बारींद्र कुमार घोष
(जन्म ५ जुलै १८८० - मृत्यू १८ एप्रिल १९५९)
बारीन्द्र कुमार घोष किंवा बारीन्द्र घोष, हे भारतीय क्रांतिकारक आणि पत्रकार होते. ते 'युगांतर' या बंगाली साप्ताहिकाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. बारीन्द्र कुमार घोष हे महायोगी अरविंद घोष यांचे धाकटे भाऊ होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
[संपादन]त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी राजनारायण बोस यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन आणि श्रीअरविंद हे त्यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही बहीण, असे हे कुटुंब होते.
आध्यात्मिक जीवनाविषयी
[संपादन]बारीन्द्र हे विष्णु भास्कर लेले यांचे शिष्य होते. ते लेले यांना घेऊन कलकत्ता येथे गेले, तेथे लेले यांना बारीन्द्र करत असलेल्या गुप्त क्रांतिकार्याची कल्पना आली. या कार्यापासून दूर राहावे अन्यथा बिकट परिस्थितीस सामोरे जावे लागेल असे लेले यांनी बारीन्द्र यांना सुचविले. पण त्यांनी ऐकले नाही आणि पुढे बारीन्द्र यांना कारावास झाला. अंदमानच्या तुरुंगात सुद्धा बारीन्द्र साधना करत असत. [१]
कार्य
[संपादन]- बारीन्द्र कुमार घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्च १९०६ मध्ये युगांतर नावाचे क्रांतिकार्यास वाहिलेले एक नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या नियतकालिकामध्ये प्रारंभीच्या काळात श्रीअरविंद घोष लेखन करत असत. त्यांचे मार्गदर्शन या नियतकालिकास लाभलेले होते. मे १९०८ मध्ये युगांतर बंद करण्यात आले. [२]
- हे भगिनी निवेदिता यांचे पहिले शिष्य होते. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या अनुशीलन समितीच्या शाखा बंगालभर सुरू करण्याचे काम बारीन्द्र कुमार घोष यांनी केले. [३]
व्यक्तिमत्त्वाचे पैलू
[संपादन]बारीन्द्र लेखक होते. ते डॉन (उषःकाल) नावाचे वर्तमानपत्र चालवीत असत. त्यांनी भक्तिपर काव्य लिहिले होते. ते संगीत, चित्रकला यामध्ये सुद्धा हौशी कलाकार म्हणून सहभागी होते. [१]