Jump to content

भांगडा नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भांगडा नृत्य[]

पंजाब राज्यातील लोकनृत्य प्रकारांमध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे भांगडा नृत्य होय. भांगडा नृत्याचे उत्पत्तिस्थान पंजाब मधील लायलपूर भाग मानले जाते परंतु संपूर्ण पंजाब मध्ये आज भांगडा नृत्याचे सादरीकरण होताना दिसते.

हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे नृत्य असून गव्हाच्या हंगामात पेरणी झाल्यानंतर कापणी व मळणी होईपर्यंत हे नृत्य केले जाते. बैसाखी हा सण साजरा करताना सुद्धा भांगडा नृत्य हा अविभाज्य भाग असतो. तसेच विवाहप्रसंगी किंवा इतर आनंदप्रसंगी हे नृत्य करण्याचा प्रघात आहे.

नृत्य पद्धती :

भांगडा हा अत्यंत जोशपूर्ण असा नृत्यप्रकार आहे. या नृत्याची सुरुवात ढोल वाजवून होते. ढोल वाजू लागला की नर्तक गोलाकार उभे राहतात, त्यातील प्रमुख व्यक्ती भांगड्याकरिता सज्ज होऊन गाऊ लागते आणि गाण्याच्या विशिष्ट ठिकाणी नृत्याला सुरुवात होते. प्रत्येक नृत्य हे गीतामध्ये बद्ध असते. नृत्याच्या सुरुवातीला गळ्यात ढोल अडकवलेला एक वादक मध्यभागी उभा राहून दोन काठ्यांनी ढोल वाजवण्यास सुरुवात करतो. त्याच्या भोवती काही नर्तक नृत्याचे नेतृत्व करतात.अधूनमधून ते हाताचा पंजा कानावर ठेवून , पुढे सरसावून पारंपारिक पंजाबी लोकगीतातील ‘बोली’ अथवा ‘धेल’ देतात. तेव्हा नृत्यात काहीसा खंड पडतो पण त्यानंतर पुन्हा चढ्या लयीत अधिक जोशात नृत्य सुरू होते. बऱ्याच वेळा नर्तकाच्या हातात काठी आणि रुमाल असतो तर कधी लांब काठी असून तिच्या टोकावर सुशोभित केलेली चिमणी बसवलेली असते. या नृत्यामध्ये गाणे म्हणता म्हणता उड्या मारणे, चक्कर मारणे, निरनिराळ्या कसरती करणे, सवाल-जवाब असे अनेक प्रकार केले जातात. हा नृत्यप्रकार सहा ते सात तासही सहज नाचला जातो. बल्ले-बल्ले, हडीप्पा अशा आरोळ्या मारत केला जाणारा हा जोशपूर्ण असा नृत्यप्रकार सर्व भारतभर लोकप्रिय आहे.  

वेशभूषा : पंजाबी ग्रामीण लोक या नृत्यासाठी रंगीबेरंगी रेशमी कपडे घालतात. पुरुष लुंगी, कुरता, जरीचे जाकीट, पायात तहमत, डोक्यावर ही पगडी व ही पगडी नाचताना पडू नये याकरता त्यावर रेशमी रुमाल असा वेश करतात तर स्त्रिया पंजाबी कुर्ता, सलवार, ओढणी, केसाला गोंडे लावून दोन लांब वेण्या, हातात बांगड्या, गळ्यात मोठ्या मण्यांच्या लांब माळा, बिंदी असा पेहेराव करतात.

वाद्ये : ढोलक किंवा ढोल हे भांगड्याचे प्रमुख वाद्य आहे. याशिवाय चिमटा, मोठ्या झांजा, सनई, इत्यादी वाद्येही वापरली जातात.

भांगडा हे मूलतः पुरुषी नृत्य असले तरी अलीकडच्या काळात स्त्री-पुरुष दोघेही मिळून हे नृत्य सादर करतात.

  1. ^ "भांगडा नृत्य".