाधर पाटील साकोळकर यांचे १७ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले. स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्थेद्वारे कै. गंगाधर पाटील साकोळकर प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालये स्थापन केली व ती प्रगतीपथावर आहेत.या विद्यालयामध्ये शिक्षक हे देशभक्ती व देशप्रेमाची भावना मनात रुजऊन विद्यार्थ्यांच्या  व्यक्तिमत्वाची  विविध उपक्रम राबवून जडण घडण करीत आहेत .

"संदर्भ" लेखक:प्रा. डॉ.नामदेवराव गोविंदराव खंडगावे सहशिक्षक:श्री नारायण गोविंदराव घटकार पुस्तक :हैद्राबाद मुक्ती लढ्यात उदगीर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे धैर्यशाली योगदान. पृष्ठ क्र: २५४ ते२५८ प्रकाशन: अरुणा प्रकाशन लातूर(२०१४).