भांगशीमाता गड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भांगशीमाता किंवा भांगसाई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भांगशीमाता किंवा भांगसाई हा किल्ला औरंगाबादपासून १४ कि.मी. अंतरावर आहे.

या गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २,७०० फूट आहे. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात. औरंगाबाद-देवगिरी रस्त्याने जाताना घाटाच्या अलीकडे उजवीकडे एक फाटा आहे, तेथून भांगशीमातागडाकडे जाता येते. गडाच्या उजवीकडच्या टोकावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या आहेत. पुढे काही कातळ कोरीव पायऱ्या दिसतात आणि तेथून खरा गड सुरू होतो. कातळाला मध्यभागी फोडून तयार केलेला जिना पार करत गडावर उजवीकडून प्रवेश होतो. किल्ला म्हणून गडावर फारसे अवशेष नसले तरी गडमाथ्यावर पाण्याचे जोड टाके आहे. यातील एका टाक्यात मध्यभागी आणखी एक लहान टाके खोदलेले दिसते. तसेच चार टाक्यांचे एक लहानसे संकुलही आहे. साधारण फुटबॉलच्या मैदानासारखा या गडाचा आकार आयताकृती असा आहे. गडावर कडेच्या बाजूने काही गुहा खोदलेल्या दिसतात, त्यांत पाण्याचे स्रोत आहेत. कातळ तासून कोरलेले खांब हे या गुहेरी टाक्यांचे मुख्य आकर्षण आहे. याशिवाय या गडावरून औरंगाबाद टेकड्या व पश्‍चिमेला देवगिरीचा मुलुख दिसतो. समोर दिसणाऱ्या डोंगररांगापासून हा गड जरा सुटावलेला दिसतो. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा पडतो. औरंगाबादवरून पुण्याकडे जाताना एमआयडीसी जवळ राज्य महामार्गावरून या गडाचे एक वेगळेच दर्शन घडते.