Jump to content

गुढी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रह्मध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)

गुढीपाडवा या हिंदू धर्मीयांच्या सणाच्या दिवशी गुढी(तेलगु:గుఢీ) उभारली जाते म्हणून या सणाचे नाव गुढीपाडवा असे आहे.[]गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेच्या पदकांची माळ (तिला गाठी म्हणतात) बांधून त्यावर तांब्या बसविला जातो.[] गुढी नंतर पाटावर किंवा तांदुळाने भरलेल्या एका कलशात उभी केली जाते.

गुढी

गुढी शब्दाचा अर्थ

[संपादन]
मुख्य पान: काठी पूजा

काठी पूजा आणि देवक-स्तंभ परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरांपैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर[] "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.

हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

[संपादन]

इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.

आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥"

संत एकनाथांच्या साहित्यातील गुढीचा उल्लेख

[संपादन]

संत एकनाथ (१५३३–१५९९)

      • आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० संत एकनाथ महाराजांची गाथा

२०८६

भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥

पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥

संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥

एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥


      • चतुःश्लोकी भागवत/गुरूचें लक्षण

सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदीं दे बुडी । तेणें सुखोर्मी गाढी सदगुरूसी ॥३॥


      • चतुःश्लोकी भागवत/माझी प्राप्ती

एकीं शाद्विकशास्त्रमूढीं । ज्ञातेपणाची उभविली गुडी । पडतां कामकोधांची धाडी । स्वयें चरफडी देहलोभें ॥७१॥


      • एकनाथी भागवत/अध्याय तिसरा

चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी ।

उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥५८५॥

सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी ।

शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥६१३॥


      • एकनाथी भागवत/अध्याय चौथा

जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी ।

जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥


      • एकनाथी भागवत/अध्याय पाचवा

प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी ।

भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥५५॥


      • एकनाथी भागवत/अध्याय नववा

तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी । म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥

      • एकनाथी भागवत/अध्याय अकरावा

ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी ।

मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥३६॥


      • एकनाथी भागवत/अध्याय बारावा

शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ।

शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥


      • एकनाथी भागवत/अध्याय पंधरावा

पांच पांच इंद्रियांची जोडी । जिणोनि शमदमपरवडी ।

उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥८१॥


      • एकनाथी भागवत/अध्याय सतरावा

जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी ।

जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भक्तीची ॥१२०॥

      • एकनाथी भागवत/अध्याय विसावा

नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी ।

हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८०॥


      • एकनाथी भागवत/अध्याय एकविसावा

चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी ।

लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥१७॥


      • एकनाथी भागवत/अध्याय बाविसावा

उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥


      • एकनाथी भागवत/अध्याय तेविसावा

उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥

त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥९८॥


      • भारूड - गाय

संत नाम गाय संत नाम गाय ।
संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥
सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी ।
उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥
नाम मुख स्तना लागला पान्हावे ।
अभक्‍त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥
जनी जनार्दन दुहिला आवडी ।
उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥


संत तुकारामांच्या गाथेतील गुढीचेउल्लेख

[संपादन]
    • संत तुकाराम

(१६०८–१६५०)

      • तुकारामांची गाथा

अभंग क्र. ३५८३
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कायाअ देहाकडे नावलोकीं॥1॥
ह्मणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥
कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा । येतां येत बळाशीपुढें ॥२॥ तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥

अभंग क्र. ४५२९
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥७॥

संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील गुढीचे उल्लेख

[संपादन]
    • ज्ञानेश्वर (१२७५–१२९६)
      • ज्ञानेश्वरी/अध्याय चौथा

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥

      • ज्ञानेश्वरी/अध्याय सहावा

ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥

      • ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।

      • ज्ञानेश्वरी/अध्याय चौदावा

माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥

म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥

संत नामदेवांच्या साहित्यातील गुढीचे उल्लेख

[संपादन]
    • संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांनी हिंदीतही काव्यरचमा केली.[]
      • ६४

देवा गगन गुडी बैठी मैं नाहीं तब दीठी ॥टेक॥
जब लीग आस निरास बिचारै तब लगि ताहि न पावै ॥१॥
कहिबौ सुनिबौ जबगत होइबौ तब ताहि परचौ आवे ॥२॥
गाये गये गये ते गाये अगई कूं अब गाऊं ॥३॥
प्रणवत नांमा भए निहकामा सहजि समाधि लगाऊं ॥४॥

      • ७५

देवा आज गुडी सहज उडी । गगन मांहि समाई ।
बोलन हारा डोरि समांनां । नहीं आवै नहीं जाई ॥टेक॥
तीन रंग डोरि जाके । सेत पीत स्याही ।
छांडि गगन वाजि पवन । सुर नर मुनि चाही ॥१
॥ द्वादसतैं उपजी गुडी । जानै जन कोई ।
मनसा कौ दरस परस । गुरू थैं गम होई ।२॥
कागद थैं रहित गुडी । सहज आनंद होई ।
नांमदेव जल मेघ बूंद । मिलि रह्या ज्यूं सोई ॥३॥

      • श्रीराममाहात्म्य - रामजन्म :

फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥
उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥
झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥
नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥

संत जनाबाईंच्या अभंगांतील गुढीचे उल्लेख

[संपादन]
    • संत जनाबाई (निर्वाण:इ.स. १३५०)

ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्‍ती जाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥ येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥

संत चोखामेळांच्या अभंगातील गुढीचे उल्लेख

[संपादन]
    • चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥ पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

समर्थ रामदासांच्या अभंगातील गुढीचे उल्लेख

[संपादन]
    • समर्थांनी दासबोध ग्रंथासोबत गाथा ही रचल्या होत्या.

कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥१॥
काय मागतों गांठोडी । बोलसीना धरिली गुडी ॥ध्रु०॥
आशा वैभवाची नाहीं । भिऊं नको वद कांहीं ॥२॥
नलगे मज धन दारा । वेगें लोचन उघडा ॥३॥
दास म्हणे वर पाहे । कृपा करूनि भेटावें ॥४॥

पंडित म्हाइंभट सराळेकर :लीळाचरित्रामधील गुढीचे उल्लेख

[संपादन]
    • लीळाचरित्र पंडित म्हाइंभट सराळेकर रचना इ. स. १२७८.
      • लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी

गोसावी एरी दीसीं सावळदेवा बीजें करीती : ऐसें आधीलें दीसीं बाइसीं मार्तंडातें ह्मणीतलें : ‘‘ मार्तंडा तुं सावळदेवासि जाए : दाया पुढें सांघावें : ‘ बाबा एत असति : अवघी आइति करावी : आणि घोडेनिसीं बाबासि साउमेया यावें ’’ मार्तंड सावळदेवासि गेले : तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले : मार्गी भेट जाली : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांतें वीनवीलें : ‘ घोडेयावरि बैसावे जी ’ : वीनती स्वीकरिली : घोडेयावरि आरोहरण केलें : पुढें भक्तिजन चालति : गोसावीयांचे घोडें वारिकें : गोसावी मागील वास पाहीली : तवं मागीली कडे देमाइसें एतें असति : ते गोसावीयां टाकौनि आली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ देमती या : घोडेया बैसा ’ : ह्मणौनि पासाडाचा अनुकारू दाखवीला : देमाइसीं ह्मणीतलें : ‘ हो कां : जी : तथा जालें नव्हें जी ’ : ह्मणौनि पासाडावरि हातु ठेविला : यावरि गोसावी कुबजका भवनीं बीजें केलें : ते गोष्टि सांघीतली : ‘ तैसे तुह्मीं केलें देमती : तुम्हीं एथीचे प्रवृत्ति वीखो जालीति ’ : ॥

हे लेखदेखील पहा

[संपादन]


  1. ^ Marathi, TV9 (2024-04-08). "Gudi Padwa 2024 : नेसून साडी, माळून गजरा... मित्र, मैत्रिणींना द्या गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा..." TV9 Marathi. 2024-04-08 रोजी पाहिले.
  2. ^ Rokde, Dr Suhas (2020-03-25). Kasturi-A fragrance of pure knowledge (हिंदी भाषेत). Astrotech Lab.
  3. ^ खाप्रे.ऑर्ग, ट्रान्सलिटरल प्रतिष्ठान, http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80/word
  4. ^ Khapre.org, ट्रान्सलिटरल प्रतिष्ठान, http://www.transliteral.org/pages/z110328015133/view वरून