बंडगार्डन पूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१८७५ साली दिसणारा पुलाचा देखावा

बंडगार्डन पूल हा पुण्यातील मुळा-मुठा नदीवर बांधलेला एक पूल आहे. याचे जुने नाव फिट्झगेराल्ड पूल असे आहे. भारतातील ब्रिटिश राजवटीत इ.स. १८६७ साली हा पूल बांधला. हा दगडी आणि रुंद कमानी असलेला पुण्यातील पहिला पूल होता. या पुलाचे बांधकाम कॅप्टन रॉबर्ट एस. सेलन या अभियंत्याने केले होते. पुलाला मुंबईचे १८६७ ते १८७२च्या दरम्यान गव्हर्नर असलेले विल्यम रॉबर्ट व्हेसी फिट्झगेराल्ड यांचे नाव देण्यात आले होते. बांधकामाला त्या वेळी दोन लाख रुपये खर्च आला होता.

पुलावरच्या सिंहाच्या दोन प्रतिमांपैकी एक प्रतिमा

पुलावर सिंहाच्या दोन दगडी प्रतिमा आहेत. पूल जुना झाल्यानंतर त्याचा वापर कमी व्हावा म्हणून २०१३ साली त्याला समांतर असा एक पूल बांधण्यात आला, त्या पुलाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. आता या पुलावर पाश्‍चात्य देशांच्या धर्तीवर खुले कलादालन (आर्ट प्लाझा) साकारणार आहे.


या पुलाजवळच एक बगीचा आहे, त्याचे प्रचलित नाव बंड गार्डन असून बदलेले नाव महात्मा गांधी उद्यान आहे. मात्र हे नवीन नाव वापरले जात नाही.