बंडोपंत सोलापूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोरेश्वर वासुदेव तथा बंडोपंत सोलापूरकर (इ.स. १९३३ - २३ जानेवारी, इ.स. २०१३) हे पुण्यात राहणारे एक मराठी क्लॅरिनेट वादक होते. पुण्यातील प्रभात ब्रास बॅंडचे ते संस्थापक होते.

वयाच्या सातव्या वर्षांपासून बंडोपंतांनी त्यांनी खर्‍या अर्थाने वादनाला सुरवात केली. मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर व नागेश खळीकर यांच्याकडून त्यांनी क्लॅरिनेटचे धडे घेतले. बंडोपंतांनी शहनाईनवाज बिस्मिल्ला खान यांच्यापासून शास्त्रीय संगीतातील मिंड आणि लयकारी हे बारकावे आत्मसात केले. हे बिस्मिल्ला खानांचे लाडके शिष्य समजले जात. त्यांनी स्वतःची शहनाई बंडोपतांना दिली होती.

देशभरात अनेक ठिकाणी बंडोपंतांनी मैफली गाजविल्या. केवळ मैफलीच नाही, तर लग्न समारंभ, गणेशोत्सवातही त्यांनी बहारदार वादन केले. मानाच्या गणपती मिरवणुकीत त्यांचा बॅण्ड असतोच. कर्नाटकातल्या कुंदगोळ येथे दर वर्षी होणार्‍या सवाई गंधर्व महोत्सवात सलग ५३ वर्षे त्यांनी क्‍लॅरोनेट वादन केले. २०१२ साली त्यांनी या महोत्सवात शेवटचे वादन केले. त्या वेळी कर्नाटक सरकारने त्यांचा गौरव केला होता.

बंडोपंत सोलापूरकरांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार
  • सूरमणी किताब
  • सूरमल्हार किताब
  • वादनाचार्य किताब, वगैरे
  • बंडोपंतांच्या नावाने दरवर्षी एका वाद्यसंगीतकाराला सूरमणी पुरस्कार दिला जातो. २०१६ सालचा पुरस्कार प्रमोद मराठे यांना मिळाला आहे. (वि.सू. - सूरमणी या नावाचा पुरस्कार इतर अनेक संस्था देतात.)