बटाटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बटाटा हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे एक कंदमूळ आहे.

बटाटा
बटाट्याचे झाड

बटाटा लागवडीचे तंत्रज्ञान[संपादन]

भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मुळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यात बटाट्याची लागवड प्रामुख्याने होते. बटाट्याखालील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र या पाच राज्यातील आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

पोषक द्रव्ये व आहारातील महत्त्व : १०० ग्रॅम खाण्यायोग्य बटाट्यामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.

महत्त्व[संपादन]

बटाट्यातील स्टार्चचा उपयोग कपड्यातील डाग घालविण्यासाठी करतात. बटाट्याच्या सालीच्या पाण्यात नवीन साडी भिजविल्यास रंग जात नाही व साडी, कपडे कडक राहतात. बटाट्याच्या फोडी करून चेहऱ्यास लावल्यास त्वचा मऊ राहते.बटाट्याचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये केला जातो.बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात.तसेच वाळवनीचे पदार्थ बनवतात.बटाटा हे कंदमूळ आहे.

बटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक असून, आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व 'ब' आणि ' क' भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे. तसेच हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून योग्य पद्धतीने हाताळल्यास अल्यावधीत अधिक पैसा मिळवून देणारे पीक आहे. तसेच गरिबांनाही बटाटा खाणे परवडते. त्यामुळे बटाट्याची गरज (मागणी) दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु उत्पादन अधिक झाल्यास महारष्ट्रामध्ये शीतगृहाची पुरेशी सोय नसल्यामुळे माल एकाच वेळी बाजारात येऊन भाव पडण्याची शक्यता असते. अशा वेळी सुलभ तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याचे महत्त्व तसेच निरनिराळे प्रक्रिया पदार्थ यांचा सखोल अभ्यास करता सुशिक्षित बेरोजगारांच्या सतत भेडसावणाऱ्या समस्येवर मात करता येऊन बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया प्रकल्प उभारून पैसा मिळविता येतो.

बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र १३ लाख हेक्टर असून उत्पादन २३६ लाख टन आहे. देशाच्या मानाने महारष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र फारच कमी १६०० हेक्टर एवढेच असून उत्पादनही कमी आहे.

महारष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात लागवड केली जाते. खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. बहुतेक वेळा लागवड उशिरा होते. त्यामुळे उगवण कमी होते. अवेळी पडणाऱ्या पावसाने ताण दिल्यास अथवा प्रमाणापेक्षा जास्त पडल्यास पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट येते.

रब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच थंडीमुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक येते. पावसाळी बटाट्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील बटाटा निर्धोक असून त्यापासून अधिक उत्पादन हमखास मिळते.

महाराष्ट्र राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ४० ते५० क्विंटल एवढी कमी आहे. त्यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे, यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड, योग्य लागवड पद्धत, आधुनिक तंत्रज्ञान डॉ.बावसकर टेक्नाँलॉजीचा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. याचे अनुभव खेड तालुक्यामध्ये तसेच सातारा, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहेत.

बटाट्याच्या जाती[संपादन]

  • कुफरी चंद्रमुखी - झाड मध्यम उंच,जोमदार वाढीचेबटाटे आकर्षक, मळकट पांढऱ्या रंगाचे असतात.यातील गर मळकट पांढरा व पिठुळासते. याचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी २०० ते २२५ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
  • कुफरी ज्योती - याचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी १७५ ते २०० क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
  • कुफरी सिंदुरी -फुले फिकट जांभळ्या रंगाची असतात. कालावधी ११० ते १२० दिवस असून हेक्टरी २०० ते २२५ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. पाने मुरडणाऱ्या रोगास प्रतिबंधीत असे हे वाण आहे.
  • कुफरी जवाहर - (जे एच २२२)- संकरित वाण. करपा रोग प्रतिबंधक.हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २० ते २५ क्विंटल व उत्पन्न २०० ते २२५ क्विंटल हेक्टरी.

या बटाट्याच्या काही जाती आहेत.[१]

लागवडीचा हंगाम[संपादन]

बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असे हवामान त्याचे वाढीस पोषक असते.महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामात याचे अधिक उत्पादन येते. साधारणत: याची लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करतात.पुढील थंडीचा काळ याचे वाढीस पोषक असतो.[१]

लागवडीची पद्धत[संपादन]

बटाटा लागवडीसाठी २ फुटाची सरी पडून त्यामध्ये १५ ते २० सेंमी अंतरावर बटाट्याची लागवड करावी आणि लगेच सारी फोडून घ्यावी. म्हणजे बटाट्याच्या खाप्यावर वरंबा व वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होईल. हिवाळ्यातील लागवड ही जमीन ओलावून वाफशावर करावी आणी उगवण झाल्यानंतर पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन[संपादन]

बटाटा हे पीक खतास उत्तम प्रतिसाद देते. पालाशयुक्त खते वाढीस पोषक ठरतात. रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा. बटाट्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर लागवडीपुर्वी एकरी १०० किलो आणि लागवडीनंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी ५० किलो द्यावे.

आंतर मशागत[संपादन]

बटाटा पिकास लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी खांदणी करून भर द्यावी. कारण बटाटा उघडा पडल्यास सुर्यप्रकाशाने तो बटाटा हिरवा पडतो. सेलॅनीन या द्रव्यामुळे असा बटाटा खाण्यास निरूपयोगी ठरतो. कारण तो लवकर शिजत नाही आणि तो भाग कडसर लागतो. त्यामुळे अशा बटाट्याला बाजार भाव कमी मिळतो. तसेच मातीची भर लावल्याने जमिनीत हवा खेळती राहिल्याने झाडांची वाढ जलद व चांगली होते. तसेच जमिनीखाली लागलेले लहान - लहान बटाटे पोसण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन[संपादन]

बटाट्याची एकूण पाण्याची गरज ५० ते ६० सेंमी आहे. खरीपातील बटाट्याला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तर रब्बी हंगामातील लागवड जमीन ओलावून वाफश्यावर केली असल्यास पहिले पाणी १० ते १५ दिवसांनी द्यावे. रब्बी हंगामामध्ये ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. बटाट्याला एकूण ९ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. बटाटे काढणीपूर्वी १० ते १२ दिवस पाणी तोडावे.

कीड व रोग[संपादन]

बटाटा उगवून आल्यानंतर मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी या रसशोषणाच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर बटाट्यामध्ये मर, करपा, तांबेरा, बांगडी (Ring Disease) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

काढणी,प्रतवारी व विक्री=[संपादन]

बटाट्याची पाने सुमारे ९०% सुकल्यावर किंवा पिवळी पडल्यावर, बटाट्याच्या फांद्यांची जमिनीलगत छाटणी करावी.त्यानंतर,बटाटे काढून ८-१० दिवस कडुनिंबाच्या पाल्याने अथवा कोरड्या गवताने झाकून त्याला थंड जागी ठेवावे. मोठे,मध्यम बटाटे वेगळे करून, त्यातील हिरवे,साल निघालेले व किडग्रस्त,सडलेले बटाटे वेगळे काढावे. चांगल्या बटाट्याची त्वरीत विक्री करावी अथवा शीतगृहात ठेवावे.[१]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ लेखक: गजानन ज. तुपकर, विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सिसा,(उदेगाव) (१५ नोव्हेंबर २०१७). तरुण भारत नागपूर-ईपेपर-पान क्र. ९, "बटाटा लागवड-२" (मराठी मजकूर). नरकेसरी प्रकाशन, नागपूर. "कृषी भारत पुरवणी"  Unknown parameter |अ‍ॅक्सेसदिनांकमहिना= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)


http://www.drbawasakartechnology.com/m-October2013-BatataLagwad.html