बिग थॉम्पसन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिग थॉम्पसन नदी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक नदी आहे. १२३ किमी (७८ मैल) लांबीची ही नदी साउथ प्लॅट नदीची उपनदी आहे.

पात्रवर्णन[संपादन]

या नदीचा उगम रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये होतो. तेथून पूर्वेस वाहत ही नदी एस्टेस पार्क गावाजवळ येते. तेथे या नदीवर ऑलिम्पस धरण आहे. या धरणामुळे लेक एस्टेस हे सरोवर निर्माण झालेले आहे. तेथून पुढे नदी युएस-३४ या महामार्गाच्या बाजूने ८०० मी खाली वाहत येते व लव्हलॅंडजवळ डोंगरांतून बाहेर पडते. यानंतर ग्रीली शहराजवळ लिटल थॉम्पसन नदीशी संगम झाल्यावर साउथ प्लॅट नदीस मिळते.

१९७६चा पूर[संपादन]

३१ जुलै, १९७६ रोजी धरणाजवळ झालेल्या ४ तासात ३०० मिमी (१२ इंच) मुसळधार पावसाने बिग थॉम्पसन नदीला अचानक पूर आला. नदीच्या खालच्या भागात पाउस पडलेला नसल्याने तेथील वस्ती बेसावध होती. पुढील दिवशी कॉलोराडो राज्याचा शंभरावा वाढदिवस असल्याचा उत्सव चाललेला असताना ६.५ मी (२० फूट) उंचीची पाण्याची लाट युएस-३४ वर वसलेल्या गावांवरून वाहत गेली. यात १३८ व्यक्ती मृत्यू पावल्या, ५ कायमच्या बेपत्ता झाल्या. याशिवाय ४०० कार, ४१८ घरे आणि ५२ धंदे यात नष्ट झाले. युएस-३४चा मोठा भागही यात वाहून गेला.